कस्तुरचंद पार्कमध्ये सापडल्या ऐतिहासिक चार तोफा

    दिनांक :17-Oct-2019
 200 वर्षे जुन्या असल्याचा अंदाज
 लष्कराने घेतल्या ताब्यात
नागपूर, 
नागपूरच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या कस्तुरचंद मैदानात खोदकामादरम्यान बुधवारी रात्री जुन्या चार युद्ध तोफा सापडल्या. या घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी किल्लातील लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना लोकांना माहीत होताच बघ्यांची कुतूहलापोटी तेथे गर्दी जमली. या तोफा अंदाजे किमान 200 वर्षे जुन्या असून, मैदानात आणखी तोफा, युद्ध संबंधित वस्तू आढळतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कस्तुरचंद मैदानावर सौंदर्यीकरणाची कामे केली जात आहे. बुधवारी रात्री खोदकाम करत असताना 8.30 वाजताच्या सुमारास मैदानातील ऐतिहासिक चबुतर्‍याच्या शेजारी काम करणार्‍या कामगारांना अंदाजे साडेचार ते पाच फुटांवर अचानक या चार तोफा आढळल्या. कुतूहलापोटी आणखी खोदल्यावर सोबत तोफा ठेवण्यासाठी उपयोगात येणारे दोन स्टॅण्ड देखील आढळले. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी गुरुवारी सकाळपासूनच तोफा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
 
 
 
यापैकी दोन तोफा या 10 फूट लांब असून, उर्वरित दोन 9.5 फूट लांबीच्या आहेत. त्यांचे वजन जवळपास एक टन अर्थात 1000 किलोहून अधिक असण्याची शक्यता आहे. या चारही तोफा अंदाजे 200 वर्षांपूर्वीच्या असल्याचे सांगितले जात आहे. नागपूरचे संस्थानिक राजे भोसले आणि इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सीताबर्डी युद्धा दरम्यान या लांब पल्ल्याच्या तोफा इंग्रजांनी भोसलेंच्या विरोधात वापरल्या असण्याची शक्यता आहे. तेव्हा या तोफा ईस्ट इंडिया कंपनीकडून तयार करून घेण्यात आल्या असाव्यात. 1817 साली ही जागा इंग्रज- मराठा युद्धाची साक्षीदार होती. तसेच टेकडीचा भाग असल्यामुळे सध्याच्या मैदानात इंग्रजांनी तोफा तैनात केल्या होत्या. तोफ चालवताना ती उलटू नये म्हणून तेव्हा छोटे बंकर तयार केले जात असे. सीताबर्डी किल्ल्यावरून झालेल्या हल्ल्यात या तोफा जमिनीत दबल्या गेल्या असाव्यात, असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.
तोफा मिळाल्याची माहिती मिळाल्यावर सीताबर्डी किल्ल्यातील लष्कराच्या जवानांनी धाव घेतली आणि या चारही तोफा ताब्यात घेत सीताबर्डी किल्ल्यामध्ये नेल्या. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या कर्मचार्‍यांनी तोफांची पाहणी केली असून, सविस्तर संशोधन करून त्या किती वर्षे जुन्या आहेत, कधी आणि कुठल्या तोफखान्यात बनविण्यात आल्या, याबाबत माहिती काढली जाणार आहे. यावेळी उपस्थित वास्तुविशारद व हेरिटेज समितीचे सदस्य अशोक मोखा यांनी सांगितले की, खोदकामा दरम्यान सापडलेल्या तोफांची माहिती पुरातत्त्व विभाग, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली आणि नंतर त्या बाजूला काढून ठेवण्यात आल्या. लष्कराने तोफा नेण्याकरिता ट्रक बोलविले आणि क्रेनच्या मदतीने त्या ठेवण्यात आल्या.
आणखी तोफा सापडतील
सीताबर्डी किल्ल्याचा पायथ्याशी असणारे कस्तुरचंद मैदान हे भोसले आणि इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धाचे साक्षीदार आहे. त्याकाळी अनेक तोफा या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. कालांतराने टेकडी समतल झाली आणि यापैकी काही तोफा यात दबल्या गेल्या. त्यापैकीच या चार तोफा असू शकतात. त्यामुळे खोदकाम केल्यावर आणखी तोफा आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही.
- मुधोजी राजे भोसले
मध्यवर्ती संग्रहालयात ठेवणार
ऐतिहासिक कस्तुरचंद मैदानात आढळलेल्या तोफांबद्दल पुरातत्त्व विभागाद्वारे माहिती गोळा केली जात आहे. सध्या या चारही तोफा ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यात ठेवण्यात आल्या आहेत. या तोफा शहराचा वारसा आहेत. त्यामुळे सर्व शहानिशा केल्यानंतरच या तोफा मध्यवर्ती संग्रहालयात नागरिकांना बघायला ठेवण्यात येणार आहे.
- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी