ओलसावल्यांच्या चंद्रनक्षींचा कशिदा...

    दिनांक :16-Oct-2019
यथार्थ  
 
 श्याम पेठकर 
 
इस्रोचे यान चंद्रावर उतरले. ते महत्त्वाचे कुठलेसे यंत्र मात्र चंद्रावर हरविले. तरीही जगासोबत आपणही चंद्राचा वेध घेणारच. त्यामुळे मानवाच्या हाती काय लागणार अन्‌ मानवाची कशी प्रगती होणार, हे विज्ञानाच्या भाषेत खरे असले, तरीही आकाशातल्या असंख्य ग्रहांपैकी चंद्राशी असलेले आपले भावनिक अनुबंध काही बदलणार नाही. गुलाबाचे फूल समजून घेण्यासाठी त्याचे डिसेक्शन करून त्यांत काय काय द्रव्य आहेत अन्‌ गुलाब वाढविण्यासाठी त्याला कुठली खते आणि कीटकनाशके दिली, हे सांगितल्याने गुलाबाचे सौंदर्य मात्र संपते... चंद्राचे तसे होऊ नये. चंद्राचे हे असे गूढ आणि म्हणूनच त्याची उत्सुकता, ओढ तशीच कायम राहावी. शरद पौर्णिमेला दुधात प्रतििंबब पडल्याने दूध सोन्याचे होत राहो...
 
 
आश्विनातला हा काळ दिवसांनी नव्हे, तर रात्रींनी मोजावा असाच असतो. हळव्या काळजाच्या लोकांनी आश्विनातल्या या रात्रींत आभाळाखाली येऊच नये. एकतर या रात्रींमधला चंद्र ओंजळीत घेऊन बघत बसावा असाच असतो अन्‌ आपण आपल्या नकळत आपली ओंजळ त्याला बहाल करीत असतो. असा चंद्र मग ओंजळीतून घरंगळत येऊन खांद्यावर बसतो, हळूच डोक्यात शिरतो अन्‌ बघता बघता हृदय काबीज करतो. म्हणून या चंद्राची नशा चढते. पावलांना चंद्रबळ येते आणि मग चांदण्या लडिवाळ होतात. पायापायाशी येतात. अशा पायघोळ चांदण्यांमधून वाट काढीत पावलं केव्हा गावाबाहेर निघतात, ते कळतही नाही. रात्र दुधात न्हाली असते आणि वाटा अधिक उठावदार होतात. या रात्रीच्या हातांवर कुणीतरी मेंदी काढून ठेवलेली. आता ती रंगू लागली आहे. अशा दुधाळ रात्री मग झाडांची पानेही मंत्रबंधन झाल्यागत मुकी होतात. पानांच्या पापण्यांआडून एखादं चुकार पाखरू रात्र जागवीत असताना चंद्र बघतं आणि वेडं होतं. पाखरांना असं चंद्रवेड लागणं बरं नसतं. पण, तरल आश्विनातल्या स्निग्ध रात्रींमध्ये तसं होणं अपरिहार्यच असतं. अशा पाखरांचं रात्रभान सरतं. ते चढत्या चोचीनं चंद्र खुडून नेण्याची स्वप्नं बघत जागर करतं आणि मग त्याच्या जागराची गाणी होतात. मुकी पाखरंही मग ही गाणी गाता यावी म्हणून आभाळाकडे आर्तपणे कंठाची, सुरेल गळ्याची मागणी करतात. प्रकाशणार्‍या रात्रींच्या मोहात पडून पाखरांच्या पिढ्यान्‌पिढ्या गायला लागतात. पुढच्या मोसमात ही गाणी पुढच्या पिढीलाही कळावीत म्हणून झाडांच्या फांद्यांवर चोचीने गाण्याच्या नक्षी काढून ठेवतात. पायात चंद्रबळ शिरल्याने काही माणसंही सैरभैर होऊन याच वेळी गावाबाहेर पडली असतात. चंद्राला पान्हा फुटतो. प्रकाश पाझरू लागतो. रसिया माणसांचे तांडे मग भररात्री झाडाखाली मुक्काम ठोकतात. शेकोट्या पेटवून गाणी म्हणतात. ही गाणी त्यांना पाखरांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी शिकविली असतात.
 

 
 
ही सारीच गाणी तिची असतात. तिचं दु:ख, तिच्या वेदना, तिचं प्रेम, तिची ममता... सार्‍यांची गाणी होतात. अशा गाण्यानं शब्दांचे अर्थ काढायचे नसतात. हळव्या गळ्यात स्वरमुद्रित झालेल्या भावनांचेच शब्द होतात. तिची गाणी तिच्यासाठीच गायली जातात, पण ती मात्र मौन असते. ज्यांच्या वेदनाच बोलक्या होतात, त्यांना बोलण्याची गरज नसते. तिच्या वेदनांची तर गाणी झालेली. ती मग चिरमौन स्वीकारते. तिच्या मौनाचे धुके मग तिच्या वाड्याभोवती पसरून असते. तिचा राजवाडा अगदी डौलदार अन्‌ शुभ्र. चंद्रप्रकाशानेही तो थोडा धुरकट होतो. ती वाड्याइतकीच नाजूक नार, सुकुमार. अशाच एका चंद्ररात्री तिचा जन्म झाला असावा. मग तिच्यासाठी रात्र गोठविण्यात आली.
 
दिवसाचा ताप तिला नि तिच्या वाड्यालाही सहन व्हायचे कारणच नव्हते. ती स्वतंत्र, सार्वभौम असली तरी तिच्याबाबत इतरांनाच बरेच नीतिनियम होते. बंधने होती. त्या बंधनाच्या पलीकडे तिचे सौंदर्य अन्‌ स्वातंत्र्य होते. तिच्या जाणिवेच्या परिघात कुण्याच पुरुषाला प्रवेश नव्हता. ती पूर्ण कुँवार होती. पुरुषाच्या नजरेचाही वळ तिच्या शरीरावर अन्‌ मनावर उठला नव्हता. अगदी राजवाड्यामागच्या गुलनार तळ्यात ती शुभ्ररात्री अनावृत होऊन न्हायची, तेव्हाही पुरुषांचा तिटकारा असलेली रानटी कुत्री कडक पहारा द्यायची. पूनवेच्या रात्री ती एकदाच वाड्याबाहेर पडायची. अशा वेळी नजरवंतांना डोळ्यांना पट्‌टी बांधून बंद घरात बसून राहण्याच्या सूचना असायच्या. तिचा रथ पाखरांची मैफल सजलेल्या झाडीपासून नेहमीच जायचा. चंद्रदवांत भिजल्याने अलमस्त अवस्थेत त्याने तिच्या विहाराची सूचना ऐकली नाही. पाखरांच्या थव्यात बसून त्यांच्याच नजरेने त्याने तिला बघितले आणि परागंदा अवस्थेत ही पाखरं दरवर्षी गायब का असतात, हे त्याला कळलं.
 
तिच्यासवेच पाखरांचे थवे रानाबाहेर गेलेत. पानांच्या पापण्याआडून चंद्र बघणारं पाखरू आणि चोरून तिला बघितल्याने चकोर झालेला तो, दोघेच तिथे उरले. निपचित पाखराला निमूटपणे खांद्यावर बसवून तो वाटेला लागतो, तेव्हा कडकडत्या थंडीतली पहाट गारठलेल्या दवात न्हात असते. रानातल्या तळ्यात अशाच पहाटेला काही चंद्र आपले डाग धुण्याचा प्रयत्न करीत असताना त्यानं यापूर्वीही पाहिलं होतं. तळं केशरी उन्मुक्त अन्‌ चंद्र काजळलेले... चंद्रांच्या अशा केविलवाण्या अवस्थेचं त्याला पूर्वी आश्चर्य वाटत होतं, पण आज त्याच्याही हातून चोरून तिला बघण्याचा अलमस्त प्रमाद घडला होता. तळ्यापासून निघालेली पायवाट कस्तुरीची झाली होती. तिच्या देहातून ठिबकलेल्या पाण्याचे मोती पाखरांनी तंटे करून वेचले होते. तिच्या आठवणींचं दाट धुकं लपेटून तो गावात शिरतो तेव्हा सकाळ झाली असते. कापणीला आलेल्या शेतातील बुजगावण्यावर तो चंद्रवेड्या पाखराला ठेवून देतो. हंगाम असा गर्भश्रीमंत झाला असताना पाखरांनी रात्रीची गाणी म्हणायची नसतात. नाहीतर शेतकर्‍यांची राखणदार कुत्री गाण्याचा माग काढत पाखरू शोधून काढतात आणि नेमकं पाखरू गाठून ते धन्याच्या पायाशी टाकून ती कुत्री हातभर जीभ बाहेर काढून मोठ्या अभिमानानं बघत राहतात. रानाचा मालक मग अशा पाखरांचे पंख छाटून त्याला पिंजर्‍यात बंद करतो.
 
 
भगभगीत दुपारीही मालकाला हवी असतील तेव्हा चंद्ररात्रीची गाणी अशा बंदिस्त पाखरांना म्हणावीच लागतात. ऐन सुगीच्या दिवसांत आजकाल शेतकरी बंदिस्त पाखराचा पिंजरा शेतातल्या झाडावर टांगून ठेवतात. गळ्यात गाणी अन्‌ चोचीत भूक घेऊन मग पाखरं, हंगाम ऐन बहरात असतानादेखील अशा शेतांकडे फिरकत नाहीत. भरगच्च रानातले ओंजळभर दाणे वाचविण्यासाठी पाखरांच्या भुकेशी अन्‌ गाण्याशीही असा क्रूर खेळ करणं कसं वाईट आहे, हे शेतकर्‍यांना कुणी सांगावं, हा प्रश्न घेऊन पाखरांचे थवे गावावरून ऐन सांजेला उडत जातात, तेव्हा आभाळ चिवचिवत असल्याचा भास होतो. कणसांनी लगडलेल्या रानावरून आभाळ जागवीत उडणारे पाखरांचे थवे अन्‌ चंद्रवेड लागलेला, तिला चोरून बघताना चकोर झालेला माणूस यांच्यापासून सावध राहणं गावाला शिकवावं लागत नाही. तो दिवसभर नदीकाठच्या गुहेत दगडांवर तिची शिल्पं कोरीत बसतो. रात्री थकला की तिच्या कविता करतो. पाखरं त्याची गाणी गातात. रानात राबताना आलेला थकवा घालवायला गावाला विरंगुळा म्हणून ही गाणी हवी असतात. हंगाम चांगला झाला की, भरल्या पोटाच्या गावाला गुहेतली शृंगारलेणी आपलीशी वाटतात. पाखरांची सुरेल गाणी ध्वनिमुद्रित करून गाव सणासुदीला वाजवून घेतं, पण गावातला, डोळ्यांत चंद्र घेऊन फिरणारा फकीर अन्‌ ऐन हंगामात गावाला चोचभर दाणे मागणारी पाखरं नको असतात.
 
सखीच्या वेणीत कधीकधी चंद्र माळण्याइतकं हळवं होणारं गाव पोटाशी मात्र प्रामाणिक असतं. भुकेची तटबंदी भेदून कुणीच गावशिवेबाहेर पडत नाही. म्हणूनच अनाहूत येणारे पाखरांचे थवे अन्‌ चकोर झालेला तो, हेच फक्त भुकेच्या तटबंदीशी अडत नाहीत. गावानं पिढ्यान्‌पिढ्या राबून उभारलेली भुकेची अभेद्य तटबंदी सहज ओलांडणार्‍या जिवांना मात्र हळवेपणात उंबरेही अडवितात. हळवी पाखरं आणि चंद्रबावरा तो- यांना गावाने आसरा दिला, तर सारेच मोसम गावाचे असतात. गावाचा जेवढा सूर्याशी संबंध असतो, तितकंच घट्‌ट नातं चंद्राशीदेखील असतं. गावानं चंद्र अन्‌ सूर्याची वाटणी करू नये. गाव, आईच्या उदरात असताना चंद्रानंच त्यांना बळ दिलं आहे. म्हणून गावानं, पाखरांनी रान उष्टावल्याशिवाय कापणी न करण्याचा नियमच करून टाकावा...