ट्विटरवर शाहरुखचे ३ कोटी ९० लाख फॉलोअर्स

    दिनांक :15-Oct-2019
मुंबई,
बॉलिवूड सिनेसृष्टीचा किंग.. बादशाह म्हणजेच अर्थातच 'शाहरुख खान'. शाहरुखची बादशाहत केवळ सिनेसृष्टीपुरतीच मर्यादीत नसून सोशल मीडियावरही तोच 'किंग' असल्याचं त्यानं सिद्ध केलं आहे. त्याच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या कमालीची वाढत आहे. त्याच्या एकूण फॉलोअर्सची संख्या ही ३९ मिलियन म्हणजेच ३ कोटी ९० लाख इतकी झाली असून लवकरच तो चार कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करणार आहे.
 

 
 
शाहरुखनं सध्या कामातून ब्रेक घेतला असला तरी तो सोशल मीडियावर मात्र अॅक्टीव्ह असतो. चाहत्याच्या संपर्कात राहिल्यानं त्याच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. तसंच अनेकदा चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही शाहरुख प्रेमानं उत्तर देताना दिसतो. ३९ मिलियनफॉलोअर्स झाल्यानंतर त्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि प्रेम असंच देत राहा अशी प्रेमळ विनंतीही केली. 'असंच प्रेम करत रहा... सकारात्मकता अशीच वाढू द्या... स्वत:ला आनंदी ठेवा.. तुम्हाला ज्या पाहायचा आहेत त्या गोष्टी तितक्याच सुंदर आहेत. लव्ह यू ऑल' असं म्हणत शाहरुखनं चाहत्यांचे आभार मानले आहेत.
 
 
 
शाहरुखनं #AskSrk नावाचं एक सेशन अलीकडेच ट्विटरवर घेतलं होतं. #AskSrk हा हॅशटॅग वापरून फॅन्सच्या मनातील प्रश्न थेट शाहरूखला विचारण्याची संधी त्यांना मिळाली होती. चाहतेदेखील आपल्या लाडक्या किंग खानला प्रश्न विचारण्यास आतुर होते. त्यांनी शाहरूखवर प्रश्नांची सरबत्ती करत त्याला भांडावून सोडलं. बॉलिवूडमध्ये आपल्या हजरजबाबीपणामुळं प्रसिद्ध असलेल्या शाहरुखनेदेखील या सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. या सेशनमध्ये त्यानं चाहत्यांच्या काही प्रश्नांना ट्विटरवर गमतीदार उत्तरं दिल्याचं दिसून आलं. 'सध्या तुमचे बॉलिवूड सिनेमे का येत नाहीत?' असा प्रश्न त्याला एका चाहत्यानं विचारला. त्यावर, 'मी स्वत: बॉलिवूड आहे' असं उत्तर त्यानं दिलं होतं. आणखी एका चाहत्यानं शाहरुखला गेल्या काही महिन्यांमध्ये विविध विद्यापीठांकडून मिळालेल्या डॉक्टरेटच्या पदव्यांबद्दल शुभेच्छा देत, 'डॉन ३'ची उत्सुकता असल्याचं सांगितलं. त्यावरह 'धन्यवाद! कदाचित मी आता 'डॉन ५' करायला हवा', असं मजेशीर उत्तर शाहरुखनं दिलं.