याला जीवन ऐसे नाव...

    दिनांक :17-Oct-2019
नीता राऊत
 
दलाई लामा यांची काही वाक्यं वाचली की, माणूस आणि त्याची मानवीय विचारधारणा त्यांना फार आश्चर्यचकित करते. कारण माणूस आधी पैसा कमवण्याकरिता स्वत:च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग कालांतराने तेच स्वास्थ्य ठीक करण्याकरिता तोच कमवलेला पैसा खर्च करत राहतो आणि नंतर तो त्याच्या भविष्याच्या चिंतेत राहतो, ज्यामुळे तो वर्तमान काळात जगायचं विसरून जातो. माणूस असे जगायला आणि विचार करायला लागतो की, जसे तो कधी मरणारच नाही! या सगळ्यात त्याचं जगायचं राहूनचं जातं आणि ज्याची त्याला कधीच जाण होत नाही. 

 
 
हे सगळं वाचल्यावर खरंच वाटते की शेवटी जीवन, त्यातला आनंद, त्याची मजा, खरेतर त्याचा प्रवास जो असतो त्याच्यातच आहे. अंत सगळ्याचा एकच आहे, पण प्रवास मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. हां, आता कोणी पदयात्रा करतो म्हणजेच अति कष्टाचे दिवस, तर कोणी ट्रेनने प्रवास करतो म्हणजेच बर्‍यापैकी चांगले दिवस. कोणी बसने तर कोणी विमानाने प्रवास करतो. अर्थात जो विमानात प्रवास करतो त्याचे सगळे चांगले दिवस असतात. पण, विमानात प्रवास करायला यायच्या आधी पदयात्रा, बस, ट्रेनमध्ये प्रवास करवाच लागतो म्हणजेच माणसाला मेहनत, अधिक मेहनत आणि मेहनत करावी लागते. मेहनतीला पर्याय नसतोच.
 
 
आयुष्याच्या कोणत्याही प्रवासात खडतर परीक्षा ही होतेच. मग माणूस पदयात्रा करो वा कारमध्ये असो. ते कधीच संपणार नाहीत. फक्त त्यांचे स्वरूप बदललेल. अडचणी, त्रास या सगळ्या गोष्टी जीवनाचा भागच आहे, त्यापासून पृथ्वीतलावरचा एकही माणूस सुटला नाही.
 
 
फार थोडा वेळ आणि फार थोडी माणसं अशी असतात, जी आपल्या सोबत असतात. बस, अशाच लोकांसोबत जगणे, त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांना जपणे आणि आयुष्यात जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टींचा आनंद उपभोगता येईल तो उपभोगून घेणे, यातच जीवनाचा सार आहे...