अचलपूर- परतवाड्यात परिस्थिती नियंत्रणात

    दिनांक :02-Oct-2019
जमावबंदी काही काळासाठी शिथील
अफवा न पसरविण्याचे प्रशासनाचे आवाहन
शांततेसाठी संस्था, संघटनांचाही पुढाकार
 
परतवाडा,
अचलपूर- परतवाड्यात शांतता प्रस्थापित होत असून, बुधवारी दुपारी 3.30 ते सायंकाळी 6.30 दरम्यान जमावबंदीचा आदेश शिथिल करण्यात आला. दरम्यान, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांनी अचलपूरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. कुणीही अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी बुधवावरी अचलपूर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करून शांतता निर्माण होण्यासाठी आवाहन केले. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी पोपट अब्दागिरे यावेळी उपस्थित होते.
अचलपुरात घडलेल्या एका हिंसाचाराच्या घटनेमुळे कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली. तथापि, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने ती काही काळ शिथील करण्यात आली आहे. या काळात नागरिकांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
शहरातील घटनेला कुठलाही रंग देण्याचा प्रयत्न करू नये. सामाजिक सलोखा कायम ठेवावा. व्हाटस् अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडिया किंवा कुठल्याही माध्यमातून अफवा पसरविणे हा गुन्हा असून, अफवा पसरविणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी कुठलीही अफवा निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीसांना (07223) 220002 किंवा (0721) 2265041 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अब्दागिरे यांनी केले आहे.
 
शांततेसाठी विविध संघटनांचा पुढाकार
शहरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी विविध संस्था, संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. अचलपूर- परतवाड्यात शांतता निर्माण व्हावी व खोट्या अफवा पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन विविध संस्था, संघटनांकडून करण्यात येत आहे. अचलपूर- परतवाडा शहर ही व्यापारनगरी आहे. या शहराला सामाजिक सलोख्याची परंपरा असून, अफवांच्या माध्यमातून या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. आपल्या शहरातील शांतता कायम ठेवावी, असे आवाहन मराठी पत्रकार संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, सराफा असोसिएशन, ह. व्या. प्र. मंडळ हेल्पलाईन, मुव्हमेंट ऑफ पीस अँड जस्टिस, संकल्प सेवा समिती, भूमी बहुउद्देशीय मंडळ, पुनर्जीवन फाऊंडेशन यासह विविध संस्था, संघटनांनी केले आहे.