अभिनेत्रीची पहिलीच पोस्ट अन् अकाऊंट झाले क्रॅश

    दिनांक :17-Oct-2019
सोशल मीडिया हे प्रसिद्धीचे सर्वात सोपे माध्यम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटी मंडळी चर्चेत राहाण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर करतात. गेल्या काही काळात सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की जे सेलिब्रीटी आजवर सोशल मीडियाचा विरोध करत होते. त्यांनी देखील आता ट्विटर व इन्स्टाग्रामसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर आपले अकाऊंट्स धडाधड सुरु करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत आता अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचे देखील नाव जोडले गेले आहे.

‘डिरिल्ड’, ‘ब्रूस ऑलमायटी’, ‘द बाऊंटी हंटर’, ‘फ्रेंड्स’ यांसारख्या चित्रपट व मालिकांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचे प्रदर्शन करणाऱ्या जेनिफरने सोशल मीडियाचा जोरदार विरोध केला होता. परंतु आता ती देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेनिफरची पहिली पोस्ट पाहण्यासाठी लाखो लोकांनी एकाच वेळी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर उड्या मारल्या परिणामी अकाऊंट क्रॅश झाले. नेटकरी अकाऊंट क्रॅश झाल्यानंतरही थांबले नाहीत. अकाऊंट सुरु केल्यानंतर पहिल्या पाच तासातच जेनिफरने तब्बल १०२ कोटी फॉलोअर्स मिळवले आहेत.
या नव्या विक्रमामुळे तिची नोंद ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये देखील केली गेली आहे. याआधी हा विक्रम प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्केल यांच्या नावावर जमा होता. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पाच तास ४५ मिनिटात १० लाख फॉलोर्सचा टप्पा गाठला होता. आता हा विक्रम जेनिफरच्या नावावर जमा झाला आहे.