आज फैसला!

    दिनांक :24-Oct-2019
परवा आटोपलेल्या परीक्षेचा आज निकाल आहे. तसाही, वर्षभर केलेल्या अभ्यासाचा ताळमेळ तीन तासांच्या परीक्षेतून सिद्ध करण्याची रीत आहे आपल्याकडे. राजकारणात तर क्षणाक्षणाला परीक्षा असते. सत्तेची सोबत असली तरीही अन्‌ नसली तरीही. लोकसभा, विधानसभेपासून तर जिल्हा परिषद-ग्रामपंचायतींपर्यंतच्या सार्‍या निवडणुकींतून परीक्षा द्यावी लागते या क्षेत्रात वावरणार्‍यांना. यंदाची विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद मानायचे कारण नाही. सत्ता हे सेवेचे साधन आहे, असे मानणार्‍यांपासून तर सत्ता ही केवळ आणि केवळ उपभोगण्याची चीज आहे, असे मानणार्‍यांपर्यंतचा गोतावळा यंदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरला होता. समाजकारणापासून तर जाती-पातीच्या आधारे काम करणार्‍यांपर्यंत, सारेच या परीक्षेत सहभागी झाले होते. एक काळ होता, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या अपक्ष उमेदवारांची संख्या नियंत्रणाबाहेर असायची. पराभव नजरेसमोर असताना ही मंडळी या निवडणुकी का, कशासाठी अन्‌ कशाच्या बळावर लढवतात, या प्रश्नाच्या न गवसणार्‍या उत्तरातही राजकारण दडलेले असावे कदाचित! अन्यथा राजकारण, निवडणूक हा केवळ हौसेचा, तळमळीचा विषय राहिलेला नाही आताशा. बाकी काहीही असले, तरी भारतीय समाजजीवनात राजकारणाला, त्यातील व्यक्तींना विशेष महत्त्व आहे. बहुधा म्हणूनच की काय, पण राजकारणाच्या माध्यमातून या समाजविश्वाला स्पर्श करण्याचा प्रयत्न होतो, बहुतांशी. समाजाचे सारे प्रश्न राजकीय मार्गानेच सोडवले जाऊ शकतात, असाही एक समज नव्हे, विश्वास लोकमानसात जागला आहे, स्वातंत्र्योत्तर काळात. त्याचाही परिणाम असेल कदाचित, पण इथे राजकारणाला, पर्यायाने निवडणुकीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. साधी ग्रामपंचायतीची निवडणूकही त्याला अपवाद नसते, ही तर विधानसभेची निवडणूक आहे.
 

 
 
288 मतदारसंघांतून आपले प्रतिनिधी विधानसभेत काम करण्यासाठी म्हणून निवडून पाठवण्याकरिता सुमारे नऊ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित होते. सरासरी सत्तर टक्के मतदारांनी आपली ही जबाबदारी पार पाडली. मतदानाचा हक्क बजावला. त्याचा परिणाम आज सार्‍या राज्याच्या समोर असणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत ज्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली गेली होती, त्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांत, संबंधित मतदारसंघासाठी केलेल्या कामांचे जनतेने केलेले अवलोकन त्या निकालातून प्रतििंबबित होणार आहे. अर्थात, सरकारने केलेल्या कामांचा जनमानसावर उमटलेल्या परिणामांचा ठसाही या निकालातून उमटणार आहे. त्याहीपेक्षा, येत्या काळात राज्याच्या राज्यकारभाराचा शकट जनता कुणाच्या हातात सोपवू इच्छिते, हे देखील आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात, आणिबाणीनंतर आणि 1995च्या निवडणूक निकालांचा अपवाद वगळता सातत्याने कॉंग्रेस, डावे, समाजवादी यांचे सत्तेवर वर्चस्व राहिले.
 
‘नोटो की पटरीपर चालती, है वोटो की रेल,
बीए पास मिले चपरासी, और मंत्री चौथी फेल!’
 
असे काहीसे विदारक चित्र केवळ या राज्यानेच नव्हे, तर सार्‍या देशाने अनुभवले अन्‌ भोगले आहे कधीकाळी. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची जबाबदारी शेवटी मतदारांचीच आहे. घटनेने प्रदान केलेल्या ‘एका मताची’ किंमत मतदारांना कळण्यात बरेच दिवस गेलेत. अजूनही काही लोकांना त्यांच्या मताची किंमत कळलेली नाही. पण, पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती बरीच बदलली आहे. बदलते आहे. मतदारांना जाती-धर्माच्या मुद्यांवर वाटणे, दारू-पैशाच्या जोरावर विकत घेणे, कुठल्याशा असंबंधित मुद्यांभोवती त्यांना गुंतवून ठेवणे आताशा तितकेसे सोपे राहिलेले नाही. आता ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर!’ म्हणतो मतदार. सार्वजनिक रीत्या प्रश्न विचारण्याची हिंमत  मत करतो. निडरपणे बोलतो. चुकांवर बोट ठेवतो. युक्तिवाद करतो. जे नाही पटलं, त्याबाबत स्वत:चं म्हणणं स्पष्टपणे मांडतो. अशा जागरूक मतदारांना भूलथापांनी भुरळ घालणं शक्य नाही. आता केलेल्या कामांचा अहवाल अन्‌ करणार असलेल्या कामांचा आराखडा, तोही खराखुरा लागतो. अन्यथा मतदारही भीक घालत नाहीत कुणालाच. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-सेना युतीचे नेते दमदारपणे जनतेला सामोरे जाऊ शकलेत ते केवळ, मागील कालावधीत केलेल्या कामांच्या शिदोरीवर. शेतातल्या तळ्यांपासून तर नजीकच्या भविष्यात वेगाने धावणार्‍या मेट्रोपर्यंत अन्‌ जिकडेतिकडे सुरू असलेल्या रस्त्यांच्या निर्माणकार्यापासून तर विजेच्या विक्रमी उत्पादनापर्यंत... केलेल्या कामांचे कार्ड चालवले सत्ताधार्‍यांनी. अन्‌ ते चाललेही. या उलट, विरोधी बाकांवर बसलेल्यांची किंवा तिथेही बसण्याची परिस्थिती न राहिलेल्यांची दैनावस्था तर बघण्यालायक आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की यापुढे, काम कराल तरच सत्तेची कमान लोक तुमच्या हातात सोपवतील. अन्यथा घरचा रस्ता दाखवला जाईल. एकूण, बदललेल्या परिस्थितीत विधानसभेची निवडणूक परवा पार पडली. पंतप्रधानांपासून तर सुप्रिया सुळेंपर्यंत, अमित शाहंपासून तर राहुल गांधींपर्यंत, योगी आदित्यनाथांपासून तर प्रकाश आंबेडकरांपर्यंत सर्वांनी आपापल्या पक्षाच्या, उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या जाहीर सभांच्या माध्यमातून वातावरण भारून टाकण्याचा प्रयत्न केला. आपली बाजू, आपल्या कामांचा तपशील, इतरांनी केलेल्या आरोपांना दिलेली सडेतोड उत्तरे अन्‌ भविष्यात हा प्रांत विकासाच्या दृष्टीने कोणत्या दिशेने न्यायचाय्‌, तो मानस व्यक्त करणे, या दृष्टीने सभांचे आयोजन झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. भोंगे वाजवण्यापासून तर थेट लोकांच्या दारी पोहोचण्यापर्यंत, सर्व प्रकाराने विविध पक्षांनी, विविध उमेदवारांनी आपल्या परीने प्रयत्न केलेत. गेले सुमारे महिनाभर प्रचाराचा हा कित्ता सर्वदूर गिरविला गेला. ज्येष्ठ नागरिकांपासून तर नवमतदारांपर्यंत, मध्यमवर्गीयांपासून तर उच्चभ्रूंपर्यंत, बॉलीवूड स्टार्सपासून तर शेतमजुरांपर्यंत, बड्या व्यापार्‍यांपासून तर भाजी विक्रेत्यापर्यंत, सर्वांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. नीट समजून घेतले आणि आपापले अवलोकन मतदानाच्या रूपात ईव्हीएम मशीनमध्ये नोंदवले. त्यामुळे लोकांचा फैसला तर आधीच झाला आहे. त्याची फक्त घोषणा आज होऊ घातली आहे. लोकशाहीवर विश्वास असलेल्या, जनतेला सर्वोपरी मानणार्‍या अन्‌ मतदाराला ‘राजा’ मानणार्‍यांनी आज घोषित होणारा लोकमतांचा कौल शिरसावंद्य मानावा आणि पुढील मार्गक्रमणासाठी सिद्ध व्हावे. ज्यांना बहुमत मिळाले त्यांनी सत्तेचा शकट हाकण्यासाठी सज्ज व्हावे. ज्यांना ते मिळू शकले नाही त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास सिद्ध व्हावे. ज्यांच्या वाट्याला पराभव आला, त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी सुरू करावी. हो! शेवटी निवडणूक हा काय आयोगानं तारखा घोषित केल्यानंतरचा खेळ थोडीच असतो? तो पाच वर्षांचाच खेळ आहे. तेवढाच काळ त्याची तयारी करावी लागते. ज्यांनी ती तयारी केली, यश त्यांच्या पदरात. ज्यांना ते करता आलं नाही, त्यांनी विजयाची कामना करायची नाही. बस्स! कुठल्याशा लाटेतले जय-पराजय हा अपवाद आहे. एरवी राजकारण हे पाच वर्षांचे पर्व आहे. मतदानाची प्रक्रिया ही परीक्षा आहे अन्‌ मतमोजणी हा त्या परीक्षेचा निकाल! काहींना निकाल फलद्रूप ठरतील. काहींचा ‘निकाल लागेल!’ सर्वांना शुभेच्छा! हो! उद्यापासून पुढील मार्गक्रमण तर सर्वांनीच करायचे आहे ना!