वर्धा-यवतमाळ सीमेवर गावठी पिस्टल जप्त; एकास अटक

    दिनांक :16-Oct-2019
हिंगणघाट,
विधानसभा निवडणूक निमित्ताने वर्धा यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील येरला चेक पोस्ट वर निवडणूक स्थिर निगराणी पथकाला बसच्या तपासणीत एक गावठी पिस्टल व दहा राउंड तसेच दारू आढळून आली याप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. 

 
 
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी नऊ वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली. या चेक पोस्टवर मंडळ अधिकारी अरविंद तूराळे, पोलीस शिपाई अरुण उघडे, आकाश कसर, होमगार्ड पथकाचे सुरज मेश्राम, शुभम वानखेडे तैनात होते. याठिकाणी आंध्र प्रदेशची दीलाबाद - नागपुर बस येरला चेक पोस्टवर आली असता तैनात निगराणी पथकाने ती थांबवून बसची तपासणी सुरू केली. या पथकाला मागच्या सीट खाली प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली गावठी पीस्टल आढळून आली. त्यांनी प्रवाशांना विचारणा केली परन्तु प्रवाशांनी चुप्पी साधली. तेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली असता शेख हैदर शेख इब्राहिम वय 34, राहणार पोनकल, जिल्हा निर्मल, आंध्रप्रदेश याने याबाबत कबुली दिली. तसेच पिस्टल चे 10 राऊंड प्लास्टिक मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत मागच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचे दिसून आले सदर राउंड प्लास्टिक मध्ये गुंडाळलेले 10 राउंड बसच्या मागे जवळपास पंधरा फुटावर पोलिसांना मिळाले. आरोपी कडून दोन बंफर दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
 
 
 
या प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे व वडनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष गजभिये यादव तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी आरोपी ला विचारपूस केली असता त्याने या बस मध्ये निर्मल बसल्याचे व नागपूर वरून उत्तरप्रदेशात जाणार असल्याची माहिती चौकशी दरम्यान पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी पिस्टल राऊंड व दारूसह आरोपी ला शस्त्र कायदा 3/25 व महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 अंतर्गत ताब्यात घेऊन अटक केली. तपासात अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.