दिवाळीत पैशांचे नियोजन!

    दिनांक :18-Oct-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
"वहिनी, पाकीट भरलं माझं!’’ घरकाम करणार्‍या आमच्या नंदा ताईंच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मी नेहमीपमाणेच कामात होते. कसल्याशा कुरिअर पाठवण्याच्या नादात होते. दिवाळी येणार. दिवाळीच्या भेटवस्तू पाठवण्याचं काम होतं. पाकिटाला फेव्हिकॉल लावता लावता एकाएकी माझा हात थांबला. नंदा ताईंच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या- ‘‘वहिनी, आज सगळ्या जणींनीच पगार दिला. दिवाळीपण दिली ना..पाकीट भरलं माझं.. त्यांच्याजवळचं पाकीट अगदीच छोटं होतं. त्यामध्ये हजाराच्या पाच-सात नोटा होत्या.’’ 

 
 
एके काळी, सगळी घरं आणि दरवाजे सारखेच दिसतात म्हणून त्यांची कै क कामं सुटली. नवर्‍याच्या पक्षाघातामुळे भांडी, केर-लादी अशी घरकामं करू लागल्या. आज त्या धडपड करून मुलींना शिकवत आहेत. नात झाली तरी स्वत:चंच कौन्सििंलग करून घरच्यांनाही एक दृष्टी देत आहेत.. डिग्य्रा घेऊनही, सात पिढ्या घरात शिक्षणाचा वारसा असूनही अशी सकारात्मकता पांढरपेशा लोकांमध्ये आढळते का, ते जरा तपासावंच लागेल.
 
नंदा ताईंसारख्या ज्या स्त्रियांना सुधारणेची, शिक्षणाची संधीच मिळाली नाही, त्यांनी केवळ कामांच्या जोरावर आणि डोळसपणे जगाकडे पाहून एक सारासार विचार ग्रहण केला, ही कौतुकाची बाब नाही का.. एक अगदी छोटंसं पाकीट पैशानं भरून गेलंय्‌ म्हणून तृप्त झालेला जीव माझ्यासमोर उभा होता. कुठे मिळतो मनाचा इतका साधेपणा? कुठून वाहत येतो तृप्तीचा हा झरा मनामध्ये? यांना डॉलर, सोनं, काळा पैसा, जागतिक मंदी, घसरणारे पैशाचे मूल्य या कशाचाही गंध नसेल; पण असे अनेक जीव या देशात असावेत, तृप्त आणि समाधानी.. हे श्रेय आहे, त्या सर्वच साधुसंतांचं, ज्यांनी अविरत संतत्त्वाची शिकवण दिली. या भूमीतले ज्ञानेश्वर, तुकोबाराया, संत कान्होपात्रा, संत सखू.. या सार्‍याच संतांनी प्रतिकूलता, हाल सोसूनही त्यांच्या मनातला विठ्ठल कधीच सोडला नाही. राग सोडला, स्वार्थ सोडला, प्रसंगी आपला हक्क सोडला पण मनात रुजून, तिथेच वाढून, आकाशाला पार छेद देऊन आसमंतात भरून राहणार्‍या विठ्ठलाला त्यांनी कधीच सोडलं नाही.
 
 
आपण असतो का असे चिवट आणि निश्चयाने पक्के. निदान एका तरी तत्त्वासाठी, आपली अशी नितांत श्रद्धा असते का कुठल्या देवावर िंकवा माणसावर िंकवा घटनेवर? कारण वर वर हे दोन वेगळे दुवे वाटले तरी मला वाटतं की, मनाची प्रसन्नता आणि तृप्ती ही योग्य दृष्टिकोन, त्याग आणि आयुष्यात-काय क्षुल्लक समजून दुर्लक्षित करायचं, याची योग्य जाणीव यावर अवलंबून असते. तसंच महत्त्वाचं काय आहे, प्राधान्य कशाला दिलं गेलं पाहिजे, याचं वास्तविक भान-पुसटसं का होईना; पण असायला हवं. मिळायला फार अवघड असा मनुष्य जन्म मिळूनही याच जन्मामध्ये, याच जीवनामध्ये परमेश्वराला शोधण्यासाठी जो प्रयत्न करत नाही त्याचे अस्तित्व फोल (फुकट) आहे, असं रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं आहे. म्हणूनच सुशिक्षित समाज हा सुसंस्कृत राहणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. शिक्षण झालं आहे का, ते डिग्य्रांवरून ओळखता येतं; परंतु एखादी व्यक्ती सुसंस्कृत आहे का, हे त्याच्या जाणिवांवरूनच ठरतं.
 
 
दुसर्‍यानेे अशी जिवंत ठेवलेली जाणीव ही नेहमीच जीवन सुखकर करत असते. एखाद्या तरुण मुलाने आपल्याजवळचे महाजड सामान पाहून बसमध्ये सीट ऑफर करणं, कोसळत्या पावसातनं थकून घरी आल्यावर आलं घातलेला चहा चिरंजीवांनी खास आपल्यासाठी करणं, न मागता कलीगनं पुढं केलेलं पेन, दुकानदाराने मनकवडेपणाने बरोब्बर हवी तीच साडी पुढ्यात आणणं, ज्या हव्या त्याच फळं-भाज्या बायकोने न चुकता आणणं, दळण देताना चक्कीवाल्याने पिशवी बाहेरनं झटकून देणं, रेस्तरॉंमध्ये वेटरने न सांगता कॉफीसाठी एक्स्ट्रा कप समोर आणणं, अपेक्षा नसताना क्लायंटने अॅडव्हान्सचा चेक पाठवणं,
ऑफीस टूरवर गेलेल्या मित्राने सरप्राईज म्हणून सगळ्यांनाच मस्त शर्ट्‌स आणणं, लेकीने बाबांच्या शर्टला न सांगता इस्त्री करून ठेवणं, खूप कातर रडवेलं वाटत असताना गुलमोहराच्या पाकळीने हळून आपल्या गालांवरच ओघळून सांत्वन करणं, गर्लफ्रेंडची प्रचंड आठवण येत असतानाच नेमका तिचा एसएमएस येणं, बाबा भयंकर भडकणार असा आपला अंदाज साफ खोटा ठरून त्यांनी ड्रायव्हिंगचं लायसन्स देणं, मत्सर, असूया, कट-कारस्थानांशिवाय एखादी टीव्ही मालिका अस्तित्वात असणं..यालाही कधीकधी जीवन हेच नाव असतं.. असं वाट्याला येणारं जीवन हे जाणिवांनी रसरसलेलं असतं. असे जीवन जगण्यात खूप मज्जा असते आणि मीनाताईंसारखी भरलेली पाकिटं जवळ बाळगण्यात खूप गंमत असते.
संस्कृत शिक्षिका, महाल, नागपूर