सुनील शेट्टीचे हॉलिवूड चित्रपटात पदार्पण

    दिनांक :17-Oct-2019
बॉलिवूडमधील नामांकीत अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा सुनील शेट्टी गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून दूर आहे. परंतु त्याने आता पुन्हा एकदा आपले लक्ष अभिनयाच्या दिशेने वळवले आहे. मात्र सुनिल बॉलिवूडमधून नव्हे तर चक्क हॉलिवूड सिनेसृष्टीतून पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. सुनिल शेट्टी लवकरच आता एका हॉलिवूडपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘कॉल सेंटर’ असे आहे. या चित्रपटात सुनिल एका शीख पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
 
 
 
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतातील एका कॉल सेंटर कंपनीने तब्बल ३८१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा घोटाळा केला होता. हे कॉल सेंटर फोनच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फसवत होते. हा घोटाळा एका शीख पोलिस अधिकाऱ्याने उघडकीस आणला होता. याच प्रकरणावर कॉल सेंटर या चित्रपटाची पटकथा आधारित आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक Jeffery Chin याने स्विकारली आहे. सुनिल शेट्टीचा हा आगामी चित्रपट इंग्रजी बरोबरच हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे. सध्या चीनमध्ये कॉल सेंटरचे चित्रिकरण सुरु असुन पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये कॉल सेंटर प्रदर्शीत होईल असे म्हटले जात आहे.