यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी हवीच

    दिनांक :20-Oct-2019
मिलिंद महाजन
 
डोळ्यासमोर एकच ध्येय आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी अंगात जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती आणि जोडीला कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढत ध्येय साधता येते. हेच युवा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालच्या यशामागची संघर्षपूर्ण जीवनकथेतून प्रकर्षाने दिसते. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत यशस्वीने तडाखेबंद फलंदाजी करत द्विशतक झळकावून समस्त क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले. 

 
 
वास्तविक उत्तर प्रदेशातील भदोई, सुरीया गावचा यशस्वी याला लहानपणापासून क्रिकेटचे भारी वेड. यशस्वीचे वडील भूपेंद्रकुमार जयस्वाल यांचे छोटेसे दुकान आहे. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वयाच्या अकराव्या वर्षी यशस्वी मुंबईत आला.
 
 
सुरुवातीच्या काळात तो मुंबईतील एका नातेवाईकांकडे राहायचा. मुंबईच्या वरळीत संतोष नावाचा नातेवाइक राहत होता. पण त्याचं घरही लहान होतं. मुंबईच्या काळबादेवीतील डेअरीत केवळ झोपण्याची जागा त्याला मिळाली. पण त्यासाठी त्याला डेअरीत राबावे लागत असे. यशस्वी दिवसभर क्रिकेट खेळत असतो हे पाहिल्यावर डेअरी मालकाने त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर त्याला एका क्लबने मदत केली, परंतु चांगला खेळलास तरच तुला येथे राहता येईल, अशी अट त्याच्यासमोर ठेवली. क्रिकेटचे धडे गिरवण्याची त्याची सोय तर झाली, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसा तो मैदानाबाहेर पाणीपुरी विकायचा. यशस्वीला ध्यास एकच एक उत्तम क्रिकेटपटू व्हायचे. या ध्यासापोटी तो आयुष्यातील हालपेष्टा सहन करत होता. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून तो क्रिकेटचे बारकावे शिकले. त्यामुळेच त्याला क्रिकेटची उत्तम जाण आहे.
 
 
यशस्वी लेगब्रेक गोलंदाजी व डाव्या हाताने फलंदाजी करतो. आज मुंबईचा तरबेज क्रिकेटपटू म्हणून त्याने लौकीक मिळविला आहे. गत आठवड्यातच बंगळुरूमध्ये विजय हजारे करंडक स्पर्धेतील झारखंडविरुद्धच्या सामन्यात यशस्वीने 154 चेंडूत 12 षटकारांसह 203 धावांची झंझावती खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. या स्पर्धेतील हा एक विक्रम आहे. या पराक्रमाच्या वेळी यशस्वी जयस्वालचे वय 17 वर्षे 292 दिवस इतके होेते व त्याने द्विशतक झळकावून तीन वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
 
 
यशस्वीने याच वर्षी विजय हजारे करंडक या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या द्विशतकी खेळीपूर्वी त्याने केरळ व गोव्याविरुद्धच्या सामन्यात अनुक्रमे 113 व 122 धावांची दिमाखदार शतकी खेळी केली होती.
 
 
विजय हजारे करंडकात यंदा आतापर्यंत दोन द्विशतके झळकावली गेली आहेत. यशस्वी जयस्वालपूर्वी यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने केरळकडून खेळताना गोव्याविरुद्ध नाबाद 212 धावांची खेळी केली होती.
 
 
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी नववा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या 9 पैकी 5 द्विशतके वनडेत झळकावण्यात आली आहेत. लिस्ट-ए वनडे सामन्यांत सर्वाधिक तीन द्विशतके रोहित शर्माच्या नावावर आहेत. वीरेंद्र सेहवागने एक, तर सचिन तेंडुलकरने एक द्विशतक झळकावले आहे. विजय हजारे करंडकात पहिले द्विशतक गत मोसमात उत्तराखंडच्या कर्णवीर कौशलने झळकावले होते. त्याने सिक्कीमविरुद्ध 202 धावांची खेळी केली होती.
 
 
यशस्वीने आतापर्यंत दोन शतके व एक द्विशतक आपल्या नावावर केले आहे. यशस्वीच्या फलंदाजीतील सातत्य पाहून त्याला भारताच्या 19 वर्षाखालील संघातही स्थान मिळाले आहे.
7276377318