गर्ल्स चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

    दिनांक :17-Oct-2019
मुंबई,
'गर्ल्स' या आगामी सिनेमाच्या पोस्टरमुळे वादंग उठल्यानंतर या सिनेमाचा टीझर काय नवं घेऊन येईल याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. 'आईच्या गावात...बाराच्या भावात' असं म्हणत 'गर्ल्स' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

 
 
मुलींची धमाल, त्यांचे गॉसिपिंगचे विषय, त्यांची जगण्याची संकल्पना अशा मुलींशी संबंधित बऱ्याच गोष्टी या अनेकदा त्यांच्यापुरताच मर्यादित असतात. त्याची कल्पना इतरांना नसते. त्यामुळे मुली लाईफ एन्जॉय करतच नाहीत, असा अनेकांचा समज असतो. हाच गैरसमज टीझर पाहून दूर होतो. टीझरच्या सुरुवातीलाच 'गर्ल्स'ची ओळख करून देताना 'बॉईज' दिसतात. मुली मुलांसारख काहीच करू शकत नाहीत असं वाटणाऱ्या या सगळ्या 'बॉईज'च्या विचारांना छेद देण्यासाठी या 'गर्ल्स' सज्ज झालेल्या दिसतात. मनमुराद जगणे, राडा घालणे, धमाल-मस्ती करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना या तिघी 'गर्ल्स' टीझरमध्ये दिसत आहेत. सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद लुटत 'हम भी किसीसे कम नही' अशाच काहीशा अंदाजात या 'गर्ल्स' दिसत आहेत. त्यामुळे मुलींच्या भावविश्वात डोकावण्याची संधी या चित्रपटामुळे मिळणार आहे.
'गर्ल्स' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केलं असून 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत आणि 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.