मोदी, पवार आणि राहुल गांधी...

    दिनांक :15-Oct-2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 35 ए आणि 370 कलम पुन्हा लागू करून दाखवा, तसेच तीन तलाकसंदर्भातील नवा कायदा रद्द करून दाखवा, असे आव्हान विरोधकांना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक मंदीच्या परिस्थितीतून सावरत देशाची अर्थव्यवस्था लवकरच प्रगतिपथावर गेलेली दिसेल, असा जो निर्वाळा दिला आहे, त्याने वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही मुद्यांवरून मोदी यांनी विरोधकांना चांगलेच आडव्या हाताने घेतले, हे बरे झाले. जम्मू-काश्मीरच्या जनतेत वेगळेपणाची भावना निर्माण करणारी तसेच भारताशी पूर्णपणे एकरूप होऊ न देणारी घटनेतील 35 ए आणि 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय मोदी सरकारने घेतला. जवळपास 60 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला आपल्या कार्यकाळात असा निर्णय कधी घेता आला नाही वा घ्यावा, असे वाटलेही नाही. त्यामुळे देशहिताचा निर्णय घेतल्याबद्दल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारचे स्वागत करायला हवे होते. पण, देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणामी करणार्‍या या निर्णयाचे स्वागत न करता काँग्रेसने त्याविरुद्ध रान पेटवण्याचा निर्णय घेत आपली लायकी दाखवून दिली. 
 
 
जम्मू-काश्मीरच्या जनतेनेही हा निर्णय मनापासून स्वीकारला, कारण या निर्णयातच जम्मू-काश्मीरसोबत आपलेही भले असल्याची त्यांची खात्री पटली होती. पण, लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झालेला असतानाही काँग्रेसच्या नेतृत्वाचे डोळे उघडत नाहीत, आतातरी देशहिताच्या बाजूने उभे राहावे, असे त्यांना वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या आपल्या भाषणात काँग्रेसचा खरपूस समाचार घेताना,  हिंमत असेल तर पुन्हा जम्मू-काश्मिरात 35 ए तसेच 370 कलम लागू करून दाखवण्याचे तसेच तीन तलाक संदर्भातील मोदी सरकारचा ऐतिहासिक कायदा रद्द करण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यातून द्या, असे आव्हान मोदींनी दिले आहे, विरोधी पक्ष ते स्वीकारण्याची हिंमत दाखवतील? आता हिंमत असेल तर काँग्रेसने ही दोन्ही आव्हाने स्वीकारून आपणही मर्दाची अवलाद असल्याचे दाखवून द्यावे. आव्हान स्वीकारता येत नसेल तर जम्मू-काश्मिरात अस्थिरता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार तरी लावू नये. पण, काँग्रेसची जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरील भूमिका म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखी आहे, कुत्र्याचे शेपूट कितीही नळीत घातले तरी सरळ होऊ शकत नाही, वाकडे ते वाकडेच राहते. तसेच काँग्रेस आपले कितीही नुकसान झाले तरी राष्ट्रवादी भूमिका घेऊ शकत नाही. राष्ट्रवादी भूमिका घेणे काँग्रेसच्या रक्तातच नाही.
 
जम्मूच्याच नव्हे, तर काश्मीरच्या जनतेनेही 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे, त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांत एकही अनुचित घटना राज्यात घडली नाही, सावधगिरीचा उपाय म्हणून सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाय तेथे लागू केले असले तरी आता तेही हटवण्यात येत आहेत, पोस्टपेड मोबाईलची सेवा तेथे पूर्ववत करण्यात आली आहे. एखादे मोठे ऑपरेशन झाल्यावर सामान्य माणसालाही काही निर्बधांचा सामना करावा लागतो, खाण्यापिण्याची पथ्ये पाळावी लागतात. जम्मू-काश्मिरातून 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेणे, हे तर मोठे ऑपरेशनच होते, त्यामुळे तेथे काही निर्बंध असणे स्वाभाविक होते. त्यावरून कोल्हेकुई करणे काँग्रेसने थांबवले पाहिजे. अशी कोल्हेकुई थांबवता येत नसेल, तर पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आव्हान स्वीकारून जनता आपल्यासोबत आहे, हे सिद्ध करावे. पण, काँग्रेस हे आव्हान स्वीकारू शकणार नाही. कारण या मुद्यावरून राज्यातील जनता भाजपासोबत म्हणजे मोदी सरकारसोबत आहे.
  
देशातील अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरूनही काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष आक्रस्ताळेपणा करत आहेत. सध्या आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. देशावर कोणतेही नैसर्गिक आणि अन्य प्रकारचे संकट येत असेल, तर सर्वांनीच त्याचा एकजुटीने सामना करायचा असतो, संकटाच्या परिस्थितीचे आपल्या स्वार्थासाठी राजकारण करायचे नसते. पण, काँग्रेसला एवढे शहाणपण असते, तर तिचा लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाला नसता.
 
मंदीची परिस्थिती ही तात्कालिक आहे. सर्वच देशांना कधी ना कधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यामुळेच याने गांगरून जाण्याचे कारण नाही. तीन-चार महिन्यांत मंदीच्या या परिस्थितीतून देश बाहेर येईल आणि आपली अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतीच्या वाटेवर वेगाने धावू लागेल, असा निर्वाळा देत मोदी यांनी देशवासीयांना आश्वस्त केले आहे.
 
फक्त आपल्याच देशावर मंदीचे सावट आहे असे नाही, तर जगातील सर्वच देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचे खापर मोदी सरकारवर फोडण्यात काही औचित्य नाही. आर्थिक मंदी हा काही कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही, मात्र त्याचे भान विरोधकांना न उरल्यामुळे मोदींना या मुद्यावरून जनतेला आश्वस्त करावे लागले. ज्यांना देशातील जनतेनेच नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही लाथाडले, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना अजूनही शहाणपण येत नाही. भाजपा चोर आहे, असा आरोप राहुल गांधींनी यावेळी पुन्हा प्रचारात केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात राफेल मुद्यावरून ‘प्रधानमंत्री चोर है’ या राहुल गांधींच्या आरोपाला देशातील जनतेने काँग्रेसचा दारुण पराभव करत चोख उत्तर दिले असतानाही राहुल गांधींची अक्कल ठिकाणावर येत नाही आणि ते पुन्हा ‘चोर है’चाच राग आळवतात, ही बाब काँग्रेसलाच नुकसान पोहोचवणार आहे.
 
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजकाल अजाणतेपणे काहीही बोलत आहेत, वेडेवाकडे हातवारे करत आहेत. राजकारणाच्या आखाड्यातील शरद पवार कधीकाळी महाराष्ट्रकेसरी असतीलही, पण त्यांना देवेंद्र फडणवीस नावाच्या नवख्या मल्लाने 2014 च्या कुस्तीत चारीमुंंड्या चीत केले. यावेळी पुन्हा दंड थोपटून पवार आखाड्यात उतरले आहेत, पण आता त्यांच्यात ती ताकद राहिली नाही. त्यांना म्हातारचळ झाला आहे. आपले वय काय, राजकारणातील आपला अनुभव काय आणि आपण बोलतो काय, याचे भानही त्यांना राहिले नाही.
तसाही शरद पवार यांचा राजकारणातील साधनशूचितेशी फारसा संबंध कधी आला नाही. सत्तेसाठी शरद पवार काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. आता तर सत्ता आपल्या हातून दुसर्‍यांदा गेल्याची खात्री पटल्यामुळे, त्यांचा आपल्या डोक्यावरील ताबाही गेल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे वेडेवाकडे हातवारे करणे, वाट्‌टेेल ते बरळणे सुरू झाले आहे. राहुल गांधी यांची वागणूक लहान मुलासारखी, तर शरद पवार यांची म्हातार्‍यासारखी. म्हातारी व्यक्ती आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात लहान मुलासारखीच वागत असते, त्यामुळे तर या दोघांच्या वागण्यात साम्य दिसत नाही?