कुस्ती आणि क्रिकेट...

    दिनांक :20-Oct-2019
मंथन  
 भाऊ तोरसेकर 
 
गेल्या आठ-दहा दिवसांत विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला चांगला रंग भरला, असे म्हणता येईल. कारण राजकीय नेते व पक्षांनी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याला आपल्याकडे प्रचार मानले जाते. खरे मुद्दे बाजूला पाडण्याचे डावपेच चाललेत, असा आरोप सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी करणे स्वाभाविक आहे. कारण सामान्य मतदार जनतेला पटणारा खुलासा उपस्थित विषयावर उपलब्ध नसेल; तर त्या विषयालाच टांग मारणे भाग असते. 370 कलमाचा विषय जेव्हा ऐरणीवर आला, तेव्हा त्याचा महाराष्ट्राशी संबंध काय? असे विचारून प्रादेशिक पक्षाचे नेते म्हणून पवारांनी त्यापासून अलिप्त राहण्याचा शहाणपणा दाखवायला हवा होता. संसदेत जर त्या विधेयकाला विरोध करण्याचा महाराष्ट्राशी संबंध असेल; तर आता विधानसभेच्या प्रचारात 370 चा संबंध शोधण्यात अर्थ नसतो. तसाच एक मुद्दा आहे तेल अंगाला लावलेल्या पहिलवानाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला; तेव्हा पवारांनी आपल्या कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष असण्याचा आधार घेऊन अतिशय खोचक विधान केले व हातवारेही केले होते. फडणवीस म्हणाले, आमचे म्हणजे भाजपाचे पहिलवान (उमेदवार) अंगाला तेल लावून आखाड्यात उतरलेले आहेत, पण समोर लढायलाच कुणी नाही. त्याला उत्तर देताना आपल्या एका भाषणात पवार (तृतीयपंथी हावभाव, हातवारे करीत) म्हणाले, कुस्ती अशांशी होत नसते. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याचा हवाला त्यासाठी पवारांनी दिला. पण, तेच पवार मुंबई क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष आहेत. मग तिथे त्यांची बुद्धी का चालत नाही? कुस्तीच्या खेळाचे नियम अगत्याने कथन करणार्‍या पवारांना क्रिकेट कसे व कुणाशी खेळतात, हे ठाऊकच नाही काय? असते तर त्यांनी मोदी-शाह इतक्या सभा कशाला घेत आहेत, असा उलटा प्रश्न नक्कीच विचारला नसता. क्रिकेट कसे खेळतात? कुस्ती व क्रिकेटमधले साधर्म्य काय आहे?
 
 
 
कुस्तीचे तंत्र सांगताना पवार म्हणतात, अशांशी लढत नाही. मग क्रिकेटमध्ये तरी अशांचा पुरुषार्थ कितीसा आहे? सध्या दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यात कसोटी मालिका चालू आहे आणि त्यातल्या पहिल्या दोन सामन्यांत भारताने निर्णायक आघाडी घेतलेली आहे. पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत आणि त्यातल्या दुसर्‍या सामन्यात तर आफ्रिकेचा एक डाव व दीडशेहून अधिक धावांनी दणदणीत पराभव केला आहे. पण, नशीब दक्षिण आफ्रिकन संघाच्या कर्णधाराचे नाव शरद पवार नाही! अन्यथा तोही म्हणाला असता, क्रिकेटविश्वात खरोखरच भारतीय संघ इतका अिंजक्य असेल, तर रोहित शर्मा व विराट कोहली कशाला फलंदाजीला आणावे लागत आहेत? कुस्ती असो वा क्रिकेट, कुठल्याही सामन्यात संघ मैदानात उतरवला जातो, त्यात आपल्याकडले उत्तम खेळाडू वा मल्ल आणले जात असतात. मग तो संघ कितीही बलवान असो आणि समोरचा संघ कितीही दुबळा असो. दुबळा संघ वा त्यांचा कर्णधार समोरच्या संघात जिंकू शकणार्‍या उत्तम खेळाडूंना कशाला समाविष्ट केले, असा उलटा सवाल करीत नसतो. जे कुणी समोर येतील, त्यांची दाणादाण उडवून सामना जिंकायला मैदानात येत असतो. तुमच्या उत्तम खेळाडू वा मल्लांना आखाड्याबाहेर ठेवण्याचा आग्रह धरत नाही किंवा तक्रार करीत नाहीत. पवारांनी तीन-चार दशके विविध खेळ संघटनांची अध्यक्षपदे मिरवताना त्यातली ही मूलभूत बाजू समजूनच घेतलेली नाही काय? की फक्त त्यातल्या आर्थिक उलाढाली व खेळाडूंच्या लिलावाचाच अर्थ समजून घेतला आहे? पवारांच्या पक्षापाशी राज्याबाहेरून व्यासपीठ गाजवू शकणारा कुणी वक्ता आणायची कुवत नसेल; तर भाजपाचा तो गुन्हा असू शकत नाही. मोदी-शाह हे भाजपाचे विराट कोहली वा रोहित शर्मा आहेत. त्यांना भाजपाने कॉमेण्ट्री बॉक्समध्ये बसवून निवडणुका लढवाव्यात, अशीच पवारांची अपेक्षा आहे काय? असेल तर त्यांना कुस्ती वा क्रिकेट किती कळते, असा प्रश्न विचारला गेला पाहिजे.
 
पण, असे प्रश्न विचारण्यासाठी खरेखुरे पत्रकार समोर असायला हवेत. त्याचाच दुष्काळ असेल, तर पवारांच्या हातवारे व हावभावांनाच भाव मिळून जाणार ना? अर्थात, सामान्य जनता तितकी बुद्धिजीवी पत्रकार नसल्याने तिला कुस्ती व क्रिकेट आवश्यक तितके समजत असते. म्हणूनच मतदान करताना योग्य कौल देणेही शक्य होत असते. गेल्या आठवडाभरात पवारांच्या व अन्य विविध राजकीय नेत्यांच्या सविस्तर मुलाखती मराठी वाहिन्यांवर वारंवार दाखवल्या जात आहेत. त्यात पवार एक गोष्ट मुलाखत घेणार्‍यालाच अगत्यानेच सुचवतात. माध्यमांवर किंवा प्रचारसाधनांवर भाजपाचा दबाव आहे. खरे मुद्दे बासनात गुंडाळून मतदाराची दिशाभूल करण्याचा डाव खेळला जात आहे. माध्यमेही दबावाखाली आहेत. असे असेल तर त्याच कालखंडात बहुतांश मराठी माध्यमांनी व वाहिन्यांनी प्रफुल्ल पटेल व इक्बाल मिरची विषयात गुळणी कशाला घेतलेली आहे? दोन-तीन इंग्रजी वाहिन्या सलग चार-पाच दिवस पटेल व 1993 च्या मुंबई स्फोटातील एक प्रमुख आरोपी इक्बाल मिरची; याच्या आर्थिक संबंधाची लक्तरे काढत आहेत. पण, कुठल्याही मराठी वाहिनीने त्यावर ऊहापोह करायचे टाळलेले आहे.
 
वास्तविक, पटेल हे पवारांचे कुटुंबाइतकेच निकटवर्तीय आहेत. म्हणूनच यावेळी ती लक्तरे मराठी माध्यमात ठळकपणे मांडली गेल्यास मतदानावर त्याचाच मोठा परिणाम होऊ शकतो. पटेल हे राष्ट्रवादीचे मोठे नेते व माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे वादग्रस्त व्यवहार राष्ट्रवादीच्या प्रचाराला मोठी इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे त्याविषयीचे मौन माध्यमांनी धारण करणे म्हणजेच खर्‍या विषयावरून जनतेला गाफील ठेवणेच नाही काय? मग त्या विषयावर काही गाजावाजा नको म्हणून कुणी दबाव आणलेला असू शकतो? मोदी सरकार वा फडणवीस सरकार त्यासाठी दडपण आणेल काय? नसेल तर मराठी माध्यमे कुणाच्या दबावाखाली असतात? असा उलटा प्रश्न एकाही मुलाखतकाराला का सुचत नाही? का विचारला गेला नाही?
पवारांचे कुस्तीविषयक ज्ञान व हातवारे अगत्याने दाखवून त्यावर प्रदीर्घ चिंतन करणार्‍या मराठी माध्यमांना इक्बाल मिरची इतकी घुसमटून का टाकत असावी? की त्या मिरचीचा जबरदस्त ठसका लागल्यानेच घटाघटा पाणी प्यावे, तसे सातार्‍याच्या सभेत पडणार्‍या मुसळधार पावसाचे पाणी मराठी माध्यमे पिण्यात गुंग झालेली होती? इंग्रजी माध्यमे एकामागून एक मिरचीच्या फोडण्या देऊन धमाल उडवून देत असताना, मराठी माध्यमे मात्र पवारांच्या पावसात भिजून दिल्या गेलेल्या भाषणात ओथंबून गेली होती. कुठे आणून ठेवलीय मराठी पत्रकारिता साहेबांनी? राष्ट्रवादीच्याच एका जाहिरातीतल्या टॅगलाईनवर विश्वास ठेवायचा, तर महाराष्ट्र सोडणार नाही, अशा माध्यमांना. चार दिवसांचा तर मामला आहे. 24 ऑक्टोबर रोजी दूध आणि पावसाचे पाणी वेगळे झालेले दिसेलच. कारण सामान्य मतदार आता तितका दूधखुळा राहिलेला नाही. एका बाबतीत मात्र पवारांचे कौतुक करावे लागेल. आपण सातार्‍यातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात चूक केली, हे त्यांनी कबूल केले आहे. निदान एकदा तरी आपल्या चुकीची कबुली दिली, हे अभिनंदनीय आहे. पवारांसाठीच नाही, तर मराठी पत्रकारितेसाठीही कौतुकास्पद आहे. कारण पवारांच्या घोडचुकातही मुरब्बीपणा शोधण्यातच बुद्धिजीवी पत्रकारिता मागील दोन-तीन दशकांत डुंबत राहिली होती. त्यांनाही पवारांची चूक सांगण्याची भीती वाटली नाही, हे कौतुकास्पदच नाही काय? पण, चूक उदयनराजे यांनीही मांडलेली आहे. आजवर आत्मपरीक्षण व आत्मचिंतन केले असते, तर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन आत्मक्लेश करावे लागले नसते, असे राजे म्हणाले होते. आत्मिंचतन पवारांनी कधी केले नाही आणि मराठी माध्यमे पत्रकारांनी त्यांना करू दिले नाही. मग दोघांवर सतत आत्मक्लेश सहन करण्याची वेळ येत राहिली, तर दुसर्‍या कुणाला दोष देता येईल? देवेंद्राला कुस्ती शिकवण्यापेक्षा साहेबांनी क्रिकेट समजून घेतले असते, तर पावसात खेळ थांबवायचा असतो, इतके औचित्य तरी राखता आले असते ना?