'मुंबई सागा'त जॅकीच्या जागी महेश मांजरेकर

    दिनांक :21-Oct-2019
मुंबई,
दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा' सध्या चर्चेत आहे. जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी यांच्याबरोबरच प्रेक्षक जग्गु दादा म्हणजेच जॅकी श्रॉफला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र, जॅकी श्रॉफनं या चित्रपटाला नकार कळवला आहे. सूत्रांनुसार, जॅकी श्रॉफ अन्य चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यानं त्यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळं जॅकी श्रॉफ यांच्याऐवजी महेश मांजरेकर 'मुंबई सागा'त दिसणार आहे.
 
 
 
संजय गुप्ता आणि महेश मांजरेकर घनिष्ट मित्र आहेत. म्हणूनच जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटाला नकार कळवल्यानंतर त्यांनी लगेचच महेश मांजरेकर यांना या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारणा केली. त्यावर तात्काळ महेश यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
'मी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करण्यास खूप उत्सुक होतो. मात्र, त्यांच्या तारखा मिळत नसल्यानं त्यांना चित्रपट सोडावा लागला. महेश मांजरेकर हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्यासोबत मी नेहमी मोकळेपणाने बोलू शकतो. 'कांटे' चित्रपटावेळी आमची मैत्री झाली. आम्ही अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. ज्या वेळेस मी त्यांना माझी अडचण सांगितली तेव्हा त्यांनी लगेच चित्रपटात काम करण्यास होकार दिला. फक्त आम्हाला शूटिंग दरम्यानच्या तारखा काढाव्या लागल्या कारण ते त्यांच्या अन्य चित्रपटांमध्ये बिझी होते.' असं संजय गुप्ता म्हणाले.
महेश मांजरेकर पुढील आठवड्यात 'मुंबई सागा' चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, सुनीश शेट्टी, इमरान हाश्मी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोव्हर अशी तगडी स्टार कास्ट आहे. महेश मांजरेकर यांचे जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत ही सीन्स होणार आहेत. तसंच, चित्रपटात त्यांचे दोन लूक असणार आहेत. एका लूकमध्ये ते ५५ वर्षांची व्यक्तिरेखा तर, दुसऱ्या लूकमध्ये ६२-६५ व्यक्तींची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.