बाळापुरात बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात दोन जखमी

    दिनांक :02-Oct-2019
अथक प्रयत्नांनतर अखेर बिबट्या जेरबंद
 
बाळापूर,
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील पातूर ,बाळापूर भागातील शेतशिवारात बिबट्या दिसून आल्याच्या घटना घडल्या होत्या.याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली होती. हे होत असतानाच बुधवार 2 ऑक्टोबरच्या पहाटे बाळापूर शहरातील बडामोमीन पुरा भागात अचानक बिबटया दिसल्याने तेथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.बिबट्या गावात आल्याच्या वार्तेने नागरिक सैरावैरा धावत असल्याने बिथरलेल्या बिबट्याने मार्गात सापडलेल्या दोघांवर हल्ला केला त्यात दोन जण जखमी झाले होते.अथक प्रयत्नांती अखेर दुपारी या बिबटयास वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पिंजर्‍यात जेरबंद केले आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
 
 
हा बिबट्या शे.मन्नान याच्या घरातील एका खोलीत घुसला तेव्हा मन्नान याने धाडस करून त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला व बिबट्यास कोंडले. ही माहिती येथील पोलिस व वनविभागाला देण्यात आल्यावर वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी दखल घेतली. अमरावती रेस्क्यू पथकातील शुटर अमोल गावणेर या जवानाने घराच्या जाळीतूून ट्रॅक्यूलायझेशन गन मधून बेशुद्ध करणारे इंजेक्शन बिबट्यास अचूक मारले. थोडावेळातच तो बिबट्या बेशुद्ध पडला व नंतर वनविभागाचे पथक आणि पोलिसांनी त्या घराला पिंजरा लावून जेरबंद केले. पकडलेल्या बिबट्याला अकोला येथे आणण्यात आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येईल असे वनविभागाने सांगितले आहे.
 

 
 
जवळच असलेल्या बाळापूर शहरातील बडामोमीन पुरा भागात अचानक काही नागरिकांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांत घबराट उडाली व बिबट्याला पाहण्यासाठी तसेच स्वत:ला वाचविण्यासाठी लोक धावत सुटले. या गडबडीने बिथरलेला बिबट्याही सैरावैरा धावत सुटला व त्याने काही नागरिकांवर हल्ला केला.
 
या मध्ये मो. अदनान दानिश, मो. हनीफ हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम बाळापूर व नंतर अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.या बिबट्याने परिसरातील काही घरामध्ये प्रवेश प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतू नागरिकांनी त्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला. भर रहिवासी वस्तीत तो घुसल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते.