'स्वाभिमानी'च्या उमेदवाराला मारहाण करून कार पेटवली

    दिनांक :21-Oct-2019
अमरावती:
महाराष्ट्रात विधानसभेच्या मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला हिंसेचे गालबोट  लागल्याची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसेच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार हे सकाळी कारमधून मालखेड गावाकडून निघाले होते.
 
 
 
वरुडपासून सहा किलोमीटरवर असलेल्या एका गावाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. तीन ते चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळते. तीन-चार जणांनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. भुयार यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची कार पेटवून देण्यात आली. रस्त्यावर सुरू असलेला हा प्रकार पाहून गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ते धावून येताच मारेकऱ्यांनी जवळच्या शेतातून पळ काढला. भुयार यांची कार जळून खाक झाली आहे. तसेच भुयार यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'भुयार यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसंच त्यांची कार पेटवून देण्यात आली. दरम्यान, भुयार यांच्या दिशेनं गोळीबारही करण्यात आल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. भुयार यांच्यावर गोळीबार झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.