मंगरुळनाथ पोलिसांनी केली 48 किलो चांदी जप्त

    दिनांक :02-Oct-2019
मंगरुळनाथ,
पोलिसांनी 1 ऑक्टोबरच्या रात्री तर्‍हाळा येथील चेक पोस्टवर 48 किलो चांदी जप्त केली आहे. निवडणूक काळात मंगरूळनाथ पोलिसांची ही दुसरी कारवाई असल्याने चेक पोस्ट वरील पोलिस व ईतर विभागाचे कर्मचारी आता प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहेत.
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तर्‍हाळा फाट्यावर 1 ऑक्टोबर चे रात्री साडे आठ वाजताचे दरम्यान तेथील चेक पोस्ट वर पोलिस व एकात्मिक बालविकास विभागाच्या कर्मचार्‍यांनी वाहनांची तपासणी करीत असताना वाहन क्र. एमएच 29 एआर 5567 या टाटा झेस्ट या कारमध्ये  48 किलो चांदी आढळली. वाहन चालक चेतन गावंडे व मुद्देमाल मालक जिग्नेश जयंतीलाल हिंडोचा रा. यवतमाळ यांना विचारणा केली असता सदर चांदी ही यवतमाळ येथील व्यापार्‍यांची असून, त्यांच्या बिलाची तपासणी केली असता काही बिले मागील तारखेची तर काही बिलामध्ये तफावत आढळून आली असल्याचे मंगरूळनाथ पोलिसांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी 48 किलो चांदी किंमत 12 लाख व वाहन असा एकूण 17 लाख रुपयांचा माल जप्त केला.
वृत्त लिहेपर्यंत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनोद दिघोरे, एपीआय अतुल तांबे,पीएसआय सुषमा परांडे, पीएसआय अनिरुद्ध मोरे, डीबी पथक, एकात्मिक बाल विकास विभागाचे कर्मचारी यांनी केली आहे.