लाखनी पोलिसांनी पकडली पावणेतीन लाखांची अवैध दारु

    दिनांक :19-Oct-2019

लाखनी,
राज्यातील निवडणूकीची रणधुमाळी जोरात असून आज शनिवारी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. यानंतर आता राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात झाली असतानाच लाखनी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी पिंपळगाव महामार्गावर केलेल्या कारवाईत 2.76 लाख रुपयांची देशी दारु जप्त केली आहे. निवडणूकीत या दारुचा उपयोग करण्यात येणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लाखनी पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिम्पलगाव हाइवेवरील कॉंग्रेसचे पंचायत सदस्य पंकज शामकुँवर यांच्या घरासमोर ट्रॅक्टर क्रमांक 36 जी 3335 ची तपासणी केली असता त्यात 2 लाख 76 हजार रुपयांच्या देशी दारुच्या 92 पेटया आढळून आल्या. ह्या पेट्‌या ट्रॅक्टरच्या ट्रॉलित लपवून ठेवल्या होत्या. तसेच या पेट्‌यांवर ताडपत्रीही झाकल्या होत्या व त्यावर बांबू ठेवले होते. हा ट्रॅक्टर पंकज शामकुँवर यांच्या मालकीचा असल्याचे तपासात उघड झाले असून ही दारु निवडणूकीत वाटपासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक संजय कोरचे करीत असून लाखनी पोलिसांनी भांदवी कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.