श्रावण घेवड्याचं पीक व्यवस्थापन

    दिनांक :02-Oct-2019
बाजारपेठेत असणारी चांगली मागणी आणि मिळणारा उत्तम दर यामुळे श्रावण घेवड्याचं उत्पादन शेतकर्‍यांसाठी किफायतशीर ठरत आहे. मात्र, अपेक्षित आणि दर्जेदार उत्पादनासाठी घेवड्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं ठरतं. मुख्यत्वे श्रावण घेवडा असं या पिकाचं नाव असलं तरी त्याची लागवड तीनही हंगामात करता येते. सर्वसाधारणपणे खरिप हंगामासाठी याची लागवड जुन, जुलै महिन्यात करतात. तर रब्बी हंगामासाठीची लागवड सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात केली जाते. उन्हाळी हंगामासाठी श्रावण घेवण्याची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. साधारणत: श्रावण घेवड्याच्या लागवडीसाठी प्रति हेक्टरी 40 किलो बियाणं पुरेसं होतं. याची लागवड टोकन पध्दतीनं केल्यास प्रति हेक्टरी बियाण्यात बचत होते. 

 
 
 
आपल्याकडील हवामानाचा विचार करता श्रावण घेवड्याच्या पुसा पार्वती, अर्का कोमल, फुले सुयश आदी लागवडीयोग्य मानल्या जातात. श्रावण घेवड्याच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन महत्त्वाची ठरते. या जमिनीचा सामू 5.5 ते 6 च्या दरम्यान असावा. या पिकास अतिथंड अथवा अतिउष्ण हवामान मानवत नाही. त्यादृष्टीने हवामान बदलाच्या काळात पीक संरक्षणासाठी योग्य उपाययोजनांवर भर द्यावा लागतो. श्रावण घेवड्याचा शेंगवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये समावेश होतो. या प्रकारातील हे कमी कालावधीत येणारं पीक आहे. साहजिक या पिकासाठी खतं, कीडनाशकं, मशागत आदींवरील खर्च तुलनेनं कमी राहतो. मात्र, या पिकावर मावा, शेंगा पोखरणारी अळी, खोडमाशी आदी किडींचा प्रादुर्भाव होतो. तसंच या पिकावर भुरी, तांबेरा, मर हे रोगही पडतात. त्यासाठी वेळच्या वेळी फवारण्या कराव्या.