ओटीपी मॅच होतो ना!

    दिनांक :20-Oct-2019
यमाजी मालकर
 
जग जेव्हा स्लोमोशनमध्ये बदलत होते, तेव्हा त्या बदलाचे पडसाद आधी पेपरात, मग पुस्तकात, सिनेमांत उमटत होते आणि मग बराच काळ ते लोकांच्या गप्पांचे विषय होत होते. आता बदलांना इतका वेग आला की जग वेगाने बदलते आहे, हे लक्षात येण्याआधीच आपण त्याचे भाग होऊन जात आहोत. गेल्या वर्षभरात असे काय बदलले आहे, याचा विचार केल्यावर लक्षात आले की, ज्या ओला आणि उबरचा उच्चार करायलाही कचरणारा आपला समाज आता ती सेवा सहजपणे वापरू लागला आहे. एवढेच नव्हे, तर झोमॅटो, स्वीगी, बिगबास्केट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ओयो अशी मायाजालावरील सर्व इंग्रजी नावे चांगलीच परिचित झाली आहेत. या नावांचा आणि आपला कधी काही संबंध येईल, असे वाटत नव्हते, पण शहरात आज जणू ते आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग झाले आहेत. 

 
 
पुण्यात ओला, उबर वापरताना लक्षात आले की गाडी चालविणारे हे तरुण पुण्याबाहेरचे आहेत. त्यातील बहुतांश मराठवाड्यातील, अगदी अलीकडे पुण्यात आलेले. त्यांना टीममध्ये सामावून घेताना कंपनी काही प्रशिक्षण देतच असेल, पण त्यांच्यातील अनेकांना तर मुख्य रस्तेही माहीत नाहीत, पण स्मार्टफोन शिकून घेतला की त्यांना ते रस्ते माहीत करून घेण्याची तशी काही गरज राहिलेली नाही. गुगलची ती बाई त्यांना सर्व काही सांगते. कोणत्या रोडवर कोंडी झालेली आहे, कोणता फास्टेस्ट रूट आहे, कुठे आणि कधी वळायचे, आपण जातो आहोत, त्या रस्त्यांची मूळ नावे काय आहेत, डेस्टिनेशनला अंदाजे किती वाजता पोचणार... असे सर्वकाही. तिच्यावर विसंबून राहण्याची सवय करून घेतली की माणसे, रस्ते आणि शहर जाणून घेण्याची फारशी गरज नाही. पण माणसाशी बोलल्याशिवाय समाधान होत नाही. गाडीत बसल्यावर तुम्ही कुठले? हा प्रश्न संपतो न संपतो की चालक आपली कथा सांगायला लागतो. मधूनमधून एखादा प्रश्न विचारून सोडून दिले, की डेस्टिनेशन आल्यावरच कथा थांबणार. गाडी सुरू करताना एक ओटीपी लागतो, तसा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी असा एक प्रश्न पुरेसा ठरतो.
 
 
रोजगाराच्या शोधात शहरात आलेले हे तरुण सध्या या रोजगारावर खुश आहेत. इंटरनेट मायाजाल आपल्याला असा हात देईल, असे त्यातील अनेकांना कधीच वाटले नसेल. पण, आज तोच स्मार्ट फोन आणि तेच इंटरनेट रोजीरोटी देणारे झाले आहे. जे शहर आपल्याला खुणावत होते, त्या शहरातील रस्ते असे गरागरा गाडीत फिरू, असे त्यातील अनेकांना कधीच वाटले नव्हते. ते अजूनही नवे आहेत, त्यामुळे शहरांची झगमग पाहात राहातात. गाडीत बसलेल्या माणसांच्या रूपाने शहरात काय चालले आहे, हे कळण्यास त्यांना मदत होते. रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि विमानतळावरील ही गर्दी आपल्याला ग्राहक म्हणून उपयोगाची आहे, याचाही अनुभव ते प्रथमच घेत आहेत. चार चाकी गाडीचा आणि आपला काही संबंध नव्हता, त्यामुळे या गर्दीचा आणि आपला असा संबंध येईल, असेही त्यांना कधी वाटले नव्हते. इतकी वर्षे दाटीवाटीने सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास केलेल्या आपल्याला आता मोटारगाडीची ड्रायव्हरसीट मिळाली आहे, म्हणजे त्यातील घडीभरची मौज आणि आयुष्यभर व्यापून राहणारी जबाबदारी! हौसेने प्रवास करणार्‍या बायाबापड्यांना सुरक्षित पोचविले पाहिजे. घरी आपली वाट पाहणारी आपली पत्नी आणि मुलांच्या भेटीची दररोजच्या प्रतीक्षेने ही जबाबदारी अधिकच वाढते. आपण अचानक एक जबाबदार नागरिक झालो आहोत, याचा हा सुखद अनुभव.
 
 
इंदूर, जयपूरला कामानिमित्त गेलो तर तेथेही ओला-उबरच्या गाड्या गरागरा फिरताना दिसल्या. मग कळले की, देशातील अशा 125 शहरांत ओला सेवा पोचली आहे. ओला-उबरच्या सेवेत आज 15 लाखांपेक्षा जास्त तरुण काम करत आहेत. इंदूरला तर काही उच्च शिक्षित तरुणही ओला चालविताना दिसले. अशा एकाने सांगितले की नोकरी होती, पण तिचा कंटाळा आला. गाडी घेऊन शहरात असे फिरायला छान वाटते, शिवाय नोकरीपेक्षा जास्त कमाई होते. दुसरा म्हणाला, की तो ग्वाल्हेरहून इंदूरला आला आहे. आधी त्याने दिल्लीत खासगी गाडी चालविली, पण तेथे मोठा अपघात झाला. केवळ गाडीच्या स्टेअरिंगजवळ असलेला फुगा बाहेर आला म्हणून तो वाचला. पण मग दिल्लीत मन रमले नाही. शिवाय दिल्लीत भाड्याने राहाणे परवडेनासे झाले. ओलाविषयीची माहिती तोपर्यंत झाली होती. पण, ग्वाल्हेरला ओला सेवा सुरू नव्हती, त्यामुळे इंदूरला आला. तीन महिन्यांत चांगला जम बसला. आता बायको आणि मुलांनाही इंदूरला आणले आहे. उज्जैनला जाताना ओलाचा ड्रायव्हर एक मुस्लिम तरुण होता. तो आधी काही बोलायला तयार नव्हता, पण राजकीय चर्चा निघाल्यावर तो खुलला. सर्व पक्षांवर त्याने यथेच्छ तोंडसुख घेतले. धर्माविषयी त्याला अभिमान होता, पण मुस्लिम समाजाने आता बँकिंग केले पाहिजे, असेही त्याने बोलून दाखविले. त्याने बँकेचे कर्ज काढूनच गाडी घेतली होती. हातातील एक साधा फोन आपल्याला असा रोजगार देऊ शकतो, याचे त्याला कुतूहल वाटत होते आणि त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या मार्गाने होणार्‍या बदलाविषयी तो सजग होता. जगात होणारे सर्वच बदल चांगले नाहीत, त्यामुळे सर्व बदल स्वीकारण्याची काही गरज नाही, असे त्याने ठामपणे सांगितले.
 
 
पुणे, मुंबई असो की इंदूर... त्यांच्याकडे असलेला फोन ते सराईतपणे वापरत होते. ग्राहकाकडून ओटीपी मिळाला की आधी काही न बोलता गाडी चालविणे आणि ग्राहकाने काही प्रश्न विचारला की बोलण्यास सुरवात करणे, असाच क्रम सगळीकडे दिसला. काही जण तर प्रहरानुसार गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट करत होते. एखादा अपवाद वगळता ग्राहकाशी वाद होणार नाही, याची काळजी ते घेत होते, त्याचे कारण म्हणजे चांगली सेवा देणार्‍याला कंपनीकडून मिळणारे रेटिंग. ते जर चांगले असेल तर त्याला फेर्‍या तर जास्त मिळतातच, पण अनेक बाबतीत प्राधान्य मिळते. त्यामुळे सर, जरा टॉप रेटिंग टाका बरं का, असे सांगणारेही होतेच. वाईटाला शिक्षा करण्यापेक्षा जे चांगले आहे, त्याला शाबासकी दिली तर समाज लवकर सुधारेल, असा जो सुविचार सांगितला जातो, त्याची प्रचीती अशा वेळी येते.
 
 
ओटीपी आणि पासवर्ड पाहून काम करणारी एक वेगळीच पिढी घडते आहे. रिक्षाचालकांचे जीवनही असेच रस्त्यावर असते, पण तेथे गिर्‍हाईक घेण्या न घेण्याची मुभा आहे. येथे मात्र ही गाठ तंत्रज्ञान ठरविणार आहे. अशी रस्त्यावर किमान आठ तास फिरणारी ही पिढी, हे वेगळेच विश्व आहे. ग्राहकाला डेस्टिनेशनला सोडले की मिळेल तेथे गाडी पार्क करून कंपनीकडून दुसरा कॉल येण्याची वाट पाहायची, तोपर्यंत आवडीची गाणी ऐकत टाईमपास करायचा. कॉल आला की गुगलवर ग्राहकाचे लोकेशन पाहून पळत सुटायचे, कारण वेळेत गेले नाहीतर ग्राहक फेरी रद्द करण्याची शक्यता आणि तसे त्याने केले तर ड्रायव्हरला उशीर झाला म्हणून ती रद्द केली गेली तर दंड होण्याची भीती. म्हटले तर आपणच आपले मालक, नाहीतर अॅप बंद केले की झाले! त्यामुळे किती फेर्‍या केल्या पाहिजेत, याचे काही बंधन नाही. ओलाचे काम करतानाच तुम्ही उबरचेही काम करू शकता. या कंपनीचा मालक कोण आहे, अधिकारी कोण आहे, याचा काहीच संबंध नाही. आपली गाडी आणि नेटचे कनेक्शन असले की झाले.
 
 
जसे ओला-उबर तसेच झोमॅटो, स्वीगी, बिगबास्केट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ओयो आणि आणखीही बरेच. पण सूत्र एकच. चेहरा महत्वाचा नाही. जात, पात, धर्म, राज्य, भाषा, ग्रामीण, शहरी .. असे काहीच महत्त्वाचे नाही. जो ओटीपी देईल, त्याला गाडीत बसवून डेस्टिनेशनच्या दिशेने गाडी वळविणे आणि कमीतकमी वेळेत ती फेरी पूर्ण करणे. जेवढे काम कराल तेवढे जास्त पैसे मिळतील. सेवा क्षेत्राचे एक वेगळे, आधुनिक रूप आपल्या समाजाला पाहायला मिळते आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने वाढणारा रोजगार, त्यासाठी होणारे मोठे स्थलांतर आणि त्या माध्यमातून रस्त्यांवर जगणारे मोठे समूह. या वेगवान बदलाला काही नाव नाही आणि त्याला चांगले किंवा वाईट म्हटल्याने त्याच्यात काही बदल होण्याची शक्यता नाही. उपयोगिता महत्त्वाची. ती या प्रवासात भागविली जाते आहे. बिनचेहर्‍याच्या अशा व्यवस्थेला नाव ठेवण्याची पद्धत रूढ झाली होती. पण, तिचे सर्टिफिकेट आता कुणी घेऊ इच्छित नाही.
 
 
कमी जागेत अधिकाधिक लोकांना जगण्याची वेळ येते तेव्हा एक व्यवस्था मान्य करावी लागते, ती ही बिनचेहर्‍याची व्यवस्था. त्या व्यवस्थेत काही मिनिटांनी माणसांची अदलाबदल होणार आहे. गाडीत बसणारा माणूस कुठून आला, कुठे आणि कशासाठी चालला, याचा काही संबंध नाही. त्याच्याकडून ओटीपी घेतला की गाडी सुरू आणि डेस्टिनेशन आले की त्याचा संबंध संपला. भावनिक जीवन जगणार्‍या भारतीय समाजाला याची सवय नाही, पण ती आता करून घ्यावी लागेल. आधुनिक जीवनात येत असलेले हे बदल इतके सर्वव्यापी आहेत की, आपण ते कधी स्वीकारले, हे कळतही नाही. माणूस म्हणून मनात भावभावनांची गर्दी तर होतच असते, तिला मोकळी वाट करून देण्यासाठी आपण अशा रस्त्यावरील माणसाशी बोलले पाहिजे, त्याची ख्यालीखुशाली विचारली पाहिजे. त्याने केलेल्या चांगल्या कामाची शाबासकी दिली पाहिजे आणि पुन्हा भेटू मित्रा, असेही आवर्जून म्हटले पाहिजे. कारण, ओटीपी देताना प्रत्येक वेळी आपणही त्याच रस्त्याचे रहिवाशी असतो आणि आपलीही ओळख तो ओटीपीच असतो, याचे भान तर ठेवलेच पाहिजे!
••