स्निग्ध प्रकाशाची ही पायवाट गावाकडेच का जाते?

    दिनांक :23-Oct-2019
यथार्थ
श्याम पेठकर 
 
माणसं हातावर पोट घेऊन गावाकडे पाठ करतात अन्‌ शहराकडे येतात. शहर पोटाशी घेत नाही, पण पाठ दाखविलेलं गाव मात्र कायम पाठीशी राहतं. त्यामुळे शहरात राहूनही आतलं हे गाव कायम बोलावत राहतं. गावाच्या या हाका ऋतूंच्या भाषेत असतात. पाऊस पडू लागला की, गावाच्या वाटेवर शेतांच्या धुर्‍यावर उगवू लागलेली रोपटी आठवतात. खरिपाच्या सुगीच्या दिवसांत गावाच्या वाटेवर फुलून आलेल्या रानाचा अन्‌ शेतातील पिकांचा गंध दाटून आलेला असतो. दिवाळीचे हे दिवस आले की, गावाच्या नुसत्या आठवणीनेही खूप सुरक्षित वाटतं. देशाचे काही कायदेकानून असले अन्‌ जगरहाटीचे काही नियम असले, तरीही गावाचे आपले अलिखित, अनुल्लेखित असे बंध असतात आणि ते तुम्हाला आपलं लेकरू समजून तुमच्या चुकांसह स्वीकारतात. दिवाळीच्या दिवसांतला गावाकडचा प्रकाश नैसर्गिक असतो आणि त्याला बाजाराची काजळी लागलेली नसते... 

 
 
तुम्ही गावात गेलात ना या दिवसांत अन्‌ गावानेही आपले गावपण कायम ठेवले असेल, तर काही स्मृतिचित्रे दिसतातच. पहाटे दवात न्हालेल्या अन्‌ हिवात थरथरणार्‍या तुळशीजवळ मंदपणे तेवणार्‍या दिव्याची ऊबच तिला आधार देते. दूर देवळात काकडा निनादत असतो. देवळाला धुक्याचा वेढा पडलेला असतो. एखादी एकट गाय देवळाच्या भिंतीला अंग घासून स्वत:लाच उबवीत असते. महादेवाच्या पिंडीजवळ गावकुत्रं पायात मान खुपसून, कान ताठ करून व टपोर्‍या डोळ्यांत आरती साठवीत बसलं असतं. काकड्याची नवचेतना वातावरण उजळून टाकते आणि हळूहळू धुकंही सोनेरी होऊ लागतं. हे कार्तिकाचे दिवस असतात. अशा दिवसांत पहाटे उठून आंघोळ न करताही बाहेर पडलं; तरी देहाचे मंदिर होते अन्‌ मनाच्या राऊळात विठ्‌ठल कटेवर हात ठेवून समचरण दाखवीत उभा असतो. कार्तिक हा उजळण्याचा महिना आहे. उजळण्याचा अन्‌ उजळविण्याचाही. अशा दिवसांत देहाचे मंदिर झाल्यावर गावाची पंढरी होणारच. मग कातरवेळेला गावातल्या घराघरांवर आकाशदिवे लागतात. बांगड्यांच्या किणकिणाटात दिव्यांना जाग येते. कार्तिक हा जाणिवेचे, ज्ञानाचे आणि स्पर्शाचे दिवे पेटविण्याचा महिना आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चे स्वप्न डोळ्यांच्या बाहुल्यांत स्थलांतरित करण्याचे हे दिवस.
 
 
सगळीकडे दिवे उजळलेले असतात. याचा अर्थ गाव उजळून निघाले, असा होत नाही. या दिवसांत दिव्यांची आरास मांडण्याची अहमहमिका लागलेली असते. पण, सारेच दिवे उजेडासाठी लावलेले असतात असे नाही. प्रकाशाची दिशाभूल करण्यासाठी काही स्वप्नविके अशा उजेडाची आरास मांडत असतात. प्रकाशाची झूल पांघरून काही जण मग भरल्या गावात दुकान थाटतात. अशा दुकानात मनोवेधक वेष्टनंच विकण्यात येतात. अशा दुकानांवर चकाकणारे दिवे वेड्या जिवांना भूल पाडण्यासाठी असतात. जे चकाकते ते सारेच सोने असते, असे समजून गाव खरेदी-विक्रीचे व्यवहार करते. विठुनामाच्या व्यवहारापासून या उजेडाच्या विक्रीपर्यंत गावाचा प्रवास झाला की, गावाचे मग शहर होते. ऋतूंप्रमाणे शहरात सणही येत नाहीत. दिव्यांचा सण तर नाहीच. कारण गावाबाहेरचा उजेड हा राबत्या गुरांच्या पावलांसोबत गावात येत असतो. शहरात जनावरं भरपूर असतात. पण, रानात राबणार्‍या सोशीक गुरांना शहरात थाराच नसतो. शहराच्या कुठल्याही कोपर्‍यात एक पणती ठेवली पाहिजे. खरेतर अंधारात एक दिवा लावायचा झाला, तर आयुष्याच्या कितीतरी वाती खर्ची घालाव्या लागतात. पण, इथे तर दिव्यांची नुसती झुंबरेच वेठीस धरण्यात येतात, लोकांना खोटी-चकाकती स्वप्नं विकण्यासाठी. उजेडाचे एखादे स्वप्न असेल काय?
 
 
स्वप्न फक्त डोळ्यांच्या बाहुल्या ज्यांच्याजवळ आहेत त्यांनाच पडतात. जे जन्मांध आहेत त्यांच्या स्वप्नांचं काय? उजेड आंधळा असतो का? जन्मांधांनाही स्वप्नं पडावीत, असे स्वप्न तर उजेडाला पडत नसेल? उजेडाला पडणार्‍या स्वप्नांचा शोध घेण्यासाठी आपण एक एक दिवा घराच्या छपरापासून तुळशीच्या पायापर्यंत लावत नेतो. दिवे आणि वाती विस्तवाने पेटवायच्या नसतात. त्या प्राणांच्या पलित्यांनी उजळून टाकायच्या असतात. हडळींनी आणि वेताळांनी गावपंढरीच्या बाहेर गाव पेटविण्यासाठी दिवे लावून ठेवलेले असतात. या दिवसांत ते गावातल्या सात्त्विक दिव्यांत मिसळून जाऊ नयेत यासाठी ते याच वेळी प्राणपणाने फुंकून विझवून टाकण्याची वेळ आता आली आहे, हे प्रकाशवेड्यांना कळायला हवे. या वेळी ऋतू, दिव्यांच्या तोंडी अंगार फुलवून कूस पालटत असतो. प्रत्येक ऋतू, बदलांची अशी सांकेतिक भाषा घेऊन येत असतात. संपर्काची आणि बदलाची ही भाषा दिव्यांच्या उजेडात डोळ्यांतील बाहुल्यांची आहुती देऊन आत्मसात करायची असते. ऋतूंच्या बदलाची ही भाषा आत्मसात झाली की, गावावर अस्मानफेक हल्ले होण्याआधीच पळून जायची वेळ येत नाही.
 
 
म्हणून या दिवसांत दिव्यांची पूजा करायची असते. श्वासात उजेड पेरून घेता आला तर ते जमते. उजेडाच्या पूजेचे फलित काय? तर मनाचा कणा ताठ होतो. दृष्टीच्या कक्षा रुंदावतात. हिंमत वाढते. मुख्य म्हणजे अंधाराची भीती वाटत नाही. प्रकाश म्हणजे तरी काय? आयुष्यात उभारीने उभे राहण्याची हिंमत. ती प्रकाशाच्या पूजेने मिळते. मग, अंधारात दडून बसलेल्या त्या नियतीच्या हिरव्या सापांना ठेचून मारण्याचे बळ येते. ‘आदम’च्या ‘इव्ह’ला संधिप्रकाशात अंधारवाटांतच अशाच एका सर्पाने नग्नतेची जाणीव करून दिली आणि संपूर्ण मानवजातीला वासनेच्या विवरात कायमचे ढकलून दिले. इव्हच्या हातात तेव्हा आकाशदिवा असता तर?
 
 
एक पहाटपक्षी आहे. दूर कुठेतरी आफ्रिकेच्या जंगलात त्याच्या जमाती राहतात. हा पक्षी रात्रभर जागा असतो आणि पहाट झाली की, एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसतो. सूर्यप्रकाशाचे पान करतो. तेथील लोक म्हणतात की, तो प्रकाश पितो. एक क्षणभरच. नंतर तो त्याच वृक्षाच्या अंधारकोठडीत जाऊन दिवसभर झोपून असतो. एका क्षणाचा प्रकाश प्राशून रात्रभर अंधाराशी झगडत राहणे, हे त्याचे प्रारब्ध... पण, एका क्षणाच्या प्रकाशाने त्याने ते किती सोपे करून टाकले आहे! संपूर्ण वर्षभराच्या अंधारपर्वात वावरताना त्या आफ्रिकन पक्ष्यासारखे आपल्याला करता आले पाहिजे. उजेडाची पूजा करण्याच्या या दिवसांत जाणिवेचे, ज्ञानाचे, स्पर्शाचे आणि प्रेमाचे जेवढे दीप उजळून टाकता येतील तेवढे उजळून टाकले पाहिजे. अंधाराची कराल आणि कर्कश आरडाओरड सुरू होण्याआधीच उजेडाच्या प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे.
 
 
उजेडाची प्रार्थना करताना दिवे लावण्याची गरज नाही. आपण आतून जितके जास्त उजळून जाऊ, तेवढी त्या उजेडाच्या प्रार्थनेची हाक त्या दिव्यत्वापर्यंत जाऊन पोहोचते. उजळण्यासाठीसुद्धा काहीतरी करावेच लागते. पण, आपण जे जाळणार किंवा जळणार आहोत, त्यामुळे कुठेही काजळी धरायला नको. ज्या जळणाने काजळी धरते ते उजळणे म्हणजे प्रकाशणे नव्हे. ती आग असते. त्याने काजळी धरते. दिव्याच्या जळण्याने काजळ धरते. ते दृष्टी सतेज करते. उजळण्यासाठीच जमलेल्या काजळाने ‘ध’चा ‘मा’ करणारे हात मात्र अंधाराला पायवाट करून देतात. म्हणून मग उजळण्यासाठी जे जळणे आहे ते सात्त्विक असले पाहिजे. आपल्या प्राणापेक्षा सात्त्विक काय असू शकते? म्हणून मग प्राणपणाने आतून उजळावे. एकदा हे जमले की अंधाराचे काफिले उजेडाच्या गावावर चालून येण्याची हिंमत करणार नाहीत. उजेडाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग गाव घासूनपुसून लख्ख करता येईल. दगडांचेही टाळ होतात. हातात श्रद्धेचे बळ असले की सारेच शक्य होते. गावाभोवती सात्त्विक थंडी रुंजी घालायला लागली असताना, गावाने भल्या पहाटे प्रार्थनेचा एक दिवा लावून ठेवावा. कारण पहाटेच्या स्निग्ध संधिप्रकाशातही वासनेचे हिरवे साप दबा धरून बसलेेले असतात. ते केवळ प्रकाशाच्या प्रार्थनेनेच रोखून धरता येतात...