"चंद्रपूर-गडचिरोलीतील 30 हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल"

    दिनांक :17-Oct-2019
नितीन गडकरी यांचा विश्वास 
 
 
चंद्रपूर, 
नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून प्रदूषणविरहित उत्पादन तयार करता येते. शिवाय त्यातून मोठा रोजगार उभा राहतो. उदबत्तीच्या काड्या आणि आईस्क्रिमचे चमचेही आम्हाला विदेशातून आयात करावे लागतात, हे दुर्दैव आहे. या परिसरात उत्तम बांबू आहे. त्यामुळे येथे ‘बांबू क्लस्टर’ तयार व्हावे. तसेच हा प्रदेश धान उत्पादनातही अग्रेसर असल्याने तणसापासून बायोडिझेलचे शंभर कारखाने उभे व्हावेत. या दोन्ही प्रकल्पासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी मी द्यायला तयार आहे. गडचिरोली-चंद्रपूर हे ‘बायो एव्हिएशन फ्युल’चे हब होऊ शकते. या सार्‍यातून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात येत्या काळात 30 हजार तरुणांना रोजगार मिळेल, अशी आशा भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
 
 
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपुरातील गवालपंची मैदानावर गुरुवार, 17 ऑक्टोबरला आयोजित जाहीर सभेत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ॲड्‌. संजय धोटे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, महंत जितेंद्र महाराज तथा भाजपात नव्याने प्रवेश करणारे सुदर्शन निमकर उपस्थित होते.
 
 
नितीन गडकरी यांनी, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तसेच चंद्रपूर महानगरात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. मुनगंटीवार यांनी एक उत्तम कार्यकर्ता, नेता आणि मंत्री म्हणून येथील जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केले आहे. त्यांना मी गेल्या 35 वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या कार्याची पद्धत सर्वोत्तम आहे. रचनात्मकवृत्ती ठेवणारा समाजसमर्पित असा हा नेता आहे. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षांत मोठी प्रगती केली आहे, असेही ते म्हणाले.
 
 
चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या 62 वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरुण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे. मात्र, येथील जनता गरीब राहिली. कारण 62 वर्षे या देशाला दूरदृष्टी असलेला नेता लाभला नाही, असा आरोपही गडकरी यांनी केला. काँग्रेसच्या प्रदीर्घ काळात चुकीच्या रूळावर गेलेली देशाची व राज्याची गाडी अवघ्या 5 वर्षांत योग्य मार्गावर येणे शक्य नाही. परंतु, आम्ही वेगाने आम्ही या गाडीला रूळावर आणत आहोत. कापसापासून सूत, सुतापासून तयार कपडे आणि त्यानंतर त्याचे विपणन करण्याची 40 कोटींची योजना असून, त्यात 20 कोटी सानुग्रह निधी दिला जाईल. 10 कोटी उद्योजकांनी गुंतवायचे आहेत, तर 10 कोटींचे कर्ज दिल्या जाणार आहे. अशा पद्धतीचे 13 क्लस्टर मंजूर करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.