तेलाच्या दरवाढीचं सावट

    दिनांक :21-Oct-2019
मे महिन्यापासूनच आखाती क्षेत्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हवाई हल्ला करण्याची घोषणा केली होती; परंतु नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. इराणच्या हैती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेल क्षेत्रांना ड्रोनच्या सहाय्यानं निशाणा बनवलं. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस इथल्या तेलक्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियानं 50 टक्के अर्थात निम्मं तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं तेलटंचाईच्या धोका निर्माण झाला आहेच शिवाय तेलाच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. 
 
 
जगातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या अरामको कंपनीची दोन क्षेत्रं बॉम्बवर्षावानं हादरली. या हल्ल्‌यानंतर दोन्ही प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. सौदी अरेबियानं येमेनमधील हैती नियंत्रित क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या हल्ल्‌यानंतर सौदी अरेबियानं तेल उत्पादनात पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला 5.7 मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे 159 लिटर) म्हणजेच पाच टक्के उत्पादन कमी झालं आहे.
 
 
मात्र या हल्ल्‌यामुळे भारताला होणार्‍या तेलपुरवठ्यात कुठलाही व्यत्यय येणार नसल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. भारताचे रियाध इथले राजदूत अरामकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. आम्ही आमच्या सर्व ऑईल कंपन्यांबरोबर चर्चा करून सप्टेंबरसाठी कच्च्या तेलाचा साठा तपासला आहे. त्यामुळे भारताला होणार्‍या तेलपुरवठ्यात कुठलाही व्यत्यय येणार नाही. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत, असं सांगत त्यांनी देशवासीयांना दिलासा दिला. भारत नेहमीच 80 टक्क्‌यांपेक्षा जास्त तेल आयात करतो. एप्रिल ते जुलै 2019 या काळात वापरल्या गेलेल्या तेलापैकी 84.9 टक्के तेल आयात केलेलं होतं. भारत तेलासाठी इराकनंतर सौदी अरेबियावर सर्वात जास्त अवलंबून आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतानं सौदीकडून 29.56 कोटी बॅरल कच्चं तेल आयात केलं होतं. सध्या सौदीनं भारताला तेलपुरवठ्यात कुठलाही व्यत्यय येणार नसल्याची शाश्वती दिली असली, तरी भारताला काही पर्याय तपासावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रेण्ट क्रूड ऑईलचे प्रतिबॅरल 65 अमेरिकन डॉलरच्या आसपास असणारे दर सौदीकडून तेलपुरवठा सुरळीत सुरू होईपर्यंत चढेच राहणार असल्याचं चित्र आहे.
 
 
दरम्यान, 20 निखर्व डॉलर एवढं प्रचंड मूल्यांकन असणारी अरामको 2020-21 पर्यंत सौदी शेअर मार्केटमध्ये आपले शेअर्स विक्रीस आणणार होती. यासाठी बँकांशी चर्चा सुरू होती. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातही आयपीओ आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. आपला पाच टक्के हिस्सा बाजारात आणायची अरामकोची इच्छा आहे, असं सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2016 मध्ये म्हटलं होतं. कंपनीला कमीत कमी 100 अरब डॉलर एवढी कमाई होईल, असा विश्र्वास होता. या हल्ल्‌यानं अरामको कंपनीचे कच्चे दुवे उघड झाले आहेत. कंपनी शेअर बाजारात उतरत असताना असं होणं घातक आहे. मध्य पूर्वेत तणाव कायम राहिला, तर तेलाच्या किमतींवर परिणाम होणार हे ओघानं आलं.