या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च!

    दिनांक :21-Oct-2019
जवळपास २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक शंकर यांचा ‘इंडियन’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेते कमल हासन यांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. ‘इंडियन २’ या चित्रपटांचं सध्या चित्रीकरण असून यातील एका सीनसाठी तब्बल ४० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
 
 
 
‘इंडियन २’ हा कमल हासन यांच्या करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा सोडणार असल्याचं खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते पिटर हेनदेखील झळकणार आहेत. विशेष म्हणजे पिटर हेन यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या एका सीनवर जवळपास ४० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
 
 
पिटर हेन करत असलेल्या या दृश्यामध्ये २ हजार जुनिअर आर्टिस्ट दिसणार असून २५ दिवस चालणाऱ्या या चित्रीकरणासाठी ४० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, पिटर हेन यांनी यापूर्वी एंथरिन आणि आय या चित्रपटामध्ये काम केलं आहे. ‘इंडियन २’मध्ये कमल हासन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यांच्यासोबत सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकूल प्रित, प्रिया भवानी शंकर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.