हळदीची यशस्वी लागवड

    दिनांक :02-Oct-2019
राज्यात अलिकडे काही भागात हळदीच्या लागवडीवर शेतकरी विशेष भर देत आहेत. चांगलं उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने या पिकाची लागवड महत्त्वाची ठरत असल्याचं दिसून आलं आहे. साहजिक अन्यही भागातील शेतकर्‍यांनी हळदीच्या यशस्वी लागवडीचं तंत्र जाणून घेऊन त्याचा अवलंब करायला हवा. अर्थात, अपेक्षित उत्पादनासाठी हळदीच्या सुधारित जातींची निवड करणं महत्त्वाचं आहे. 

 
 
 
तसर्वसाधारणपणे हळदीच्या पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. पाण्याचा ताण किंवा अधिक पाणी या दोन्ही बाबी या पिकास मानवत नाहीत. हळदीच्या सुधारित जातींमध्ये फुले स्वरूपा (डी. टी. एस. 222), सेलम, राजापुरी आदींचा समावेश होतो. यातील फुले स्वरूपा जातीचं पीक मध्यम उंचीपर्यंत वाढतं. या जातीत प्रत्येक झाडाला दोन ते तीन फुटवे असतात. याच्या प्रत्येक कंदात सात ते आठ हळकुंडं असतात. तीी सरळ आणि लांब वाढतात. या हळकुंडांच्या गाभ्याचा रंग पिवळसर असतो. या जातीतील ओल्या हळदीचं सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 358.30 क्विंटल इतकं असतं. तर वाळलेल्या हळदीचं उत्पादन 78.82 क्विंटल प्रति हेक्टर इतकं असतं. सेलम जातीतील झाडांची पानं रूंद आणि हिरवी असतात. याची हळकुंडं, उप-हळकुंड जाड असतात. या हळकुंडांची साल पातळ असते. तसंच गाभ्याचा रंग गडद पिवळा असतो. या हळदीचं पीक परिपक्व होण्यास सर्वसाधारणपणे उ270 दिवस लागतात. या जातीची झाडं करपा रोगास बळी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यादृष्टीने रोग नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं ठरतं.
 
 
राजापुरी जातीची पानं रूंद असून त्यांचा रंग फिक्कट हिरवट असा असतो. या झाडांना येणार्‍या हळकुंडांची साल पातळ असून गाभ्याचा रंग पिवळा, गर्द पिवळा असतो. यातील कच्च्या हळदीचं उत्पादन साधारणपणे प्रति हेक्टर 240 ते 250 प्रति क्विंटल इतकं मिळतं. या जातींची झाडं करपा रोगाला बळी पडत असल्याचं दिसून आलं आहे. त्यादृष्टीने या जातीच्या हळदीची लागवड केल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजनांकडे लक्ष दिलं जायला हवं. या काही प्रमुख बाबी लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी हळद लागवडीचा पर्याय विचारात घ्यायला हवा.