पिकांच्या अधिक उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

    दिनांक :16-Oct-2019
एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पध्दतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबर सेंद्रिय, हिरवळीची खते, जीवाणू आणि नत्रयुक्त अॅझोला यासारखी खते, पीक अवशेष व इतर पालापाचोळा इतर टाकाऊ पदार्थ कुजवून तयार केलेल्या खतांचा समतोल साधला जातो. चक्रीकरणामध्ये द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपिकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. जमिनीतील अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत हा जमिनीच्या खडकापासून बनलेला आहे. त्यामधील अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि जैविक खते ही होत. यापैकी कोणत्याही एका स्त्रोताचा वापर केल्यास कदाचित तो पुरेसा होईल परंतु एकसारखे तेवढेच उत्पन्न त्या पिकाचे मिळणार नाही तसेच जमिनीची प्रत खालावेल व त्याचा प्रदुषण वाढविण्यास हातभार लागेल.
 
 
 
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना ही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता कायमस्वरूपी टिकवणे व जमिनीचा पोत कायम राखून ठेवणे ही आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपिकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्वत करण्याचा प्रयत्न केला जातो. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्त्रोतातून करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविली जावून उत्पादनात वाढ होते.
 
 
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक ः एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीत प्रत्येक संसाधनाचा एक िंकवा अधिक पीक पध्दतीचा अवलंब करून खतातील अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य होते. अन्नद्रव्यांचा तसेच टाकाऊ सेंद्रिय पदार्थ व पिकांच्या अवशेषांचे कंपोस्ट िंकवा इतर पद्धतीने पुर्नचक्रीकरण करून मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सुधारणा घडवून आणता येते. एकात्मिक पद्धतीत अन्नद्रव्ये पुरवठा करणारे घटक खाली दिले आहेत.
 
 
1. कंपोस्ट व गांडूळखत प्रक्रियेव्दारे वनस्पतींचा पालापाचोळा व टाकाऊ पदार्थांचा अन्नद्रव्यांसाठी पुनर्रुपयोग करणे.
2. नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा/जीवाणु संवर्धनाचा वापर करणे.
3. संतुलीत खत मात्रा देणे म्हणजेच माती परिक्षण करून शिफारशीत खत मात्रा देणे.
4. हिरवळीचे खते, निळे-हिरवे शेवाळ आणि अॅझोलाचा पिकासाठी उपयोग करणे.
5. पीक फेरपालट व आंतर पिकामध्ये द्विदल वनस्पतींचा समावेश करणे.
6. शेतातील पीक अवशेष/टाकाऊ पदार्थांपासून कंपोस्टखत तयार करून त्यांचा वापर करणे.
7. कारखान्यातील (उदा. साखर/तेलघानी) टाकाऊ पदार्थ, प्रेसमड केक इत्यादींचा खत म्हणून वापर करणे.
 
 
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे ः
1. पिकांना संतुलीत अन्नद्रव्य पुरवठा करता येतो.
2. संतुलित खतांमुळे पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक उत्पादनात वाढ होते.
3. सेंद्रिय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.
4. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात (उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे आणि जीमन भूसभुशीत करणे) सुधारणा होते.
5. उपयुक्त जिवाणूंची वाढ होते.
6. जमिनीतील कर्बःनत्र यांच्या प्रमाणात समतोल राखला जातो.
7. योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता विशेषतः नत्राची उपलब्धता वाढविण्यास मदत होते.
8. पीक अवशेषांचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जल व मृद संधारण तसेच अन्नद्रव्य संधारण ही करता येते.
 
 
सारांश ः अशाप्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य पध्दतीत सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि जैविक खते यांचा संगम झाल्यामुळे पीक उत्पादनात तर अधिक मिळतेच, परंतु त्याच बरोबर जमिनीच्या गुणधर्मावर त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो. सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारले जातात. जमीन सजीव राहते. जीवाणू खतांमुळे नैसर्गिक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो तर रासायनिक खतांमुळे पिकास लागणारे पुरेसे अन्नद्रव्ये देता येतात. जमिनीची धूप व असंतुलित अन्नद्रव्ये पुरवठा यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातून जमिनीचे आरोग्य अबाधित राखून पिकांची उत्पादकता शाश्वत करता येते. उपलब्ध सुधारीत जाती, िंसचन, आधुनिक कृषितंत्र व एकात्मिक अन्नपुरवठा यामुळे पिकांची उत्पादकता वाढून जमिनीची सुपिकता दीर्घकाळ टिकते. देशातील विविध कृषी विद्यापीठात झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष असे आहेत, की- पिकांची अन्नद्रव्यांची अर्धी गरज रासायनिक खतातून व अर्धी गरज सेंद्रिय खतातून व त्याचबरोबर जैविक खते वापरून एकात्मिक पद्धती अंगिकारल्यास उत्पादन खर्च कमी करून उत्पादन पातळी गाठता येते. तसेच पर्यावरण संतुलन राहते व जमीन दीर्घकाळ उत्पादनशील राहतात. (समाप्त)
• डॉ. एन.डी. पार्लावार
• डॉ. वाय.डी. चर्जन
• डॉ. एस.यु. काकडे
कृषिविद्या विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला