बाबागिरीचे टप्पे

    दिनांक :18-Oct-2019
आनंद विनायक मोहरील
 
जिवाचा गोवा करायला गेलो होतो. गोवा म्हटले की, बाकी काही बोलायची गोष्टच नसते. गंगा नहाना है तो, गोवा जाके कुछ पाप करना जरुरी है! त्यातल्या त्यात मित्रांसोबत गोव्याची सहल असली तर खर्चाला सीमा नसतेच. चांगले आठ-दहा मित्र गेलो होतो गोव्याला. त्यासाठी चक्क कर्जच काढले होते. परंतु एकही हप्ता फेडता आला नाही. त्यामुळे बँकेतून सारखे फोन येत होते. भरीस भर आतेभाऊही पैशांचा तगादा लावत होता. मधल्या काळात ऑफिसमध्ये जाण्याच्या घाईत पडलो होतो. हात मोडला होता. त्यामुळे हॉस्पिटलचा खर्च जवळपास 15 हजारांच्या घरात गेला होता. बचतीची सवय नसल्यामुळे आतेभावाकडून हातउसने घेतले होते. आता भावालाही पैशांची अडचण आल्याने, त्याचेही सारखे फोन येत होते. जाम वैताग आला होता. कुठून तरतूद करावी, हेच समजत नव्हते. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एखादा गरीब करोडपती झाल्यास जो आनंद होईल, तसा मला झाला. एलआयसीतून पत्र आले होते. आपली पॉलिसी मॅच्युअर झाली आहे. अमक्या तारखेपर्यंत आपल्याला धनादेश प्राप्त होईल. चला, म्हटलं दोन्ही कर्जदार निपटतात, अगदी सहजपणे म्हणून जाम खूष होतो. गुरुवार माझ्या सुटीचा दिवस. त्याच दिवशी धनादेशाचीही वाट होती. धनादेश आल्यास त्याच दिवशी बँकेत जमा करतो म्हणून मी प्लॅन केला.
 

 
 
दारावरची बेल वाजली की असे वाटायचे पोस्टमन आला. सकाळी 11 च्या सुमारास बेल वाजली. आला रे बाबा धनादेश म्हणून मी धावतच दरवाजाकडे गेलो. दरवाजा उघडून पाहतो तर शेजारची कुळकर्णी बाई तडमडली होती. आली कशासाठी होती तर कांदे उधार मागायला. 100 रुपये किलो कांदे असताना, काहीच कसे वाटत नाही या बाईला मागताना, मी मनाशी पुटपुटलो. शेवटी दिले दोन कांदे आणि टलवलं एकदाचं. पुन्हा बेल वाजली. मी मनात विचार केला नक्कीच पोस्टमन असेल. आता दूधवाला तडमडला होता, बिल मागायला. मी तर चांगलाच संतापलो. का रे, तू 1 तारखेच्या दरम्यान का येत नाही? ही काय बिल मागायची तारीख आहे का? सध्या तर मी तुला एक पैसा देऊ शकत नाही. तू दोन्ही बिले पुढील महिन्यात ने, असे सांगून त्यालाही मी टलवले. पुन्हा दरवाजा लावून पोस्टमन येईल म्हणून सोफ्यावर पडलो होतो. तेवढ्यात बेल वाजलीच. आता नक्की आला धनादेश म्हणून मी टणकन उडीच मारली.
 
 
दरवाजा उघडला. नमस्कार, जय साईबाबा. मी देखील प्रतिसाद दिला, जय साईबाबा. बाबांची पालखी निघाली आहे शिर्डीला. काही दानधर्म करा. आता मात्र संताप अनावर झाला होता. समोर देवाचा वास्ता देऊन कुणी उभा असेल तर कोणत्याही परिस्थितीत त्याला नाही म्हणायचे नाही, हेच लहानपणापासून शिकविले गेले असल्याने मी नमते घेतले. शिर्डीला गेला होता का कधी? मी म्हटले नाही. बाबांनी तुम्हाला बोलावले आहे. एक वेळ दर्शन घेऊन या. साईबाबांच्या त्या निस्सीम भक्ताने सुरू केली भविष्यवाणी, तुम्ही कधीही खोटे बोलत नाही, खाल्ल्या अन्नाला जागता, म्हणूनच तुमचे शत्रू खूप आहेत. परंतु शत्रू तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. कारण बाबा तुमच्या पाठीशी आहेत. एक सांगतो कधी पायाची आडी मारून बसू नका. हा मुलगा आहे का तुमचा? हो. हा मुलगा भाग्यवान आहे. पुढे आई-वडिलांची सेवा करेल. बाबांच्या कृपेने या मुलाचे सारे काही व्यवस्थित होईल. मी आटोपते घ्यायचे ठरविले. कारण म्हटले हा साईबाबाभक्त फाफटपसारा वाढवीत चालला होता. मीच विषयांतर करीत, पालखी कधी चालली आहे शिर्डीला म्हणून विचारले. बाबांची मर्जी. त्यांच्या कृपेने काही कमी नाही आमच्याजवळ. मनात विचार आला, मग भक्त थांबला कशासाठी असेल? पुन्हा सुरू, बाबांच्या कृपेने आम्हाला काही कमी नसले तरी तुमच्यावर बाबांची कृपा सतत राहावी म्हणून दानधर्म करा. इतक्या वेळानंतर आता हा भक्त मूळ मुद्यावर आला होता. मी काहीएक विचार केला नाही आणि सरळ आत जाऊन 51 रुपये घेऊन आलो. विचार केला, गुरुवारचा दिवस आहे. कशाला नसती आफत विकत घ्यायची. 51 रुपये देताच समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया होती, आम्ही पैसे घेत नाही. महाराजांच्या भक्तांसाठी आम्ही जेवण तयार करीत असतो. द्यायचेच असतील 50 किलो गहू अथवा तांदूळ द्या. काय म्हणावे आता? मी म्हटले सध्या माझी आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. त्यामुळे 51 रुपयांमध्ये समाधान माना. निस्सीम भक्त पुन्हा सुरू झाला, आज गुरुवार म्हणजे बाबांचा वार आहे.
 
 
बाबांच्या दरवाजातून कधीही कुणी रिकाम्या हाताने गेला नाही. तुमच्या पाठीशी तर प्रत्यक्ष बाबा उभे असतानाही तुम्ही रिकाम्या हाताने मला पाठवाल का? ते काहीही असो, मी दिलेले 51 रुपये मनापासून दिले आहेत. त्यामुळे सहर्ष स्वीकारा. आतापर्यंत आम्ही पैसे घेत नाही म्हणणारा तो भक्त आता बारगेिंनगवर आला होता. निदान 151 रुपये तरी द्या, असे म्हणून तो आग्रह धरू लागला. परंतु माझी परिस्थितीच नसल्यामुळे मी 51 रुपयांवर अडून बसलो होतो. अखेर त्या भक्ताने माझ्या 51 रुपयांचा जिवाभावावर स्वीकार केलाच. हा स्वयंघोषित निस्सीम भक्त घरोघरी हीच री ओढतो, हे माहिती असतानाही मी 51 रुपये का दिले त्याला? या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की, वर्षानुवर्षे जोपासण्यात येत असलेली अंधश्रद्धा होय. साईबाबा, गजानन महाराज हे खरे संत होते. कपड्या, खाण्यापिण्याची शुद्ध नसलेले, भौतिक सुखांपासून कोसो दूर. परंतु या महान संतांच्या नावावर लुबाडणार्‍यांची संख्या खूप आहे. धार्मिकतेच्या नावावर लुबाडणार्‍यांची पोल खोल होणे गरजेचे आहे. परंतु ही होत का नाही, तर कारण तेच. अरे बापरे, गुरुवार साईबाबांचा दिवस. कशावरून या भक्ताच्या रूपात साईबाबा आपल्या घरी आले नसतील? खरे तर अशा लुटारूंच्या रूपात साईबाबा कधीच तुमच्यापर्यंत येणार नाहीत, हे माहिती असतानाही मन मात्र मानायला तयार नसते.
 
 
भारतात सगळा सोप्पा मार्ग धार्मिकतेच्या नावावर ठगविणे. ही झाली पहिली पायरी. येथूनच भोंदूगिरीचा मार्ग प्रशस्त होत जातो. तुमच्या घरापर्यंत येऊन साईबाबा, गजानन महाराज, देवीच्या नावावर लुबाडणार्‍यांचा पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यात आणखी एक पात्र समाविष्ट आहे ते म्हणजे देवीच्या भक्तिणींचे. या भक्तिणी फिरतात नवरात्रात. साईबाबांच्या पालखीवर पुरुषांची, तर आई जगदंबेच्या जोगव्यावर स्त्री भक्तिणींची मक्तेदारी अनेक वर्षांपासून आहे.
 
 
भूतबाधा, भानामती, ‘बाहेरचे’ वगैरे प्रकार उतरवून देणारे बाबा दुसर्‍या टप्प्यातील. या टप्प्यात खर्च थोडा वाढलेला असतो. या बाबांकडे जाणार्‍यांची संख्या अशिक्षितांची जास्त आहे. हे बाबा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन भोळ्याभाबड्या जनतेला लुटण्याचे काम करतात. या बाबांकडे गंडे, दोरे बांधून दिले जातात. कवटी, हाडे, िंलबू या शस्त्रांद्वारे हे बाबा भुताला पळवतात (हा या बाबांचा दावा). हे बाबा थोडे श्रीमंत. ‘बाहेरचे’ आहे. 10 हजार लागतील. िंलबू, हळद, कुंकू, नारळ मिळून 100 रुपये खर्च झाले तरी बाबांच्या खिशात 9900 रुपये जातात. असे बाबा खेड्यापाड्यात जास्त आढळतात. जनता भोळीभाबडी असल्यामुळे बाबांचे चांगलेच फावते. घरोघरी साईबाबांच्या नावावर फिरणार्‍यांजवळ एक तीन चाकी गाडी असते. त्या गाडीत साईबाबांची मूर्ती असते. या गाडीतून आलेले तीन-चार भक्त पायी फिरून (बर्‍यापैकी परिश्रम घेतात) पैसे, अन्नधान्य गोळा करतात. परंतु दुसर्‍या टप्प्यातील बाबांना मात्र फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.
 
 
आता तिसर्‍या टप्प्यातील बाबांबद्दल (स्वयंघोषित संत) विचार करू. हे ‘हायटेक’ (डिजिटल म्हणा हवे तर) बाबा बर्‍यापैकी शिक्षित असतात. (यांची बुद्धी मात्र भ्रष्ट झालेली असते.) विमानप्रवास, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये रहिवास, अंगात चांगले कपडे, मागे-पुढे भक्तांचा लवाजमा, बाबांच्या कीर्तन, प्रवचनाचा ‘हायटेक’ प्रचार अशी या स्वयंघोषित संतांची कार्यपद्धती असते. या टप्प्यातील बाबांच्या प्रवचनाला सुशिक्षितांची गर्दी होत असल्याचा अनुभव आहे. विमानप्रवास, वातानुकूलित खोलीत रहिवास, फिरायला महागड्या कार, हातोहाती देणारा भक्तवर्ग असा साधारण या स्वयंघोषित संतांची जीवनपद्धती सांगता येऊ शकते. का नाही सांगू शकणार बाबा त्यागाच्या गोष्टी? पण सत्यासमोर असत्य किती दिवस टिकून राहणार? म्हणूनच अलीकडील काळात तीन-चार स्वयंघोषित संतांची पोल खोल झाली. दोन-तीन स्वयंघोषित संत सध्या जेलची हवा खात आहेत. या बाबांचे का फावते? तर याला अंधश्रद्धा हे एकमेव कारण देता येणार नाही. (ब्लाईंड फालोअर) कुठलाही विचार न करता ऐकल्या, बोलल्या गेलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून अंधानुकरण करणार्‍यांची संख्या वाढल्यामुळेच हे प्रकार वाढीस लागले आहेत. बाबागिरी बंद करावयाची असेल तर भक्तांना डोळे सताड उघडे ठेवावे लागतील. साधीशी गोष्ट आहे, जो भौतिक सुख, मोह, माया यापासून दूर आहे, तो संत. गजानन महाराज, साईबाबा, संत गाडगेबाबा (स्वत: पहिले कृती करायचे आणि नंतर इतरांना संदेश द्यायचे) यांना खाण्याची शुद्ध नाही, कपड्यांची शुद्ध नाही, संपत्ती नाही. या संतांजवळ होते ते फक्त नामस्मरण, भक्तांच्या संकटसमयी धावून जाण्याची वृत्ती, भक्तांवरील संकट स्वत:वर ओढवून घेण्याची ताकद. त्यामुळेच या संतांचे लाखो, करोडो भक्त तर आहेतच, शिवाय खर्‍या संतांची ताकद आजही भक्तांसाठी काम करीत आहे. खर्‍या संतांनी फक्त देह ठेवला. आचारविचार अजूनही त्यांचे जिवंत आहेत.
 
 
कुणी विचारही केला नसेल की गीतेसारख्या पवित्र ग्रंथावरून उद्बोधन करणारा स्वयंघोषित संत गुन्ह्यात अटकेल म्हणून. या स्वयंघोषित संताचे विचार ऐकल्यानंतर ‘मुंह में राम बगल में छुरी’ असेल असे कुणीच म्हणू शकत नव्हते. इतक्या सफाईदारपणे हा संत विचार मांडायचा. साधारण तुमची प्रशंसा केली की, हुरळून जाण्याचा मानवी स्वभाव, त्यातल्या त्यात तुमच्या संकटाचे कुणी निवारण करून देण्याची हमी दिली तर तुम्ही हमखास त्याच्या मागे लागणारच. अगदी हीच मानवाची कमजोर नाडी अचूक ओळखण्याची कला या स्वयंघोषित संतांना असते. दोरे, गंडे बांधून दिले आणि सांगितले की, तुमचे संकट निवारण होईल तर कुणीही संकटात असलेला माणूस या स्वयंघोषित संतांना बळी न पडल्यासच नवल! अलीकडल्या काळात तर अशा स्वयंघोषित संतांची चांगलीच पोल खोल झाली. या स्वयंघोषित संतांनी भाविकांची नुसतीच मानसिक फसवणूक केली का, नाही. यातील जास्तीत जास्त स्वयंघोषित संत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकले आहेत. या स्वयंघोषित संतांची ठगेगिरी करण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. अमाप पैसा कमावणे, लैंगिक अत्याचार हे दुर्गुण यांच्यात आढळून आले आहेत. हे बाबा, स्वयंघोषित संतांवर अंकुश लावायचा असेल तर सर्वप्रथम अंधानुकरण करणे बंद करावे लागेल. अन्यथा हे स्वयंघोषित संत भौतिक, शारीरिक सुख भोगतच राहतील.
7218202502