रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके तसेच तणनाशके इ. मिश्रणे तयार करणे

    दिनांक :16-Oct-2019
कीड नियंत्रणासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त किडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके किंवा रासायनिक खते यांचे शिफारशीनुसार योग्य प्रकारे मिश्रण केल्यास वेळेची, मजुरांची, उपकरणांची तसेच फवारणीच्या खर्चात बचत होते. या व्यतिरिक्त शिफारशीत किडनाशकांचे मिश्रण वेळीच किडींच्या विशिष्ट नाजुक अवस्थेवर वापरल्यास प्रभावी व एकापेक्षा जास्त किडींचे नियंत्रण होते. दोन वेगवेगळ्या किडनाशकांच्या मिश्रणा पेक्षा दोन तण नाशकांचे मिश्रण करणे सामान्य आहे. उदा. तणनाशक व बुरशीनाशकांचे मिश्रण फार कमी वेळा केल्या जाते कारण वेगवेगळ्या किडींचे/रोगांचे व तणांचे नियंत्रण वेगवेगळ्या वेळी करावे लागते किंवा दोन्हीला वेगळे वेगळे नोझल्स व परिचलीत दाब लागतो.
 
 
 
 
 
टँक मिक्स किडनाशकांचा वापर करताना आपण किडनाशकांचा प्रभावीपणा किंवा वेळेची बचत किंवा इतर बाबी गृहीत धराव्या लागतात. माहिती पत्रकामध्ये सदर किडनाशकांची इतर किडनाशकांमध्ये मिसळण्याची शिफारस नसल्यास तसे मिश्रण करणे चुकीचे असून ते करू नये. ज्या किटनाशकांच्या माहितीपत्रामध्ये मिश्रणाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नसल्यास परंतु मिश्रण करावयाचे असल्यास ती आपली जबाबदारी समजून सदर मिश्रणामुळे दोन्ही किडनाशकांचे गुणधर्म कायम राहतील याची खातरजमा करूनच मिश्रण करावे अन्यथा करू नये. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त किडनाशके सुरक्षित मिसळता येऊन मिसळलेल्या किडनाशकांचे विषाच्या तिव्रतेवर, भौतिक गुणधर्म किंवा झाडावर विपरीत परिणाम होत नसल्यास असे मिश्रण सुसंगत असे समजावे. याउलट मिश्रणामध्ये गाळ तयार होणे, प्रमाणापेक्षा जास्त फेस येणे, पिकावर विपरीत परिणाम इ. बाबी असल्यास असे मिश्रण विसंगत आहे असे समजावे. दोन वेगवेगळ्या रसायनांचे/तणनाशकांचे मिश्रण करण्यापूर्वी त्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्माची माहिती असायला पाहिजे. मिश्रण करण्यास सुसंगत अशा किडनाशकांचे मिश्रण करावयास पाहिजे तर मिश्रणासाठी विसंगत असलेली किडनाशके एकमेकांमध्ये मिसळू नये. याबाबत आपण माहिती पाहू.
 
अ) रासायनिक विसंगतता : दोन किडनाशकांमधील रासायनिक घटकांची क्रिया होऊन भिन्न घटक तयार झाल्यामुळे किडनाशकांची कार्यक्षमता कमी होते (म्हणजेच क्रियाशील घटकांचे विघटन होऊन अकार्यक्षम घटक तयार होतात.) त्यालाच रासायनिक विसंगतता म्हणतात.
 
ब) जैविक विसंगतता (फायटो टॉक्सीसीटी)
दोन भिन्न रसायने/किडनाशकांच्या मिश्रणाची फवारणी केल्यानंतर काही वेळात/दिवसात त्यांचे दुष्परिणाम दिसून येतात जसे पाने करपणे, चुरगळणे, वाळणे, झाडाची/पानांची अनैसर्गिक वाढ होणे/विकृति येणे इत्यादी.
 
क) भौतिक विसंगतता : दोन किडनाशके मिसळल्यानंतर त्यांचे भौतिक गुणधर्मामध्ये बदल होतो. त्यापैकी एक रसायन/किडनाशक फवारणीसाठी धोकादायक िंकवा अस्थिर असते. अशा मिश्रणामधील तरल व घन पदार्थ वेगळे होणे, स्फोटक क्रिया/धूर/फेस निघणे, मिश्रणामध्ये गोळे तयार होणे इत्यादी बाबी आढळून येतात. मिश्रण पिकावर फवारणीसाठी तयार करण्यापूर्वी मिश्रणाची भौतिक विसंगतता तपासणी म्हणजेच जार चाचणी करावी.
 
जार चाचणी : ही चाचणी मिश्रणाची भौतिक विसंगतता तपासणीसाठी कक्षरज्ञावही ूलागते. यामध्ये ट्रॅक मिक्स करण्यासाठी किडनाशकांची मात्रा (200 लिटर/एकर) ज्या प्रमाणात घ्यावयाची आहे. त्याच प्रमाणात कमी मात्रेमध्ये पाणी (500 मि.ली.) एका जारमध्ये (काचेचे/पारदर्शक प्लास्टिकचे अरूंद तोंड असलेले भांडे) घेऊन ज्या क्रमाने किडनाशके मिश्रीत करण्याचे निर्देशित केले, त्याप्रमाणे मिश्रण तयार करावे. जार वर कॅप लावावी व मिश्रण जोराने ढवळावे व ते किमान दोन तास न हलवता तसेच ठेवावे किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल. त्यानंतर मिश्रणाचे निरिक्षण करून वर सांगितल्याप्रमाणे सुसंगत की विसंगत आहे हे ठरवावे.
 
टँक मिक्स करतांना घ्यावयाची काळजी
1. किडकनाशकांसोबतचे माहिती पत्रक वाचून किडनाशक टँक मिश्रण करण्यासाठी शिफारस केले आहे की नाही याची खात्री करावी व शिफारस केल्यानुसार मिश्रण तयार करावे.
2. माहिती पत्रकावर किडनाशक मिश्रणाची शिफारस नसेल तर जार चाचणी करावी.
3. जार चाचणी झाल्यावर त्याच मिश्रणाची छोट्या भागात झाडावर फवारणी करून झाडावर विपरीत परिणाम, मिश्रणाची किडींच्या नियंत्रणाची परिणामकारकता तसेच अनावश्यक किटकनाशकांचे अंश याबाबत तपासणी करावी. यासाठी काही दिवस लागू शकतात.
4. विद्राव्य खते टँक मिक्स करावयाची असल्यास माहितीपत्रक पाहून तसेच आवशय्कता भासल्यास जार चाचणी करून खात्री करावी. काही खतांमुळे मिश्रणातील द्रावणाचा सामु (पीएच) बदलू शकतो व त्यामुळे किडनाशकामध्ये अनावश्यक क्रिया होऊ शकते िंकवा त्याची विषाची तिव्रता कमी होऊ शकते.
5. मिश्रणामध्ये किडनाशकांची शिफारशीत मात्रेचाच वापर करावा.
6. मिश्रण करतांना किडनाशकांची क्रमवारी तंतोतंत पाळावी.
 
मिश्रण तयार करण्याची क्रमवारी
1. टँक पाण्याने अर्धा भरून ढवळणे सुरू करावे.
2. त्यामध्ये प्रथम पाण्यात मिसळणारी भुकटी (डब्ल्यु.पी.), पाण्यात मिसळणारे दाणेदार (डब्ल्यु.जी.) तेलात मिसळणारे (ओ.डी.), पाण्यात वाहणारे कोरडे (डी.एफएल.), पाण्यात वाहणारे ओले (एफएल), सस्पेंशन कॉसंट्रेट (एस.सी.), पाण्यात प्रवाही (ई.सी.) या क्रमाने किडनाशके मिसळून टँक तीन चर्तुथांश भरावी. वरील मिश्रण करतांना सतत काठीने ढवळावे व त्यानंतर सोलुबल लिक्वीड (एस.एल.) या प्रकारचे किडनाशके मिसळून टँक जवळपास पूर्ण भरावी. यानंतर तेल पसरणारे / चिकटणारे पदार्थ / स्टिकर / वेटीग एजंट िंकवा विद्राव्य खते या मिश्रणात आवश्यकतेनुसार टाकावे व टँक पूर्ण भरून चांगले ढवळावे. अशाप्रकारे हे मिश्रण पिकावर वापरण्यासाठी तयार होईल.
 
किडनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी
* किडनाशकांच्या डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली किडनाशक सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारणपणे निक्षर व्यक्तींसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली किडनाशके कमीत कमी विषारी असतात फारच आवश्यकता असल्यास डब्यावर लाल रंगाचे चिन्ह असलेली किटकनाशके वापरावी. अशी किटकनाशके पर्यावरणाला, मानवाला व जीवजंतूंना तुलनेने जास्त हानीकारक असतात. हे सर्व विचारात घेऊन किटकनाशकांची निरड करावी.
* पिकाची अवस्था, वाढ, क्षेत्र विचारात घेऊन शिफारशीनुसार नेमकी तवेढीच किडनाशकांची मात्रा मिश्रण तयार कण्यासाठी घ्यावी.
* मिश्रण बनवतांना संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क इ. वापर करावा.
* मिश्रण बनविण्याच्या ठिकाणी खाद्य पदार्थ िंकवा पिण्याचे पाणी ठेवू नये.
* किडनाशकांचे मिश्रण बनवितांना डबे उघडताना, मात्रा मोजतांना त्यातून निघणारी विषारी वाफ, धूर, उडणारी भूकटी इ. नाकावाटे, डोळ्यांमध्ये जाणार नाही व सरळ त्वचेशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
* द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्य पदार्थ िंकवा पिण्याचे पाणी ठेवू नये.
* किटकनाशकांचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी.
 
 
डॉ. ए.व्ही. कोल्हे
डॉ. डी.बी. उंदिरवाडे
किटकशास्त्र विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला