आलिया-रणबीरची लग्नपत्रिका व्हायरल

    दिनांक :22-Oct-2019
मुंबई,
इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो...सध्या इंटरनेटवर व्हायरल होणारी ही गोष्ट अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरशी निगडीत आहे... या दोघांच्या लग्नाची पत्रिकाच आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या नात्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. अनेक कार्यक्रमांत ते दोघे एकत्र दिसतात. त्यामुळे लवकरच त्यांचं शुभमंगल होणार असल्याच्या बातम्या येत असतात. लग्नाबाबत हे दोघंही कधीच खुलेपणाने बोलत नसले तरी त्यांच्या लग्नाची पत्रिका मात्र सध्या सोशल मीडियावर गाजतेय.

या पत्रिकेत म्हंटल्यानुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये होणार आहे. अर्थात ही पत्रिका खोटी असून त्यांच्या एखाद्या फॅननं तयारी केली असल्याचं सहज लक्षात येतं आहे. या पत्रिकेत व्याकरणाच्या, इंग्रजी स्पेलिंगच्या अनके चुका पाहायला मिळत आहेत. या पत्रिकेत आलिया भट्टच्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग Aliya असं लिहिलंय पण आलिया भट्ट मात्र तिचं स्पेलिंग Alia असं लिहते. याशिवाय, पत्रिकेत आलिया भट्ट ही मुकेश भट्ट यांची कन्या असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, आलियाच्या वडिलांचं नाव महेश भट्ट असून मुकेश भट्ट तिचे काका आहेत. या पत्रिकेतील तारखेमध्येही गोंधळ घालण्यात आला आहे. इंग्रजीत 22'nd अशी तारीख लिहिण्याऐवजी 22'th असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे ही पत्रिका त्यांच्या एखाद्या फॅननं व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. रणबीर आणि आलियाच्या साखरपुड्याचे, त्यांच्या लग्नाचे असे अनेक फोटो यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. मात्र हे सगळे फोटो त्यांच्या फॅन्सनी व्हायरल केले होते.
रणबीर आणि आलिया आपल्या लग्नाबद्दल मोकळेपणानं काही बोलत नसले तरी त्यांनी आपलं नातं मात्र कधी लपवलं नाही. त्यामुळं अनेकदा त्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. नुकत्याच रंगलेल्या 'जिओ मामि मुव्ही मेला वथ स्टार्स २०१९' च्या मंचावर अगदी हेच घडलं. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. दिग्दर्शक- निर्माता आणि करिना, आलियाचा बेस्ट फ्रेन्ड करण जोहरही यावेळी तिथे हजर होता. करण आणि करीनानं यावेळी आलिया-रणबीरच्या लग्नाचा विषय काढला. 'करिना, जर आलिया तुझी वहिनी बनली तर तुला कसं वाटेल?' असा प्रश्न करणनं करिनाला विचारला. प्रश्न ऐकताच करिनानं अगदी उत्साहात उत्तर दिलं की,' जर आलिया माझी वहिनी झाली, तर मी या जगातली सगळ्यात आनंदी मुलगी असेन'....करिनाचं हे उत्तर ऐकून आलियाला काय बोलावं ते सुचेना... 'खरं सांगते मी अद्याप या विषयी काहीच विचार केला नाही आणि मला इतक्यात लग्नाचा विचारही करायचा नाहीए' असं म्हणत तिनं लग्नाचा विषय टाळला.