सारा आणि कार्तिकच्या नात्याला सैफचा हिरवा कंदील!

    दिनांक :17-Oct-2019
मुंबई,
सध्या चर्चेत असणारी जोडी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. विमानतळावर एकमेकांना सोडायला किंवा डिनरला, अशा अनेक ठिकाणी हे दोघं एकमेकांबरोबर असतात. आता त्यांच्या या नात्याला साराच्या वडिलांनी अर्थात अभिनेता सैफ अली खाननं हिरवा कंदिल दाखवल्याचे वृत्त आहे.
 
 
'ईटाइम्स' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सैफने सारा आणि कार्तिकच्या नात्याविषयी त्याची भूमिका मांडली. 'सारा माणूस म्हणून अतिशय सुंदर आहे. तिला तिच्या आयुष्यात काय करायचे आहे आणि काय नाही याची तिला समज आहे. तिला नेहमीच चांगली माणसं आवडतात. त्यामुळे जर साराला तो (कार्तिक आर्यन) आवडतो याचा अर्थ तो नक्कीच एक चांगला माणूस असेल' असं सैफ म्हणाला.
अभिनेत्री सारा खान करण जोहरच्या टॅाक शो 'कॉफी विथ करण' मध्ये आली होती. त्यावेळी कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल,' असं बिनधास्त वक्तव्य तिनं केलं होतं. त्यानंतर कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही जोडी लवकरच पडद्यावर झळकणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 'लव्ह आज कल' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. पडद्यावर त्यांचं प्रेम दिसेलच, पण त्याआधी त्यांच्यात काहीतरी शिजतंय असं बोलणं सुरू झालं.
या सिनेमाच्या चित्रीकरणानिमित्त सारा आणि कार्तिक हिमाचल प्रदेशमध्ये होते. तिथे या सिनेमाचा बराचसा भाग शूट केला गेला. तिथले त्यांचे खूप फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यातले काही फोटो चित्रीकरणातले असले, तरी आणखीही काही फोटो असे आहेत ज्याची खूप चर्चा आहे. दोघांचेही तिथल्या पारंपरिक वेशभूषेतले फोटो असे आहेत ज्यात ते दोघेही खूप सुंदर दिसताहेत. सिनेमाचं चित्रीकरणही पूर्ण झाल्यावरही ही जोडी अनेकदा एकत्र दिसली. अलीकडेच एका मुलाखतीत सारा कार्तिकविषयी भरभरून बोलली. ती म्हणाली, 'कार्तिक उत्तम अभिनेता आणि सहकलाकार आहे. त्याबरोबरच तो विचारी आहे. त्याच्यासोबत काम करणं छान अनुभव आहे.'