हृतिक-टायगरच्या 'वॉर'नं मोडले १६ विक्रम

    दिनांक :16-Oct-2019
मुंबई,
हृतिक रोशन व टायगरच्या श्रॉफच्या 'वॉर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडले असून यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. 'वॉर'नं आतापर्यंत २६५.७० कोटींची कमाई केली आहे. यंदाच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांवर 'वॉर'नं मात केली आहे. 'वॉर'नं मोडलेले विक्रम पुढीलप्रमाणे...
 
 
 
 
पहिला दिवस गाजवला!
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम 'वॉर'नं मोडला आहे. आमीर खानचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. 'वॉर'नं ५१.५० कोटींची कमाई करत त्याला मागे टाकलं आहे.
हृतिकची सर्वोत्कृष्ट ओपनिंग
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत 'वॉर'नं हृतिक रोशनच्या 'बिग बँग' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 'बिग बँग'नं पहिल्या दिवशी २४.४० कोटींची कमाई केली होती. 'वॉर'नं त्याच्या दुप्पट कमाई केली आहे.
टायगरची 'डरकाळी'
टायगर श्रॉफसाठीही हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा टायगरच्या 'बागी २' चा विक्रम 'वॉर'नं मोडला आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बागी २'नं पहिल्या दिवशी २५ कोटींचा गल्ला जमवला होता.
दिग्दर्शक सिद्धार्थ 'आनंद'
पहिल्या दिवशी इतकी कमाई करणारा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचाही हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. याआधी 'बिग बँग' हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. आता त्याची जागा 'वॉर'नं घेतली आहे.
हॉलिडे ओपनिंग
सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी सर्वाधिक कमाई करण्याचा मान 'वॉर'नं मिळवला आहे. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटानं आतापर्यंत इतकी कमाई केली नव्हती.
बॉक्सऑफिस 'वॉर' जिंकलं!
'वॉर' समोर चिरंजीवीच्या 'से रा नरसिम्हा रेड्डी' आणि 'जोकर'चं आव्हान होतं. हे दोन्ही चित्रपट २ ऑक्टोबरलाच प्रदर्शित झाले होते. मात्र, 'वॉर'नं पहिल्या दिवशी या दोन्ही चित्रपटांना धोबीपछाड दिली.
मूळ चित्रपटाचं यश
कुठल्याही चित्रपटाचा सिक्वेल वा रूपांतर नसलेला (ओरिजीनल) चित्रपट म्हणून 'वॉर' हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
गांधी जयंती
गांधी जयंती दिनी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी 'वॉर' हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
पहिल्या तीन दिवसांतील कमाई
यंदाच्या वर्षात पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करण्याचा मान 'वॉर'ला मिळाला आहे. पहिल्या तीन दिवसांत 'वॉर'नं अनुक्रमे ५१.५० कोटी, २२.५० कोटी आणि २१ कोटींची कमाई करत एकूण ९५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
१०० कोटी क्लब
यंदाच्या वर्षात सर्वात कमी दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवण्याचा मान 'वॉर'ला मिळाला आहे. चार दिवसांतच 'वॉर'नं ही किमया केली आहे.
पहिला आठवडा
'वॉर' हा यंदाच्या वर्षात पहिल्या आठवड्यात सर्वाधिक १५८ कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची पहिल्या रविवारची कमाई देखील यंदा सर्वाधिक आहे.
टायगर-हृतिकचा सर्वात श्रीमंत चित्रपट
हृतिक रोशन व टायगर श्रॉफचा हा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हृतिकच्या 'बिग बँग'नं १४१.०६ कोटींची तर, टायगरच्या 'बागी-२'नं १६०.७४ कोटींची कमाई केली होती.
२०० कोटी क्लब
यंदाच्या वर्षात सर्वात कमी वेळेत २०० कोटींचा क्लब गाठण्याचा मानही 'वॉर'ला मिळाला आहे. सातव्या दिवशी 'वॉर'नं हा टप्पा गाठला आहे.
पहिल्या आठवड्याचा गल्ला
यंदाच्या वर्षात प्रदर्शनानंतरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं २०६.५० कोटींची कमाई केली आहे. याबाबतीत 'वॉर'नं १५६.७१ कोटींची कमाई करणाऱ्या 'भारत'ला मागे टाकलं आहे. शिवाय, 'बाहुबली: द कनक्लुझन' आणि 'सुलतान'नंतर पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा आजवरचा हा तिसरा चित्रपट आहे.
यंदाची दुसरी सर्वाधिक कमाई
यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'वॉर'नं दुसरा क्रमांक पटकावला आहे. २४४ कोटी कमाईसह आतापर्यंत दुसऱ्या स्थानावर असलेल्या
'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'ला या चित्रपटानं मागं टाकलंय.
परदेशातील सर्वाधिक कमाई
परदेशात सर्वाधिक कमाई करण्याचा यंदाचा विक्रम 'वॉर'नं मोडला आहे. सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा हा विक्रम आता मागे पडला आहे.