फडणवीसांचा मार्ग अधिक प्रशस्त!

    दिनांक :23-Oct-2019
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान आटोपल्याबरोबर, सोमवारी रात्री एक्झिट पोलचे निष्कर्ष आले आणि राज्यातली राजकीय परिस्थिती एकदम स्पष्ट झाली. केंद्रात पुन्हा नरेंद्र आल्यानंतर राज्यातही देवेंद्रच येणार, याची चर्चा सुरुवातीपासूनच होती आणि अखेर 21 ऑक्टोबर रोजीच तसे स्पष्ट संकेत मिळाले. 24 ऑक्टोबर रोजी त्यावर शिक्कामोर्तब होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत जी ऐतिहासिक कामगिरी केली, त्यावर हे शिक्कामोर्तब होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती, तेव्हा राज्यात दुष्काळाची स्थिती होती.
 
 
राज्यावर साडेचार लाख कोटींचे कर्ज झाले होते. सरकारची तिजोरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने रिकामी करून ठेवली होती. त्यामुळे राज्यशकट हाकण्याचे मोठे आव्हान देवेंद्र फडणवीसांपुढे होते. ते थेट मुख्यमंत्री झालेत, त्यांना कामाचा कसलाही अनुभव नाही, हा कालचा पोरगा काय राज्य चालवणार, अशी हेटाळणी विरोधकांकडून आणि पक्षातील काही विरोधकांकडूनही करण्यात आली होती. पण, या कालच्या पोराने जे करून दाखविले, त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झालीत. कठोर परिश्रम, जिद्द, विकासाचा ध्यास, राज्याप्रती समर्पण भाव, आत्मविश्वास या गुणांच्या बळावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अतिशय दमदार कामगिरी केली आणि त्यामुळेच जनता त्यांना दुसर्‍यांदा संधी देत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पिण्याचे पाणी, वीज, उद्योगधंदे अशा सगळ्या क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले आणि या विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. शेतकर्‍यांसाठीची सर्वात मोठी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनीच घडवून आणली. पण, त्यावरही विरोधकांनी टीका केली. शेतकर्‍यांची दिशाभूल केली. मात्र, फडणवीस डगमगले नाहीत. ते आपल्या भूमिकेवर प्रामाणिक होते, आपल्या ध्येयमार्गावर त्यांची दमदार वाटचाल सुरू होती. त्यामुळे मार्गात आलेले सर्व अडथळे पार करत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. त्याची परिणती अशी होणार की, ते पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. चित्र अगदीच स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्थिती काय असेल, हे एक्झिट पोल्सच्या निष्कर्षांनी स्पष्ट केले आहे.
 
 
काँग्रेस हा या देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. सव्वाशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या या पक्षाचे नेते आधीपासूनच पराभूत मानसिकतेत होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक धीरोदात्तपणे लढलीच नाही. काही महिने आधीपासूनच त्यांचे नेते असे म्हणत होते की, भाजपाला शंभरावर आणि शिवसेनेला 70 ते 80 जागा मिळतील. याचा अर्थ काय होता? भाजपा-सेना युतीला 2014 मध्ये मिळाल्या होत्या तेवढ्या वा त्यापेक्षाही अधिक जागा मिळतील. आपला पराभव त्यांनी आधीच स्वीकारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अशा पराभूत मानसिकतेत नव्हती. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहिते पाटील, निंबाळकर, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, मधुकर पिचड यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला मोठेच खिंडार पडले. त्यामुळे चिडलेल्या शरद पवारांनी वयाच्या ऐंशिव्या वर्षीही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि सत्ताधार्‍यांपुढे आव्हान उभे केले. पवारांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवणारा होता. मात्र, त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाहीय.
 
 
महाराष्ट्र विधानसभेची यंदाची निवडणूक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशीच ठरली. या निवडणुकीत विरोधकांचे अस्तित्व तसे जाणवलेच नाही. एकटे शरद पवार सोडले, तर विरोधकांमध्ये कुणीही प्रभावी नेता राज्यभर प्रचार करण्यासाठी फिरला नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाही म्हणायला पाच सभा घेतल्या. पण, त्यामुळे पक्षाला फार फायदा होईल, असे दिसत नाही. सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वढेरा या मायलेकी तर महाराष्ट्राकडे फिरकल्याही नाहीत. मल्लिकार्जुन खडगेंसारखे प्रभारी आले तर खरे, पण त्यांचा कसलाही प्रभाव या निवडणुकीत जाणवला नाही.
 
 
समोर पहिलवानच नाही तर मग लढायचे कुणाशी, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान विचारला होता. तो वास्तवाला धरून होता, हे 24 तारखेला सिद्ध होणारच आहे. शरद पवारांनी पहिलवानकी करून पाहिली, पण त्यांना आपले वय लक्षात आले नाही. वय झाले आहे हे मान्य करायलाच ते तयार नाहीत. गेली पन्नास वर्षे ते सातत्याने राजकारणात सक्रिय आहेत. आनंदाची गोष्ट आहे. पण, एवढी वर्षे सक्रिय राहिल्याने आपण आता थकलो आहोत, विश्रांती घेत सूत्रे नव्या पिढीकडे सोपविली पाहिजेत, याचे भान त्यांनी ठेवले असते, तर चित्र थोडे वेगळे दिसले असते. त्यांच्या पक्षाला फार मोठे यश मिळाले असते असे नव्हे, पण नव्या पिढीतल्या नव्या दमाच्या नेत्यांनी थोडाफार चमत्कार घडवत सत्ताधार्‍यांना घाम फोडला असता, हे निश्चित! वयाची ऐंशी वर्षे ते लवकरच पूर्ण करतील. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत:ला स्वत:हून सक्रिय राजकारणापासून दूर ठेवायला हवे होते. जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांसारखे जे नेते आहेत, त्यांच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी टाकून ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले असते, तर पुढे 2024 साली होणार्‍या निवडणुकीचा पाया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रचता आला असता. पण, मी अजूनही तरुण आहे, थकलेलो नाही, हे सांगताना पवारांना कंटाळा कसा येत नाही? योग्य वेळी योग्य निर्णय घेत ते बाजूला झाले नाहीत, तर भविष्यात त्यांच्या पक्षात ते एकटेच राहतील की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे.
 
 
ईडीने बोलावले नसतानाही ईडीच्या कार्यालयात जाण्याचा जो डाव पवारांनी खेळला आणि राष्ट्रवादीच्या बाजूने त्यांनी राज्यभर वातावरण तयार केले, त्यावर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पाणी फेरल्याचे तुम्ही-आम्ही अनुभवलेच आहे. अजित पवारांनी आवश्यकता नसताना अवेळी राजीनामा देऊन जे संकेत दिले होते, ते शरद पवारांनी ओळखायला हवे होते. त्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या दुर्दैवाने त्यांनी नाही ओळखले. भविष्यात राष्ट्रवादीचे काय होणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. आज मात्र राज्यात भारतीय जनता पक्ष हा मजबूत आणि प्रबळ आहे. पुढली पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर असेल आणि राज्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात ते यशस्वी होईल, यात शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी काढलेली महाजनादेश यात्रा, भाजपाची अतिशय प्रभावी अशी निवडणूक यंत्रणा, समर्पित कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्व घटकांमुळे विधानसभेची निवडणूक भाजपासाठी आधीच सोपी झाली होती, ती विरोधकांमधील गोंधळाने, बेशिस्तीने आणखी सोपी केली, हेच खरे!