सामाजिक जाणिवांची दिवाळी!

    दिनांक :24-Oct-2019
सर्वेश फडणवीस
दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा सण. भारतीय संस्कृतीत सणांची जी रचना आहे, ती इतकी जाणीवपूर्वक केली आहे, की- त्यावर विचार करायला गेलो तरी आपण या संस्कृतीचे पाईक आहोत याचा आंनद होतो. दिवाळी हा सण जगात कुठेही आणि कुठल्याही संस्कृतीमध्ये बघायला मिळणार नाही. पाच दिवस आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. समाजातील प्रत्येक घटक दिवाळी ही साजरी करतचं असते. काळानुसार बदल हा अपेक्षित आहेच आणि प्रत्येक बदलाचे स्वागत हे व्हायलाच हवेचं. यंदा असाचं छोटासा बदल करण्याचा प्रयत्न आपण करूया. छोटे व्यापारी व गरजू लोकांकडून खरेदी करून त्यांना मदत करू शकलो तर ही दिवाळी नक्कीच त्यांच्याही घरी एक पणती प्रज्वलित करू शकते. 

 
 
नुकतेच मागच्या आठवड्यात काही आकडे समोर आलेत. भारतात उपासमारीची समस्या अधिक गंभीर झाल्याचे ग्लोबल हंगर इंडेक्समधून (जीएचआय) समोर आले आहे. जीएचआयमध्ये भारताची घसरण झाली आहे. 177 देशांच्या यादीत भारत 102व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वांत खालचा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील इतर देश हे 66 ते 94 व्या स्थानावर आहेत. भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे. हे आकडे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.
 
 
भारतातील दिवाळी सारखा सण जगात कुठेही नसेल. प्रकाशाचा, समृद्धीचे पूजन करण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण म्हणून आपण दिवाळीकडे बघत असतो. महागाईचे संकट आहेच, तरीही आपला उत्साह कुठेही कमी झालेला नाही. महागाई हा विषय तसा शहरांपुरता आहे. दिवाळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असतोच. आता काळानुसार बदल ही होत आहेत आणि ते व्हायला ही हवे. मध्यंतरी एक व्हिडीओ बघितला ज्यात एक मुलगा आईचा हात धरून मॉलमध्ये फिरत असतो. एक महिला तिथे पणती विकात असते. आई नाही म्हणत असताना सुद्धा मुलगा त्या बाईकडून पणत्या विकत घेतो. परत येतो तिचा फोटो घेऊन सगळीकडे तो पाठवतो त्यातून अनेकांना त्याची माहिती मिळते, अनेकजण तिथे येऊन तिच्याकडून पणत्या विकत घेतात. चार पैसे हाती येतात आणि त्या घरीसुद्धा दिवाळी साजरी होते. हेच चित्र आज आपल्या अवतीभवती बघायला मिळतं आहे, पण बरेचदा आपण दुर्लक्षित करून सोडून देतो. पण आता असे करून चालणार नाही. छोटे व्यापारी, वंचित आपले समाज बांधव आहेत. यांच्याकडून खरेदी करू शकलो, तर उद्या एक पणती प्रज्वलीत होणार आहे. छोट्या दुकानातून, रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या व्यापारी वर्गातील लोकांकडून या दिवाळीच्या काळात खरेदी करण्याचा आग्रह धरावा. स्वदेशी माळ विकत घेऊन अनेकांना आपण हातभार लावू शकतो. चायना वस्तू स्वस्त मिळत असल्या तरी सणाच्या काळात स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा.
 
 
दिवाळीचा फराळ ही सुद्धा अपूर्वाईची गोष्ट आहे. हल्लीच्या काळात प्रत्येकाच्या राहणीमानात बदल झाले आहे. त्यामुळे फराळाचे असे विशेष नवल राहिले नाही. कारण पूर्वी जे खाद्यपदार्थ दिवाळीच्या दिवसात करण्यात येत होते ते आता रोजच खायला मिळू लागले आहेत. पण असे असले तरी रितीनुसार प्रत्येकाच्या घरी पदार्थांची रेलचेल ही असतेच. या दिवाळीला या रितीला एक सामाजिक दायित्व म्हणून ज्या वंचित घटकांना फराळाचे खायला मिळत नाही. त्यांच्यापर्यंत नेऊन, त्यांच्याबरोबर फराळ करता आला तर जे समाधान मिळेल त्याने माणसा माणसातील अंतर, दुरावा कमी होईल. हे अंतर कमी करण्यासाठी ही पद्धत सुरू करायला हरकत नाही. परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून केली तर त्याचा आनंद अधिक होत असतो. देणे ही सहज प्रक्रिया आहे आणि देण्याने देणार्‍याची कृती आणि भाव समजून येतात. याचसाठी दिवाळी सारखा सण साजरा करण्याचा अधिक आनंद आपण अनुभवू शकतो.
 
 
दिवाळी सामाजिक जाणिवांची जपणूक करून केली तर त्यातील गोडवा अधिक उत्साह आणि आत्मिक समाधान देऊन जाईल. चला सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ करत दिवाळीचा उत्सव साजरा करू या. ही दिवाळी सर्वांना आनंद, समाधान व निरामय आरोग्य प्रदान करो. दिवाळीच्या शुभेच्छा !!!