जोसलीन बेल बर्नेल इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ

    दिनांक :20-Oct-2019
डॉ. अच्युत देशपांडे
 
पोस्ट ग्रॅज्युएशन करीत असतानाच लावलेला शोध आणि त्याबद्दलचे नोबेल पारितोषिक मात्र तिच्या गाईडला, अशी दुर्दैवी घटना जिच्या आयुष्यात घडली, ती म्हणजे जोसलीन बर्नेल. जोसलीनचा जन्म उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथे झाला. तिचे वडील आर्माह वेधशाळेचे आर्किटेक्ट होते. त्यामुळे तिचा लहानपणाचा काळ तिथेच गेला. खगोलशास्त्रावरची पुस्तके वाचण्याचा नाद तिला तिथेच लागला. वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनीदेखील तिला या विषयात काम करायला उत्तेजन दिले. त्यामुळे भविष्यात खगोलशास्त्रामध्येच काम करण्याचा तिने निश्चय केला. 1965 मध्ये स्कॉटलंड विद्यापीठातून तिने भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि पुढील शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. प्रोफेसर अॅन्टोनी हेविश यांच्या हाताखाली तिने काम करायला सुरुवात केली. त्या दोघांनी मिळून 81.5 मेगाहर्टझ्‌ रेडिओ टेलिस्कोप तयार केली आणि ग्रह-तार्‍यांद्वारे प्राप्त होणार्‍या रेडिओसंदेशांचे विश्लेषण करायला सुरुवात केली. 

 
 
1967 मध्ये जोसलीन बर्नेल अगदी मैलभर लांब अशा टेलिस्कोपच्या िंप्रटआऊटचे निरीक्षण करीत असताना तिला काही वेगळेच असे विशिष्ट संदेश दिसले, ज्याला तिने नाव दिले ‘स्कर्फ.’ अतिशय जलद आणि नियमित दिलेले हे संदेश क्वासार्सवरून येत आहेत, असे वाटत होते. या रेडिओसंदेशामध्ये इतरही संदेशांची सरमिसळ असते आणि त्यांना वेगळं करणं अतिशय जिकिरीचं काम असतं. त्यांनी सॅटेलाईटचे संदेश, टीव्हीचे संदेश, इतर रडारचे संदेश सर्व वेगळे केले आणि मग त्या संदेशांचे विश्लेषण केले असता त्यांना असे आढळले की, हे संदेश अतिशय जास्त घनता असलेल्या संकुचित तार्‍यांकडून येत आहेत, जे स्वतःच्या अक्षाभोवती गिरक्या घेत असतात. अशा संकुचित तार्‍यांना नाव दिलं गेलं ‘पल्सार्स’ आणि ज्यांच्यापासून रेडिओसंदेश प्राप्त होतात त्यांना नाव दिलं गेलं ‘रेडिओ पल्सार्स.’ 1968 मध्ये जोसलीनने मार्टीन बर्नेल यांच्याशी विवाह केला. 1969 मध्ये तिला केंब्रिज विद्यापीठाची पीएच. डी.ची पदवी प्राप्त झाली.
 
 
जोसलीनचे पती सरकारी नोकरीत असल्यामुळे इंग्लंडच्या वेगवेगळ्या भागात त्यांना जावं लागलं. अर्धवेळ इथेतिथे नोकरी करण्यात तिचा बराच काळ खर्च झाला. पण, यादरम्यान तिने आपला स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास मात्र सोडला नाही आणि तार्‍यांपासून प्राप्त होणार्‍या स्पेक्ट्रमचे विश्लेषण करण्यामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले. साऊथम्पटन विद्यापीठात 1-10 एमईव्ही गॅमा रे टेलिस्कोप विकसित केली. लंडन येथील मुलर्ड स्पेस सायन्स प्रयोगशाळेत ती एक्स-रे अॅस्ट्रोनॉमी शिकवीत असे, तर एडिनबरो येथे इन्फ्रारेड अॅस्ट्रोनॉमी शिकवीत असे.
 
 
रेडिओ पल्सारच्या शोधामुळे 1974 चे नोबेल पारितोषिक अॅन्टोन हेविश यांना दिले गेले, पण त्याचे श्रेय मात्र जोसलीनला दिले गेले नाही. पण, नंतर मात्र जोसलीनला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. तिची निवड रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीची सदस्य म्हणून करण्यात आली. तिने पुढे त्याचं उपाध्यक्षपददेखील भूषवलं. अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे पारितोषिक, ओपेनहायमर पारितोषिक, मायकेलसन मेडल, हर्षील मेडल आदी अनेक सन्मान तिला प्राप्त झाले. इंग्लंडच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सची ती 2008 ते 2010 पर्यंत अध्यक्ष होती. तिच्या रेडिओ पल्सारच्या शोधामुळे खगोलशास्त्राच्या अभ्यासाचे एक नवीनच दालन उघडले गेले.
 
9404848496