गोड ज्वारीपासून इथेनॉल

    दिनांक :23-Oct-2019
हमखास आणि उत्तम नफा देणारं तसंच फारशी देखभाल न करावी लागणारं पीक म्हणून उसाच्या लागवडीवर शेतकरी भर देत आले आहेत. बागायती भागात वा सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या तर ऊस शेती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळते. मात्र, आता काही कारणांनी हे पीकही शेतकर्‍यांसाठी खात्रीशीर नफा मिळवून देणारं राहिलेलं नाही. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी गोड ज्वारीच्या उत्पादनाचा आणि त्यापासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग अवलंबायला हवा. 
 
 
जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, भूगर्भातील तेलसाठे संपत जाणं आदी कारणांमुळे येत्या काळात पर्यायी इंधननिर्मितीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने इथेनॉलची मागणी वाढत राहणार असून त्याला अधिक चांगला दरही मिळू शकेल. या दृरदृष्टीतून शेतकर्‍यांनी गोड ज्वारीचं उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीवर भर द्यायला हवा.
 
 
 
गोड ज्वारीचं पीक हे कमी पाण्यात येणारं तसंच पावसाचा ताण सहन करणारं आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात ही लागवड आशादायक ठरते. राज्यात अजुनही बर्‍याच प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र कायम आहे. साहजिक या क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या अनेक शेतकर्‍यांसाठी गोड ज्वारीचं उत्पादन आणि त्यापासून इथेनॉल निर्मितीचा व्यवसाय निश्चितपणे चांगला नफा मिळवून देणारा ठरणार आहे.
 
 
गोड ज्वारीच्या ताटापासून चरख्याने रस काढून, तो आंबवून आणि काही प्रक्रिया करून इथेनॉल तयार करता येतं. या शिवाय गोड ज्वारीच्या ताटातील रस काढून राहिलेला चोथा हा जनावरांसाठी दर्जेदार चारा म्हणून वापरता येण्याजोगा आहे. विशेष म्हणजे गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीसाठी राज्यात बंद पडलेल्या साखर कारखान्यांमधील यंत्रसामग्रीचा वापर करता येण्यासारखा आहे. या व्यवसायाचं साधारण गणित लक्षात घ्यायचं तर हेक्टरी 40 ते 45 टन गोड ज्वारीच्या ताटाचं उत्पादन झाल्यास त्यापासून चरख्याद्वारे 12 ते 15 हजार लिटर रस मिळू शकतो. त्यापासून साधारण एक हजार ते 1200 लिटर इथेनॉल तयार करता येतं. याद्वारे मोठा फायदा प्राप्त करता येतो. ज्वारीच्या उत्पादन खर्चाच्या मानाने मिळणारा लाभ बराच अधिक असतो. या सार्‍या बाबी लक्षात घेता शेतकर्‍यांनी उत्तम प्राप्तीचा हा ‘गोड’ मार्ग स्वीकारायला हवा.