नजाकत चिखलदर्‍याची

    दिनांक :22-Oct-2019
दोस्तांनो, थंड हवेचं ठिकाण शोधत असाल तर तुम्ही चिखलदर्‍याला भेट देऊ शकता. अमरावती जिल्ह्यातलं चिखलदरा मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखलं जातं. इतकंच नाही तर या स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे इथे कॉफीचे मळे आहेत. कॉफीचे मळे असणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण. त्यामुळे इथे गेल्यावर तुम्हाला कॉफीचा छान दरवळ अनुभवता येईल. निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवनाचा आनंद इथे घेता येईल. चिखलदरा परिसरात बरेच तलाव आहेत. खोल दर्‍या, डोंगर, हिरवळ असं सगळं चिखलदर्‍यात अनुभवता येतं. म्हणूनच पर्यटकांना हे ठिकाण भुरळ घालतं.

 
चिखलदरा समुद्रसपाटीपासून 1118 मीटर उंचीवर असून सातपुडा पर्वतरांगांमध्ये हे स्थान वसलं आहे. चिखलदर्‍याच्या जंगलात पांडवांनी वास केल्याचं म्हटलंं जातं. त्या काळी किचकाचं या भागावर राज्य होतं. त्यावेळी हे स्थान ‘किचकदरा’ या नावाने ओळखलं जायचं. भीमाने किचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिलं. कालांतराने हे स्थान चिखलदरा या नावाने प्रसिद्ध झालं. इथल्या जंगलांमध्ये वाघ पहायला मिळतो. यासोबतच मोर, घुबड आणि अस्वलंही इथे आहेत. मोझारी पॉईंट, भीमकुंड, हॅरिकेन पॉईंट, देवी पॉईंट, मंकी पॉईंट, वैराट देवी, सेमाडोह तलाव ही इथली महत्त्वाची ठिकाणं आहेत. याशिवाय गाविलगड आणि नर्नाळा हे इथले प्रसिद्ध किल्ले आहेत. नागपूर आणि अमरावती या रेल्वेस्थानकांवर उतरून चिखलदर्‍याला जाता येईल.