बालगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

    दिनांक :17-Oct-2019
उमरखेड, 
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुदेव गोरोबा स्मारक समितीच्या बालगृहातील 67 अनाथ मुला-मुलींना शालेय वह्यांचे वाटप केले. यंदाचे वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एकशे पन्नासावे जन्म वर्ष आहे. याचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. आंतरिक गुणवत्ता शाश्र्वती समितीच्या अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. वद्राबादे यांच्या मार्गदर्शनात नॅक समन्वयक प्रा. डॉ. बोंपिलवार आणि सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभाग व योगदानातून हा उपक्रम राबवला.
 
 
 
याप्रसंगी गुरुदेव गोरोबा स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धामणकर, बालगृहाचे कर्मचारी रवींद्र काळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. अभय जोशी व वाणिज्य विभागाचे प्रा. किशोर नवसागरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. एम.ए. मराठी व एम. कॉमच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.