...आणि 'येथे' मेणबत्तीच्या उजेडात घेण्यात आले मतदान

    दिनांक :22-Oct-2019
हिंगणघाट,
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात अचानक आलेल्या पावसामुळे वीज गेल्याने मेणबत्ती लावून मतदान पार पडले. यामुळे या ठिकाणी मतदानाचा टक्का थोड्या प्रमाणात प्रभावित होण्याची संभावना आहे.
 
 
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नगरपालिकेसमोरील विद्युत वितरण कार्यालयावरील झाडांच्या फांद्या विद्युतवाहक तारांवर पडल्याने शहरातील अनेक मतदान केंद्र यामुळे प्रभावित झाली. यामुळे काही मतदान केंद्रांवर मेणबत्ती लावून मतदान घेण्यात आले. याचा मतदारांना त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्याने प्रशासन सतर्क असतो. मात्र, हिंगणघाट विधानसभा मतदासंघातील हिंगणघाट शहरात विद्युत विभागाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.
 
 
विद्युत विभागाचे सहायक अभियंता हेमराज पाटील हे आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्याने विज वितरण विभागाकडून विज सुरू करण्यास जवळपास वीस मिनिटे लागली. याबाबत सहायक अभियंता हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत भेटण्यासाठी टाळाटाळ केली. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदानावर प्रभाव पडला आहे. सहायक अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे आणि मुख्यालयात मतदानाच्या दिवशी गैरहजर राहिल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाली. यामध्ये अनेक मतदान केंद्रावर अंधारात मेणबत्ती लाऊन मतदान घेण्यात आले.