मतदानासाठी युवा मतदारांमध्ये दिसला उत्साह

    दिनांक :22-Oct-2019
चिखली,
विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी युवा मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. प्रथमच मतदान करणाऱ्या अनेक युवक-युवतींनी सेल्फी काढून फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याचे चित्र होते. बहुतेक युवक-युवतींनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. 
 
चिखली शहरासाठी हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरले. लोकसभा निवडणूक आणि आता विधानसभेची निवडणूक झाली . प्रशासनाने मतदार नोंदणी मोहीम राबविली . या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे नवमतदारांच्या संख्येत मोठी भर पडली. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीसाठीही नवमतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. तरुणांसह तरुणींनी मतदानाचा हक्क बजावला. काही तरुणांनी आपल्या कुटुंबासमवेत येत मतदान केले. काही तरुण-तरुणी आपल्या आजी-आजोबासोबत मतदानासाठी आले होते. त्यामुळे एकाच वेळी जुनी व नवी पिढी मतदानासाठी आल्याचे दिसून आले.
 
 
 
मतदान केल्यानंतर अनेक तरुण-तरुणी सेल्फी काढतांना दिसून आले. तर काहींनी आपले फोटो लागलीच सोशल मीडियावर अपलोड करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी चिखली मतदार संघाचे निवडणूक अधिकारी कैलास देवरे व सहा. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ अजितकुमार येळे यांच्या मार्गदर्शनात प्रचार प्रसार केला होता . 'आम्ही मतदान केले, तुम्ही कधी करणार' असे व यासारखे अनेक मतदान जागृतीचे मजकूर सोशल मिडिया वर झळकत होते. नवमतदारांनी प्रथमच मतदान केल्यामुळे वेगळाच आनंद मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी त भा प्रतिनिधी कडे व्यक्त केली . तसेच लोकशाहीचा घटक असल्यामुळे मजबूत सरकारसाठी आपण मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.