'दबंग-३'मधील सई मांजरेकरचा लुक व्हायरल

    दिनांक :22-Oct-2019
मुंबई,
अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर सलमान खानच्या 'दबंग-३' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी आधीच व्हायरल झाली होती. सलमानसोबत चित्रपटात सई कशी दिसणार अशी उत्सुकता चाहत्यांना लागलेली असताना खुद्द सल्लूनंच 'दबंग-३'मधील खुशीची अर्थात सईची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे.

 
सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'दबंग-३' चा ट्रेलर २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा करत सलमाननं एका व्हिडिओच्या माध्यमातून सईच्या चित्रपटातील पात्राची ओळख करून दिली. या चित्रपटात सई मांजरेकर खुशी नावाचं पात्र साकारत आहे. खुशी ही चुलबुल पांडेची भूतकाळातील प्रेयसी असते. 'इ है हमरी बेबी खुशी...सिधी साधी... मासूम... अति सुंदर. ..अब इनकी खुशी के लिए हम किसिको भी दुखी कर सकते है' असं म्हणत सलमाननं सईच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर लाँच केलं आहे. या पोस्टरवरील सईचा सोज्वळ, निरागस चेहरा आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहून अनेक नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.
सुपरस्टार सलमान खान ज्या हिरॉइनला बॉलिवूडमध्ये आणतो ती हमखास यशस्वी ठरतेच, असं म्हटलं जातं. यात लवकरच, अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या, अभिनेत्री सई मांजरेकरचं नाव येणार, अशी चर्चा इंडस्ट्रीत रंगली आहे. अलीकडेच पार पडलेल्या एका झगमगत्या पुरस्कार सोहळ्यात सलमान खान आणि सई या जोडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सल्लूच्या 'दबंग-३' या चित्रपटातून सई बॉलिवूडमध्ये जोरदार पदार्पण करणार आहे.
 
 
 
 
या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दीपिका-रणवीर, रणबीर-आलिया अशा बड्या कलाकारांच्या जोड्यांवर सगळ्यांचं लक्ष होतं. पण, सर्वाधिक चर्चा झाली ती सलमान खान आणि सई मांजरेकर या जोडीनं. सईची बॉलिवूडमधली ग्रँड एंट्री पाहून बॉलिवूडसह मराठी सिनेजगतात तिचं कौतुक होतंय. बॉलिवूडमधल्या वाटचालीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 'दबंग ३'च्या माध्यमातून दाक्षिणात्य स्टार सुदीप बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक प्रभुदेवाचा हा चित्रपट नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे.