रेल्वेने कमाईसाठी गाठले बॉलिवूडचे स्टेशन!

    दिनांक :21-Oct-2019
•विजय सरोदे
 
भारतीय रेल्वेने आपली कमाई वाढविण्याचे दृष्टीने आता बॉलिवूडचे स्टेशन गाठले आहे! बॉलिवूड म्हणजे मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टी (अमेरिकेतील हॉलिवूडच्या धर्तीवर पूर्वीच्या बॉम्बे असे नाव असलेल्या महानगरातील) होय. याचबरोबर कोलकाता, दिल्ली, पुणे आदी महानगरातील चित्रपटसृष्टीलाही अनुक्रमे टॉलिवूड (टॉलीगंजवरून), डॉलिवूड व पॉलिवूड अशी नावे पडली आहेत. 
 
 
 
मग रेल्वे या चित्रपटांचा वापर तरी कसा करणार आहे? हा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर म्हणजे रेल्वेचीच एक उपकंपनी असलेली भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) तर्फे प्रमोशन ऑन व्हील्स स्कीम या योजनेद्वारे चित्रपट प्रमोशन, कला, संस्कृती, क्रीडा व अन्य मनोरंजन क्षेत्रांना उत्तेजन देण्याच्या कार्यवाहीसाठी आपल्या गाड्यांचे बुिंकग सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विशेष डबे (कोच) तयार केले जात आहेत. या स्कीमची सुरुवात अक्षयकुमारचा चित्रपट हाऊसफुल - 4 ने केली आहे. आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेने प्रमोशन ऑन व्हील्स अंतर्गत डब्यांची एक विशेष रेल्वेगाडी तयार केली आहे. या ट्रेनमध्ये हाउसफुल- 4 च्या टीमशिवाय इतर बड्या हस्ती आणि माध्यमातील व्यक्ती असतील. ही ट्रेन प्रत्येक बुधवारी मुंबई सेंट्रलहून निघून गुरुवारी नवी दिल्लीला पोहोचेल. ही अनेक राज्यातील महत्त्वपूर्ण स्टेशन्सवरुन उदाहरणार्थ सुरत, बडोदा, कोटा येथून जाणार आहे. अशा प्रकारच्या ट्रेनचे संचालन करण्यासाठी आयआरसीसीटीची एक नोडल एजन्सी राहील. अशा प्रकारे चित्रपट व त्यातील कलाकार हे स्वत: या गाडीद्वारे जनतेपर्यंत जातील.
 
 
रेल्वेने या आधी ज्यांचे नवे चित्रपट येणार आहेत अशा अनेक निर्मात्यांशी संपर्क केला असून त्यांना आपले दरपत्रक सादर केले आहे.
आयआरसीटीसी या सरकारी कंपनीचा आयपीओ नुकताच जारी करण्यात आला असून तो गेल्या सोमवारी शेअर बाजारात लिस्ट (नोंद) झालेला आहे. लिस्टिंगच्या अगदी पहिल्याच दिवशी हा इश्यू त्याच्या मूळ किमतीच्या (320 रुपये) तब्बल 96 टक्के वर म्हणजे 626 रुपयांवर उघडला होता. दिवसभरात तो 783 रुपयांच्या उच्च (हाय) पातळीपर्यंत जाऊन आला होता. दोन वर्षांपूर्वी जारी झालेल्या ऍव्हेन्यू सुपरमार्केटच्या आयपीयुसारखीच ही सक्सेस स्टोरी (यशोगाथा) ठरली आहे. त्यामुळे या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्यांची पदार्पणातच चांदी झालेली आहे.