अग्नीहोत्र करताना...

    दिनांक :19-Oct-2019
हिंदू धर्मातल्या विविध परंपरांपैकी एक म्हणजे अग्निहोत्र. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक. अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं. अग्निहोत्राच्या माध्यमातून सूर्य आणि चंद्राद्वारे प्राप्त होणार्‍या उच्च शक्तीयुक्त ब्रह्मांड ऊ र्जेला योग्य पद्धतीने ग्रहण करता येऊ शकतं. अग्निहोत्राशी संबंधित बरंच संशोधनही करण्यात आलं आहे. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करायला हवं. अग्निहोत्राची वेळ साधण्यासाठी पंचागाची मदत घेता येऊ शकते. 
 
 
अग्निहोत्र करताना...
सूर्योदय तसंच सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात बुडवलेल्या अक्षता अग्नीमध्ये अर्पण केल्या जातात. यज्ञ करण्यासाठी तांब्याच्या चौकोनी भांड्यात अग्नी प्रज्वलीत केला जातो. यात गोवर्‍यांचा वापर केला जातो. अग्नीमध्ये दोनदा आहुती देताना वेदमंत्रांचा जयघोष केला जातो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी म्हणायचे दोन मंत्र आहेत.
 
 
सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम हा मंत्र सूर्योदयाच्या वेळी म्हटला जातो. तर अग्नये स्वाहा, अग्नये इदम न मम, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम हा मंत्र सूर्यास्ताच्या वेळी म्हटला जातो. अग्निहोत्रासाठी तांदूळ, गायीचं शुद्ध तूप, अर्ध पिरॅमिडच्या आकाराचं तांब्याचं पात्र आणि गोवर्‍या या वस्तूंची गरज असते. अग्निहोत्रामुळे आसपासचं वातावरण पवित्र होतं. अग्निहोत्रामागे वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे. त्यामुळे नियमितपणे अग्निहोत्र करायला हवं.