निकालाचे संभाव्य राजकीय पडसाद...

    दिनांक :24-Oct-2019
 दिल्ली वार्तापत्र 
 
श्यामकांत जहागीरदार  
 
महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन राज्यांतील मतदारांचा कौल कुणाला मिळाला, याचे संकेत एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. अपेक्षेप्रमाणे दोन्ही राज्यांत भाजपा विजयी होत आहे.
महाराष्ट्रातील भाजपाच्या विजयाबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. महाराष्ट्रात ‘अबकी बार दोसौ पार’ होणार, हे स्पष्ट झाले आहे. हरयाणातही एक्झिट पोलने भाजपाच्या विजयाकडे दिशानिर्देश केला आहे. फक्त एकाच वाहिनीने हरयाणात त्रिशंकू विधानसभेचे भाकीत केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार, याबाबतची उत्सुकता वाढणे स्वाभाविक आहे.
या दोन राज्यांतील निवडणूक निकालाचा भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य राजकीय पक्षांच्या अंतर्गत घडामोडींवर परिणाम होणार आहे. महिना दोन महिन्यांत झारखंड आणि दिल्लीतही विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत भाजपाचा निर्विवाद विजय झाला, तर या दोन राज्यांतील निवडणुकांना भाजपा मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाईल.
जवळपास सर्वच वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला दोनशेच्या वर जागा दाखवल्या आहेत. हरयाणातही भाजपाच्या बहुमताचा अंदाज आहे. फक्त एकाच वाहिनीने हरयाणाबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. हरयाणात त्रिशंकू विधानसभेची स्थिती उद्भवली, तर भाजपाला आपल्या व्यूहरचनेचा नव्याने विचार करावा लागणार आहे.
भाजपाला हरयाणात स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तरी अन्य छोट्या पक्षांच्या तसेच अपक्ष आमदारांच्या पािंठब्याने राज्यात भाजपाच सरकार स्थापन करण्यात बाजी मारू शकते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही हरयाणात भाजपाला 47 जागा म्हणजे साधे बहुमत मिळाले होते. मात्र, 47 आमदारांच्या मदतीनेही मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यात पाच वर्षे यशस्वीपणे सरकार चालवून दाखवले.
 
 
 
महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालाचे सर्वाधिक पडसाद कॉंग्रेस पक्षात उमटणार आहेत. या दोन राज्यांतील निवडणूक प्रचारात, आपण सत्तेवर येणार असल्याचे दावे कॉंग्रेसचे नेते करत असले, तरी आपण सत्तेवर येऊ शकत नाही, याची खात्री खाजगी गप्पांमध्ये कॉंग्रेसचे नेते देत होते. निवडणूक लढायची म्हणून कॉंग्रेस या दोन राज्यांत निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कॉंग्रेसला या दोन राज्यांत सत्तेवर येण्याची 10 टक्केही खात्री असती, तर कॉंग्रेसचे मोठे नेते निवडणूक प्रचारात उतरले असते. पण, राहुल गांधींचा अपवाद वगळता कॉंग्रेसच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या दोन राज्यांतील निवडणूक प्रचाराकडे दुर्लक्ष केले, याचा अर्थ त्यांना आपला निकाल काय लागणार हे समजले होते.
कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनीही या दोन राज्यांतील प्रचाराकडे पाठ फिरवली, एकही सभा घेतली नाही. कॉंग्रेसच्या महासचिव श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनाही कॉंग्रेस पक्षाने या दोन राज्यांतील प्रचारापासून दूर ठेवले. आश्चर्य म्हणजे श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या कामात सहभागी होत्या, मात्र दोन राज्यांत विधानसभा निवडणूक होत असताना आपण एखादी सभा घ्यावी, असे त्यांना वाटले नाही, तसेच त्यांची एखादी सभा ठेवावी, असे कॉंग्रेस पक्षालाही वाटले नाही.
कॉंग्रेसच्या नेतृत्वाने या दोन राज्यांतील स्थानिक नेतृत्वासोबत राज्यातील पक्षाच्या उमेदवारांनाही शब्दश: वार्‍यावर सोडून दिले. कॉंग्रेस नेतृत्वाचा भर, पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये, यावर होता. म्हणजे स्वत:ची चामडी वाचवण्याकडे होता.
राहुल गांधींनी नाही म्हणायला काही मोजक्या सभा घेतल्या, पण त्याचा कॉंग्रेसला उपयोग होण्याची काहीच शक्यता नाही. कारण, राहुल गांधी स्वत:च निराशेच्या गर्तेतून अद्याप बाहेर आले नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रचारात ते पराभूत मानसिकतेत दिसत होते. नाइलाज तसेच औपचारिकता म्हणून त्यांना काही सभा घ्याव्या लागल्या. मात्र, कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याची कोणतीच जिद्द त्यांच्यात दिसत नव्हती.
 
दुसरीकडे, भाजपाला विजयाची पूर्ण खात्री असतानाही भाजपाने आपल्या प्रचारात आणि प्रयत्नात कोणतीही कसर ठेवली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथिंसह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, स्मृती इराणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, ज्येष्ठ भाजपा नेते यांना भाजपाने प्रचारात उतरवले होते. निवडणूक कशी लढवावी, त्याचे नियोजन कसे करावे, हे भाजपाकडून अन्य राजकीय पक्षांना शिकण्यासारखे आहे.
 
या दोन राज्यांतील पराभवानंतर कॉंग्रेसमधून आता मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू होईल. अनेक मोठे नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडतील. राज्यसभेतील कॉंग्रेसच्या काही खासदारांनी आतापर्यंत राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे. निकालानंतर याचे प्रमाण वाढणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अभिषेक मनू सिंघवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेले विधान ही त्याची सुरुवात आहे. कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते येत्या काळात पक्षाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत बाहेर पडण्याचा आपला मार्ग प्रशस्त करणार आहेत.
 
युतीच्या राजकारणात जसा लहान भाऊ मोठा भाऊ झाला आणि मोठा भाऊ लहान, तसेच आघाडीच्या राजकारणातही होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या संकेतानुसार यावेळी कॉंग्रेसच्या जागा कमी होत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाढणार आहेत. याचे श्रेय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जाणार आहे. वयाची 78 वर्षे पूर्ण झालेली असतानाही शरद पवार यांनी राज्यात ज्या जिद्दीने आपल्या उमेदवारांसाठी प्रचार केला, त्याचे कौतुक केले पाहिजे. भरपावसात त्यांनी केलेला प्रचार समाज माध्यमातून चांगलाच गाजला. जे शरद पवारांना जमले ते कॉंग्रेसच्या नेत्यांना का जमले नाही, हा प्रश्न आहे.
मुळात कॉंग्रेसमधून जशी गळती सुरू झाली, तशी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनही झाली. त्यामुळे यावेळी कॉंग्रेससोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली नसती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसही धोक्यात आली असती, त्यामुळेच शरद पवार यांना निवडणूक प्रचारात झोकून द्यावे लागले.
शिवसेनेलाही महाराष्ट्राच्या राजकारणात आता लहान भावाची आपली भूमिका मान्य करावी लागणार आहे. ही भूमिका मान्य करण्याशिवाय शिवसेनेसमोर अन्य पर्यायही उरला नाही. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाला- आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. एका शिवसैनिकाला (म्हणजे आदित्य ठाकरेला ) मुख्यमंत्री करण्याचा शब्द मी बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्रिपद तर शिवसेनेला मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानून घ्यावे लागणार आहे. युतीच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.
 
1995 मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना भाजपाचे गोपीनाथ मुंडे त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. राजकारणाचे चक्र आता उलटे फिरले आहे. भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही, असे म्हणतात, त्याचेच हे प्रत्यंतर आहे. या दोन राज्यांतील निकालाचा तो बोध राहणार आहे.
9881717817