साहित्यिक डॉ. गिरीश खारकर यांचे निधन

    दिनांक :17-Oct-2019
 
 
अमरावती, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथील मराठी विभाग प्रमुख, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक, मराठी गजलकार डॉ. गिरीश खारकर यांचे आज दुपारी नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुपारी 12 च्या सुमारास निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. अमरावतीवरून आले असता नागपूर विमानतळावरून ते बॅकांकला जाणार असल्याचे वृत्त आहे. एक हरहुन्नरी, प्रतिभावंत लेखक, प्रकाशक, मित्रांचे जीवलग, आवडते प्राध्यापक असणार्‍या डॉ. खारकर यांनी चंद्राला फुटले पाय या बालकविता संग्रहच्या माध्यमातून आपली सुरुवातीला 92 च्या काळात ओळख निर्माण केली होती. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळातर्फे माझ्यातला मी हा त्यांचा गजलसंग्रह प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी साहित्यक्षेत्रात मोठी भरारी घेतली होती. एमए नेट उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे झाली. तिथेच कार्यरत असताना त्यांनी पीएचडी केली. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके प्रकाशित असून हल्लीच त्यांचा एक कथासंग्रह प्रकाशित झाला होता. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर त्यांची नियुक्तीही झाली होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने अमरावती साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, दोन भाऊ आणि बराच मोठा मित्र परिवार आहे.