दिवाळीच्या किल्लेदारांसाठी...

    दिनांक :18-Oct-2019
अवंतिका तामस्कर
 
 
दिवाळीला मोजून एक आठवडा राहिलाय्‌. येत्या 2/4 दिवसांत बच्चे मंडळीला सुट्यापण सुरू होणार. पुढल्या शुक्रवारी धन्वंतरी पूजन आहे आणि त्या दिवसापासून दिवाळीचा आरंभ होईल... जसे दिवाळी म्हटली, की-चविष्ट फराळासोबत भरपूर फटाके, भेटवस्तू या गोष्टी आल्या आणि याची तयारी आपण एक आठवड्यापासून सुरू करतो. आपल्या घरचे छोटे उस्ताद दिवाळीला एक गोष्ट खूप आवडीने करतात आणि ती म्हणजे- ‘दिवाळीतला किल्ला!’ तर ‘घरच्या गोष्टी’मध्ये आज आपल्या घरच्या अंगणात करणार्‍या किल्ल्याबाबत छोट्या उस्तादांसाठी हा खास लेख- 

 
 
छोट्या दोस्तांनो, दिवाळी हा आपल्या सगळ्यांचाच आवडता सण. कुरकुकीत चकल्या, गोड गोड लाडू, मिठाई अशा चविष्ट फराळासोबत भरपूर फटाके, भेटवस्तू यामुळे दिवाळीत खूप धम्माल येते नाही का? आपण अजून एक गोष्ट खूप आवडीने करतो आणि ती म्हणजे दिवाळीतला किल्ला! पण आपल्या सगळ्याच दोस्तांना मनासारखा किल्ला बनवणं जमतच असं नाही. त्यामुळे दिवाळीसाठी खास किल्ला कसा बनवायचा, यासाठी काही टिप्स
 
 
किल्ला तयार करण्यासाठी पहिल्यांदा जागा निश्चित करा. तुमच्या घराच्या गॅलरीत किंवा बिल्डिंगच्या गार्डनमध्ये सगळी दोस्तमंडळी मिळून तुम्ही किल्ला बनवू शकता. किल्ला बनवताना आजूबाजूला थोडीशी जागा राखून ठेवा. म्हणजे तुम्ही त्यावर रस्ता किंवा बगिचा तयार करू शकता. विटा, लाल माती किंवा शाडूची माती याची जुळवाजुळव थोडीशी आधीच करून ठेवा. बिल्डिंगच्या गार्डनमधली माती तुम्ही वापरू शकता किंवा कुंभाराकडून ती विकत आणू शकता. तुम्ही जर विटांचा वापर करणार असाल तर मात्र तुम्हाला त्या खरेदीच कराव्या लागतील. किल्ला बनवण्याची सुरुवात करताना सर्वप्रथम या किल्ल्याचा पाया मजबूत करून घ्या. यासाठी तुम्ही दगड, माती आणि विटा एकमेकांवर रचून मजबूत पाया तयार करा. पण याआधी लाल मातीत पाण्यात भिजवून चांगली मळून घ्या.
 
 
माती आणि दगडांचा वापर करून हळूहळू किल्ल्याला मनपसंत आकार द्या. त्यात तुम्ही छोटी-छोटी भुयारं, घरं, खिडक्या, दारं, बुरूज बनवू शकता. बांधकाम झालं की, मग भिंतीना त्या मळलेल्या मातीनेच मुलामा द्या आणि एक दिवस तरी त्यांना तसंच ठेवा. दुसर्‍या दिवशी या भिंतींना आवडत्या रंगाने रंगवा. काडीपेटीच्या काड्यांचा वापर करून किल्ल्याची तटबंदी तयार करा. उरलेल्या जागेत मेथी, मोहरी, गहू पेरा. चार-पाच दिवसांनी त्याची छोटी छोटी रोपं तयार होतील. त्यामुळे आपला किल्ला खूपच आकर्षक दिसेल. किल्ल्याला नवा आधुनिक रंगरूप द्यायचं असेल तर साध्या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर तुम्ही मस्तपैकी डिझाईनपण काढू शकता. यासाठी शाळेत चित्रकलेसाठी वापरतात ते रंग वापरा. तुम्ही किल्ल्याच्या रस्त्यांवर छोट्या छोट्या बाहनंही ठेवू शकता. यामुळे आपला किल्ला अगदी आपल्या शहराच्या जवळचा वाटेल.
 
 
किल्ला तर तयार झाला पण दिवाळी संपेपर्यंत त्याचं संरक्षण करणं, हेदेखील महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी तर आपले मावळे सदैव तत्पर असतातच की! आपल्याला हव्या असणार्‍या या मावळ्यांच्या बाहुल्याही बाजारात विकत मिळतात. त्या आपल्याला हव्या तिथे किल्ल्यावर उभ्या करायच्या की मग शत्रूसुद्धा आपल्या किल्ल्याकडे नजर वर करून बघणार नाही. अशा या सुंदर किल्ल्यावर रात्री आईला किंवा ताईला छोटेसे दिवे ठेवायला सांगा. आपण इतक्या मेहनतीनं तयार केलेला किल्ला दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालेला बघताना आपल्याला कित्ती बरं वाटेल, नाही..?