विधानसभा निवडणुकीत ‘हरहर महादेव...’

    दिनांक :17-Oct-2019
दिल्ली वार्तापत्र
शामकांत जहागीरदार
 
महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीला आता फक्त चार दिवस उरले आहेत. 21 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांत मतदान होत असल्यामुळे, प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. या दोन्ही राज्यांतील निवडणुकीचा निकाल मतमोजणीआधीच जनतेला समजला आहे.
 
 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या झटक्यातून काँग्रेस अद्यापही सावरली नाही. त्याचे प्रतिबिंब या दोन राज्यांतून दिसते आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे भाजपासमोर या दोन राज्यांत आपली सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. मात्र, गंमत म्हणजे या दोन्ही राज्यांत भाजपासमोर आव्हान उभे करायलाही काँग्रेस वा अन्य विरोधी पक्ष नाही. 
 
 
लोकसभा निवडणुकीत तरी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भाजपासमोर काही प्रमाणात आव्हान उभे केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात आणि काँग्रेसच्या नेतृत्वात काही प्रमाणात आत्मविश्वास आणि लढण्याची जिद्द दिसत होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आपल्या आत्मविश्वासासोबत लढण्याची जिद्दही गमावली आहे.
 
 
उलट, काँग्रेस पक्षातील गटबाजी प्रचंड वाढली आहे. कोणतीही सत्ता नसताना काँग्रेस पक्षातील नेते आपसातच भांडत आहेत, एकदुसर्‍याचे कपडे फाडत आहेत. कारण, काँग्रेसच्या नेतृत्वाची पक्षावरची पकड सुटली आहे. राहुल गांधी महाराष्ट्र आणि हरयाणात काँग्रेसचा प्रचार करत असले, तरी त्यांनी पक्षातील घडामोडीपासून स्वत:ला बाजूला केले आहे. तुम्ही काहीही गोंधळ घाला, मी हस्तक्षेप करणार नाही, वा बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
 
 
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आपल्या तब्येतीमुळे तसेच राहुल गांधींमुळे त्रस्त आहेत. नेतृत्वानंतर ज्यांच्यावर पक्ष सांभाळण्याची आणि चालवण्याची दैनंदिन जबाबदारी आहे, त्यांनीही आपले हात झटकले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे ठप्प झाला आहे. कोणीच पक्षाच्या नेतृत्वाला जुमानत नाही. कारवाईची भीतीही कुणाला राहिली नाही. उलट, पक्षाने कारवाई करत काढून टाकले तर चांगलेच आहे, त्यामुळे भाजपात जाण्याचा तरी आपला मार्ग मोकळा होईल, असे सगळ्यांना वाटत आहे.
 
 
देशातील इनमीन तीन-चार राज्यांत काँग्रेसची सत्ता उरली आहे, मात्र तेथील काँग्रेसची सरकारे ही अस्थिर झाली आहेत. कोणत्याही क्षणी ही सरकारे कोसळतील, अशी स्थिती आहे. भाजपामुळे काँग्रेसची ही सरकारे अस्थिर झाली नाही, तर काँग्रेसच्या नेत्यांमुळेच अस्थिर होत आहेत. मध्यप्रदेशात आपल्याच सरकारविरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दंड थोपटले आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या राज्यातील कमलनाथ सरकारने, शेतकर्‍यांचे फक्त 50 हजार रुपयेच कर्ज माफ केले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. हा आरोप खरा असल्याचे कमलनाथ यांनीही मान्य केले आहे. एकंदरीत राहुल गांधी आणि कमलनाथ सरकारने शेतकर्‍यांची या मुद्यावरून फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत.
 
 
मुळात मध्यप्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाने कमलनाथ यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना माघार घ्यावी लागली. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद तरी आपल्याला मिळावे, अशी शिंदे यांची अपेक्षा होती, मात्र कमलनाथ दोन्ही पदे आपल्याकडे घेऊन बसले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांना अध्यक्ष होऊ देण्याची कमलनाथ यांची तयारी नाही, त्यांना काँग्रेसचे दुसरे वाचाळ नेते दिग्विजयिंसह मदत करत आहेत, त्यामुळे शिंदे दुखावले गेले आहेत.
 
 
मध्यंतरी शिंदे यांच्या होर्डिंग्जवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे छायाचित्र होते. लोकसभा निवडणुकीपासूनच शिंदे भाजपात येणार अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे उद्या ज्योतिरादित्य शिंदे भाजपात आले तर आश्चर्य वाटणार नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी विजयाराजे शिंदे भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी आहे, तर दोन्ही आत्या भाजपाच्या नेत्या आहेत, त्यामुळे भाजपा आणि भाजपाची विचारधारा शिंदे यांच्यासाठी नवीन नाही.
 
 
राजस्थानची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. राजस्थानात काँग्रेसने सचिन पायलट यांना डावलत अशोक गहलोत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले. उपमुख्यमंत्रिपद मिळूनसुद्धा सचिन पायलट समाधानी नाहीत, गहलोत यांना अडचणीत आणण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. शह आणि काटशहाचे राजकारण दोघांमध्ये सातत्याने सुरू असते. त्यामुळे तेथील सरकारही अस्थिर आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे राहुल गांधींचे जवळचे सहकारी होते. पण, आता या दोघांनीही राहुल गांधींपासून स्वत:ला दूर केल्यासारखे दिसते आहे.
 
 
तीन-चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका असलेल्या राजधानी दिल्लीतील चित्र वेगळे नाही. दिल्लीतील काँग्रेस गटबाजीने पोखरली आहे. नुकतेच निधन झालेल्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शीला दीक्षित आणि प्रदेश काँग्रेसप्रभारी पी. सी. चाको यांच्यातील मतभेद सर्वांनाच ठाऊक होते. शीला दीक्षित यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व आल्यानंतर चाको यांनी प्रभारीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आजारी असलेल्या शीला दीक्षित यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलली. काँग्रेसला नाइलाजाने पुन्हा चाको यांच्याकडेच प्रभारी पदाची सूत्रे सोपवावी लागली.
 
 
शीला दीक्षित यांचे पुत्र आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांनी आपल्या आईच्या मृत्यूसाठी चाको जबाबदार असल्याचा लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवली. या वादात शीला दीक्षित आणि चाको यांच्या समर्थकांनी तेल ओतले. त्यामुळे दिल्लीत काय करावे, कुणाला अध्यक्ष करावे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला पडला. मध्यम मार्ग म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाने भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या कीर्ती आझाद यांना दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यालाही पक्षातून मोठा विरोध झाल्यामुळे या निर्णयाची घोषणा करता आली नाही.
 
 
हरयाणातील गटबाजीने पोखरलेली काँग्रेस भाजपाशी नाही तर आपसातच लढत आहे. प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत, माजी मुख्यमंत्री भूिंपदरिंसह हुडा यांच्यावर हल्ला चढवला आहे. हुडा आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी प्रदेश काँग्रेस पूर्णपणे हायजॅक केली आहे. अशोक तंवर यांचा गट हुडा गटाला पराभूत करण्यासाठी कामाला लागला आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा भाजपाला मिळणार आहे.
 
 
महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थितीही हरयाणापेक्षा वेगळी नाही. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढत असले, तरी त्याने फार फरक पडणार नाही. काँग्रेस आपला पराभव टाळू शकणार नाही. महाराष्ट्रात तर काँग्रेसजवळ नेतृत्वच नाही! विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे वय झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून ते अद्यापही सावरले नाहीत.
 
 
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी काँग्रेसला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनीही मुख्यमंत्रिपद सांभाळले असले, तरीपण हे दोघेही कधी लोकनेते नव्हते. चव्हाण नांदेडबाहेर, तर पृथ्वीराज चव्हाण कराड-साताराबाहेर नेते होऊ शकले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना नेते मानले नाही. निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व सोपवून काँग्रेसच्या नेतृत्वाने राज्यातील काँग्रेसच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला आहे.
 
 
हरयाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत एकतर्फी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पन्नासचा आकडा तरी गाठतील की नाही, याबाबत शंका आहे. भाजपा आणि शिवसेना महाराष्ट्रात सव्वादोनशेपर्यंत, तर हरयाणात भाजपाने स्वबळावर 70 चा आकडा गाठला, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
 
9881717817