संयमी आयुष्य

    दिनांक :17-Oct-2019
अंजली आवारी
 8600291527
 
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गती पाहता ती वेगवेगळी असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण वेगळ्या गतीने मार्गक्रमण करीत असतो. कधी आपण मेट्रोच्या वेगाने एक एक शिखर सर करीत जातो, तर कधी बैलगाडीच्या वेगाने आयुष्याचा गाढा ओढावा लागतो. असेच, आयुष्यात कुठेतरी नियंत्रण येण्यासाठी संयमाची गरज असते. 

 
 
‘संयम’ हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. विशेषत: प्रेरणादायी पुस्तकांत िंकवा व्याख्यानात याचा नेहमीच वापर होतो व यशाची मुख्य गुरुकिल्ली म्हणून या शब्दाला फारच महत्त्व आहे. जीवनात तुम्ही सर्वकाही प्राप्त करू शकता. परंतु, त्यासाठी एक योग्यवेळ यावी लागते व ही योग्य वेळ येण्यासाठी संयमाने वाट पाहावी लागते. आयुष्याची हीच खरी कसोटी असते. आपल्या मनातील इच्छा-आकांक्षा या आपल्याला हव्या तशा व हव्या त्यावेळीच पूर्ण होतील असेही नाही. मग, त्या पूर्ण होण्यासाठी अथक परिश्रम आणि पूर्ण होईपर्यंतचा संयम या गोष्टी कराव्याच लागतात.
 
 
आजकालच्या या वेगवान आयुष्यात आपणाकडे संयमच तर नाही. मागितलं की वस्तू हजर. पण, असं झालं नाही की पर्यायाने आपल्या पदरी निराशा पडते. त्या निराशेला काही व्यक्ती योग्य रीत्या हाताळून त्यातूनही मार्ग काढतात, तर काही निराशेच्या जाळ्यात अडकतात.
 
 
त्यामुळे आयुष्यात ‘संयम’ हवाच. पंरतु, कधीकधी तुमच्या या संयमीवृत्तीचा इतर लोकांकडून गैरफायदाही घेतला जातो. त्यामुळे संयमाचा वापर कुठे व कसा करायचा, हेही कळायला हवे. उदाहरणार्थ, एखादी अनुभवी व्यक्ती आपणास अक्कल शिकवीत असेल तर ते आपल्याला आवडत नाही व पटत त्याहूनही नाही. परंतु, केवळ त्या व्यक्तीचा सन्मान म्हणून आपण आपल्या रागावर ठेवलेला संयम हा अगदी योग्य ठरेल. या विरुद्ध जर एखादी वयोवृद्ध व्यक्ती एखाद्या मुलीची छेड काढत असेल, परंतु ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे म्हणून त्या व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टी सहन करणं म्हणजे चुकीच्या ठिकाणी संयम दाखविण्याचे उदाहरण ठरेल.
 
 
म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता त्या गोष्टीचा समतोल आयुष्यात साधणे व आयुष्य सुकर करणे फार महत्त्वाचे आहे.
हल्ली आपला स्वभावच झालाय्‌ की, आपण एखादी गोष्ट केली तर ती फारच करतो अथवा करीतच नाही. त्यामुळे आपला आपल्या आयुष्यातील समतोल बिघडतोय्‌. पर्यायाने त्यामुळे आयुष्य विस्कटतंय्‌. हे विस्कटलेलं आयुष्य सावरायचं असेल तर त्यावर संयम हेच एकमात्र औषध आहे. कारण संयमात आपल्या अपेक्षापूर्तीसाठीची इच्छाही असते व त्या पूर्ण होईपर्यंत वाट बघण्याची तयारीसुद्धा असते. त्यामुळे यशस्वी व्यक्ती नेहमी संयमाच्या दिशेने मार्गक्रमण करतात व आपल्या ध्येयाची पूर्ती करतात.
 
मित्रांनो, संयमी आयुष्य जगा. पण, तो संयम कुठे व कसा वापरायचा, याचे भानसुद्धा असू द्या.