चारा पिकांचं उत्पादन

    दिनांक :23-Oct-2019
पूर्वापार शेतीला उत्तम जोड व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी दुग्धोत्पादनावर भर देत आहेत. त्यात वाढती लोकसंख्या, दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी यामुळे दुधाच्या मागणीत वरचेवर वाढ होत आहे. त्यादृष्टीने या व्यवसायात उत्तम नफा मिळवायचा तर दुधाचं अपेक्षित उत्पादन आणि त्यात सातत्य गरजेचं ठरतं. त्यासाठी जनावरांना आवश्यक त्या प्रमाणात पुरेसा सकस चारा मिळायला हवा. हे लक्षात घेऊन सकस चारा उत्पादनाकडे या व्यावसायिकांनी लक्ष द्यायला हवं. 

 
 
मुख्यत्वे ओलिताच्या क्षेत्रावर घेतल्या जाणार्‍या मुख्य पिकांमधील रिकाम्या कालावधीत कमी कालावधीची हिरव्या चार्‍याची पिकं धेता येणं शक्य आहे. त्यादृष्टीने विचार करायचा तर ज्वारीचं पीक साधारणपणे 75 दिवसात घेता येण्यासारखं आहे. त्याच बरोबर बाजरी, ओट बरसीम ही पिकंही महत्त्वाची ठरतात. या शिवाय शेताच्या बांधाला लागून प्यारा गवत, संकरित नेपिअर, मारवेल गवत यासारख्या चारा पिकांची लागवड करता येण्यासारखी आहे. अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी चारा पिकांच्या सुधारित जातींची लागवड करावी. त्याच बरोबर चारा पिकांच्या बियाण्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. त्या संदर्भातील माहितीही शेतकर्‍यांनी अवश्य घ्यायला हवी.
 
 
सर्वसाधारणपणे चारा पिकांचे एकदल हंगामी चारा पिकं, एकदल बहुवार्षिक चारा पिकं, द्विदल हंगामी चारा पिकं आणि द्विदल बहुवार्षिक चारा पिकं असे गट पडतात. यातील कोणत्या गटात कोणत्या चारा पिकांचा समावेश होतो, हे जाणून घेऊन योग्य चारा पिकांची लागवड करावी. त्याद्वारे जनावरांना सकस चारा उपलब्ध होऊन दुग्धोत्पादनात वाढ करणं वा सातत्य राखणं शक्य होईल.