निवडणुकीच्या धामधुमीत गडचिरोलीत तब्बल २७ लाखांची दारू जप्त

    दिनांक :16-Oct-2019
कुरखेडा,
राज्यात विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरु असताना कुरखेड्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे दोन वाजताच्या सुमारास तालुक्यातील पुराडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामगड भटेगाव मार्गावर सापळा रचून केलेल्या कारवाईत दोन चारचाकी व दुचाकीसह तब्बल २७ लाख रुपयांच्या दारूचा साठा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये यांच्यासह पाच जणांवर दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही कार्यवाही करत असताना सर्व आरोपी मुद्देमाल सोडून फरार होण्यात यशस्वी झाले. 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या रामगड भटेगाव मार्गावरून अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन चारचाकी व दुचाकी सह अवैध दारूचा साठा जप्त केला मात्र आरोपी वाहन सोडून फरार होण्यात यशस्वी झाले.
 
याप्रकरणी आरोपी निर्मल धमगाये, तरुण धमगाये, सुजित बिश्वास, नीरज राधवानी, जयदेव गहाने व अन्य एकावर पुराडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 353, 143, 147, 506, 109, 188 म दा का सह कलम65(अ)83,94(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.